Wednesday, January 12, 2022

सोन्या

 सोन्या .


रत्नाकर सोहोनी. ( ह्यातील ‘हो वर विशेष जोर देऊन सोन्या नाव सांगत  असे.) 

मी त्याला इतरा सारखा कधीच रतन, रत्न्या, रत्नाकर म्हणून संबोधिले नाही) माझ्यासाठी तो नेहमी सोन्याच राहिला.

 

आमची प्रथम भेट जेजेत.

मी एक वर्ष सायन्स करण्याचा वायफळ प्रयत्न केला आणि  जेजेत आलो.

सोन्या चे व्यक्तिमत्व उठून दिसण्यासारखे,गोरा पान हिरवे घारे डोळे,जन्मतः सोनेरी कुरळे केस ६ उंची, भरदार शरीरयष्टी सहसा कोणीही दुर्ल्क्ष करणे अशक्य असे. एकूण, एक उंचा पुरा देखणा ब्राह्मण. मराठी शाळेत शिकूनही इंग्रजी चांगले  बोलणारा. सोन्या माझ्या पुढे २  वर्ष.  

सोन्याशी माझी ओळख कशी झाली हे पक्के आठवत नाही पण तो माझ्या घरापासून १० मिनिटावरच असलेल्या नावलकर बिल्डींग मध्ये रहायचा, त्यामुळे  बऱ्याच वेळा एका बसचे आंम्ही प्रवासी होतो. मी तसा कमी बोलणारा जरी असलो तरी त्या पहिल्या  वर्षात आमची बस मैत्री तरी पक्की झाली. त्यानंतर मी त्याच्या घरी बऱ्याच वेळा पोहोचलो.

त्या काळात म्हणजे १९६२ साली जे जे कमर्शियलला सर्व चारही वर्गात मुले कमी असल्याने तिथे वर्ग भेद कधीच आड  नाही आला.

सोन्याची व्याख्या करायची झाल्यास मी एका शब्दात करेन. “आत्मविश्वास.” 

त्याच्या एवढा दांडगा आत्मविश्वास आजतागायत मी पाहिला नाही. त्याच्यातल्या आत्मविश्वासाला भीती माहित नव्हती तो ज्या ज्या ठिकाणी नोकरीत होता तेथील प्रत्येक एम डी चे पान त्याच्या शिवाय हलायचे नाही.

सोन्या पास झाल्यावर जगप्रसिद्ध कवी व उत्तम आर्ट डिरेक्टर श्री.अरुण कोलटकरांच्या सोबत कामास लागला व त्यांचा उजवा हात होऊन बसला, तो त्यांच्या शेवटा पर्यंत.  

१९६५ जे जे नंतर माझी सोन्याशी भेट झालीच नाही म्हणायला हरकत नाही.

मी १९६७ ला  पास झाल्यावर एम सी एम मध्ये नोकरीस लागलो व कॉलेज मधील सर्व मित्र दुरावले, कोणाशीच संपर्क राहिला नाही. सोन्याशी देखील नव्हता. 

सोन्यातील बऱ्याच गुणांपैकी एक उत्तम गुण म्हणजे कुणालाही मदत करणे, गरीब, श्रीमंत, काळा,गोरा हे भेद भाव कधीच त्यांनी बाळगले नाहीत. सोन्या त्यावेळेस बरीच एक्झीबिशन ची कामे करत होता  

आमच्या घरातील सोफा फारच खराब झाला होता, माझया ऐकीवात सोन्या फर्निचर देखील करतो आले होते, आमचे बजेटही फारसे नव्हते, मी सोन्याला फोन केला व सोफा करायचा आहे म्हंटले दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी मापे घेऊन नवीन डिझाईनचा सोफा सामानाच्या खर्चात करून दिला. हा त्याचा मदत करण्याचा गुण घेण्यासारखा.   

१९७० साली श्री कोलटकर एम सी एम मध्ये नोकरीस लागले. मी त्यांच्या कामातून बोध घेऊ लागलो असतानाच मला  बरोडा, हैद्राबाद, बंगळूर ह्या ऑफसच्या शाखा मधून कामासाठी पाठविले गेले

मी १९७३ साली पुन्हा मुंबईत परतलो. १ एप्रिल१९७३  रोजी सोन्याचे आगमन एजन्सीत झाले व पुन्हा आम्ही भेटलो. त्याच्यात वागण्यात काडीचाही बदल नव्हता.बदल होता पोशाखात.  खादीचा सदरा व पायात कोल्हापुरी एवढाच. एम सी एम मध्य येता क्षणीच  सोन्या सर्वांचा  एम डी पासून ते शिपाया पर्यंत लाडका झाला, तो केवळ त्याच्यातल्या  प्रेमळ स्वभावाने, त्याच्या स्वभावात जग मित्र होण्याचे चुंबक होते. जो कोणी भेटला तो मित्र झालाच समजा. 



सोन्याने ऑपेरा हाउस  सोडून सुमन नगरला जागा घेतली, या नवीन सुमन नगरच्या  घरी फ्यामिली रहाण्यास आल्यवर  मला घेऊन गेला, आम्ही सर्व जेजेतील मित्र त्याच्या नागाव येथील घरी  देखील राहून आलो. मी एक जवळचा मित्र झालो होतो. 

सोन्या एमसीएमला  नोकरीस लागला तेव्हां पासून रोज मला तो स्कूटर वरून पिल्लीयन दोस्त म्हणून ऑफिसला घेऊन यायचा.  आमचा रोजचा मार्ग  ग्रांट रोड ते कोलाबा  पोस्ट ऑफिस, वाटेत खयबर हॉटेल बाहेरील पानवाल्याकडे त्याला दिवसाला लागणाऱ्या पानांची पुडकी घेऊन ऑफिसला पोहचत असू. यात कधीच खंड पडला नाही. 

ह्या काळात सोन्याचे लग्न बिन बोभाटात झाले, आदले दिवशीचा  ब्रह्मचारी दुसरे दिवशी मी त्याच्या पाठी  स्कूटरवर बसताना, “अरण्या काल लग्न केले “ असे काही तरी पुटपुटला,मला ह्या बोलण्यात खरच किती तथ्थ्य असावे,ह्या विचारात ऑफिसला घेऊन आला.आठवड्यातच मी ज्योतीला भेटलो तेव्हांच त्या पुटपुटण्यातील तथ्य जाणवले.

ह्या मैत्रीत मला सोन्या कडून बरेच काही शिकायला मिळाले. थोडा फार माझा देखील आत्मविश्वास बळावला.१९७३ ला मी एमसीएम सोडली व पुन्हा एकदा आम्ही दुरावलो गेलो. अधून मधून,नाटकाला, शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाला एकमेकावर आपटत असू, सोन्या जग मित्र असल्याने  त्याची खबरबात मात्र मिळे. ह्या काळात त्याच्या दोन्ही मुलींचे विवाह झाले, एक अमेरिकेत स्थयिक झाली व दुसरी पुण्यात. सोन्या देखील पुण्यात स्थयिक झाला. मधून मधून अमेरिकेच्या वाऱ्यां असत. 

पुण्यात बस्तान बसवले तसे अधून मधून तो फोन न विसरता करे, “अरण्या कसा आहेस.”इथल्या तिथल्या गप्पा मारून अमेरिकेत काय काय केले ह्याचा वृतांत न विसरता देत असे.

अलीकडे म्हणजे गेले १/२ वर्षात त्याचा फोन मला न येता इतर मित्रांकडून बातमी समजे

त्याचे काहीतरी माझ्या बाबतीत काहीतरी बिनसले, कि कोणी कान भरवले असावेत, त्याचा फोन येणेही थांबले, मी एकदा प्रयत्न केला पण फक्त हुं हू चे हुंकारच ऐकावे लागले.

९जानेवारीला सोन्या गेल्याची बातमी आली.

माझ्या निस्वार्थी मित्रांच्या माळेतील आणखी एक मणी निखळला.

 

Friday, January 7, 2022

 ओळख.२०२२



 “वाटते सानुली मंद झुळूक
मी व्हावे,घेईल ओढ मन
तिकडे स्वैर झुकावे”




नवे वर्ष.  नवी ओळख. 

आज मितीला Blog ला ३ वर्षे होतील.

विचारांची भरकट मात्र तिच.
 
एक विचार सरकला कि दुसरा हजर. 
असो.

जाहिरात क्षेत्रांत या भिर भिरत्या, फिरत्या मनाचा हा स्वैराचार फार उपयोगी पडला.त्यामुळेच थोडे फार यश पदरात पडले.ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते ना राज कारण ,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,

हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा केवळ टाईमपास,आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात गेल्या २ वर्षा पासून digital drawings ची भर पडलीय.

हि चित्र देखील भन्नाट विचारांचा खचखोळ.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract विचार अथवा सेल्फ portrait असे समजावे.

माझ्या थोड्याशा वाचकांना हे नवे वर्ष सुखाचे, भरभराटीचे व निरोगी जावों 



चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...