दोन बाजू नाण्याच्या...
नाण्याला दोन बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. छापा म्हणजे चित्र आणि काटा म्हणजे नाण्याची किंमत. नाणं तेच असतं, पण बाजू दोन. आपल्या माणसाचंही असंच काही असतं.
कशी? स्वतःच्या अंतरमनाचा आरसा झाकून!
मोठं झाल्यावर लक्षात येतं की नियम वेगळे आणि व्यवहार वेगळा. आणि आपणही शिकतो, नियम कधी पाळायचे आणि कधी सोयीप्रमाणे वाकवायचे.
आपण एखाद्याला चांगला म्हणतो, तर दुसऱ्याच्या अनुभवात तोच माणूस वाईट असू शकतो. कुणासाठी तो देवमाणूस, तर कुणासाठी डोकेदुखी. मग नेमका खरा कोण? की दोघेही आपापल्या जागी बरोबर? फक्त चष्मे वेगळे!
आपल्याकडे महात्मा गांधींचंच उदाहरण घ्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान प्रचंड आहे. सत्य आणि अहिंसेचा संदेश त्यांनी जगाला दिला. पण त्यांच्या काही वैयक्तिक विचारांबद्दल, प्रयोगांबद्दल आणि निर्णयांबद्दल आजही चर्चा होते.
मग गांधीजींच्या कार्याचं महत्त्व कमी होतं का? की त्यांना महात्मा मानलं म्हणून त्यांच्या प्रत्येक विचाराला मान डोलवायची?
बहुधा एखाद्या माणसाच्या कार्याचा आदर करणं आणि त्याच्या प्रत्येक विचाराशी सहमत असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण शिकायला हवं.
जगाने काही व्यक्तींचे चेहरे आपल्या चलनी नोटांवर छापले. त्या चेहऱ्याला एक प्रतीकात्मक स्थान मिळालं. पण त्या चेहऱ्यामागच्या माणसाची खरी किंमत आपण कशी ठरवणार? त्याचं योगदान, त्याचे विचार, त्याच्या चुका आणि त्याच्या मर्यादा यांचं मोजमाप एका नोटेवरच्या चित्रातून होऊ शकतं का?
नाण्याच्या एका बाजूला चित्र असतं आणि दुसऱ्या बाजूला त्याची किंमत. पण माणसाच्या बाबतीत चित्र कोणतं आणि किंमत कोणती?
राजकारणात तर या दोन बाजूंचा खेळ रोजच दिसतो. निवडणुकीपूर्वी जनतेची सेवा करण्याच्या शपथा आणि निवडणुकीनंतर जनतेलाच आपल्या कामासाठी रांगेत उभं राहावं लागणं! भाषणात साधेपणा आणि प्रत्यक्ष राहणीत थाटमाट. विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका.सध्याचे पंतप्रधान आठवतात, असं अनेकांना वाटू शकतं. पण प्रश्न एखाद्या एका नेत्याचा नाही. प्रश्न आहे बोलणं आणि करणं यांतल्या अंतराचा. ते अंतर तपासण्याचा अधिकार जनतेला नक्कीच आहे.
एखादा अभिनेता उत्तम अभिनय करतो म्हणून तो उत्तम माणूस असेलच असं नाही. आणि एखाद्याच्या खासगी आयुष्यात दोष आहेत म्हणून त्याची कलाही नाकारायची का?आपण कलाकाराला त्याच्या कलेसाठी दाद देतो की त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला प्रमाणपत्र देतो? उत्तर काय?
मग माणूस चांगला की वाईट? त्याचं मूल्यमापन कसं करावं?
प्रत्येक माणसात चांगुलपणा आणि स्वार्थ, धैर्य आणि भीती, उदारता आणि संकुचितपणा यांचं काही ना काही मिश्रण असतं. कुठली बाजू केव्हा वर येते, हे परिस्थिती, स्वभाव आणि निवडींवर अवलंबून असतं.
दुसऱ्याच्या दोन बाजू शोधण्यात आपण फार हुशार असतो. त्याच्या चुका लगेच दिसतात; चांगल्या गोष्टी मान्य करताना मात्र हात आखडता घेतो. स्वतःच्या बाबतीत आपण आपल्याच वकिलाची भूमिका घेतो. चूक झाली तर परिस्थिती कारणीभूत. दुसऱ्याने तीच चूक केली तर त्याचा स्वभावच असा!
जिवंत माणसाच्या बाबतीत आपण त्याचं बोलणं ऐकतो, त्याची कृती पाहतो, त्याच्याशी आपले अनुभव जोडतो. पण माणूस गेल्यावर? तेव्हा त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधीही नसते. तरीही आपण त्याच्या आयुष्याची चिरफाड करायला मोकळे!
म्हणून सोशल मीडियावर शब्दांचे प्रहार करताना थोडं भान ठेवावं.
कारण...
दोन बाजू नानांच्याही...
