धबधबा
एक होता धबधबा.
तो रोज एका उंच डोंगरावरून कोसळत असे. वरून खाली येताना डोंगरातील खाचखळग्यांतून वाट काढत, छोट्या-मोठ्या दगडांवर आपटत, तुषार उधळत तो खाली येत असे.
एके दिवशी वाटेत झाडावर बसलेल्या कावळ्याने विचारले,
"अरे मित्रा, रोज पडतोस... दगडांवर आपटतोस... दुखत नाही का? हा हट्ट कशासाठी?"
धबधबा खळखळला.
"मित्रा, तू कधी असा विचार केलास का की त्या दगडांमुळेच माझे तुषार जन्माला येतात?"
कावळा थोडा गोंधळला.
धबधबा पुढे म्हणाला,
"मी एका सुंदर मोहिमेवर असतो."
"कोणती?"
"खाली माझी वाट पाहणारी माणसं माझ्याकडे काही क्षण बघतात...
आणि काही क्षणांसाठी त्यांची दुःखं, चिंता, थकवा विसरून जातात.
मी खाली येईपर्यंत पाणी असतो...
पण त्यांच्या चेहऱ्यावर पोहोचेपर्यंत आनंद झालेलो असतो.
म्हणूनच मी हा हट्ट सोडत नाही.
त्यांच्या आनंदातच मला माझा आनंद सापडतो."
कावळा काही क्षण शांत राहिला.
मग त्याने पंख हलवले...
आकाशाकडे पाहिले...
आणि मोठ्याने ओरडला—
"काव... काव..."
कदाचित ती त्याची दाद होती.
किंवा...
त्या मोहिमेत सामील होण्याचा त्याचा छोटासा प्रयत्न.
जगात अनेक धबधबे असतात.
बाहेरून पाहणाऱ्यांना ते सतत दगडांवर आपटताना दिसतात.
पण त्यांना माहीत असतं...
ते पडत नसतात.
ते कोणाच्या तरी आयुष्यात काही क्षणांचा आनंद निर्माण करत असतात.
बहुधा म्हणूनच काही धबधबे कधी थांबत नाहीत.