मिसिंग लिंक
एक वेडा विचार आला...
जावं ह्या रिमझिम पावसात भिजायला.
छत्री नको..मित्र नको...
रेनकोट नको...मैत्रीण नको...
फक्त पावसाशी दोन शब्द बोलायला.
पण पावसानेच विचार बदलला
रिमझिमचा रौद्रावतार झाला
मुंबई भिजली...
तुडुंब भरली...
आणि बघता बघता कुठे बुडाली नाही कळलं.
शाळा बंद.कॉलेज बंद.
ऑफिस बंद.
"वर्क फ्रॉम होम"ची घोषणा झाली.
या पावसाने काय काय केलं!
वाहून गेले रस्ते...
बंद पडल्या गाड्या...
थांबल्या रेल्वे...
उडाली नाहीत विमानं!
पण...
मात्र गोष्ट एक चांगली झाली.
आई-वडिलांची पुन्हा ओळख मुलांशी झाली.
...आणि मिसिंग लिंक घरात सापडली.
इतक्यात ब्रेकिंग न्यूज आली...
"हरवला... हरवला... मिसिंग लिंक हरवला!"
आत्ताच मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेला
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेला
तोच, तो.
हरवला
सापडल्यास त्वरित कळवावे.
पहिले बक्षीस...
नवीन पूल बांधण्याचे कंत्राट!
मी मात्र विचारात पडलो.
खरंच हरवला तो मिसिंग लिंकच होता का?
तसं...
आपण अनेक मिसिंग लिंक्स हरवत आलो आहोत?
माणूस आणि निसर्ग...
आई-वडील आणि मुलं...
शेजारी आणि पाजारी...
विकास आणि नियोजन...
सगळीकडेच...
कुठे ना कुठे...
एक मिसिंग लिंक आहे.
पावसाने फक्त...
सगळ्यांना जागं केलं.
सांभाळा...
आपापले मिसिंग लिंक्स.
माझं पावसात भिजायचं स्वप्न तसंच राहिलं.
घरी येताना नकळत ओठांवर जुनं गाणं आलं...
"रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेला...
पाणीच पाणी चहूकडे...
बाई... मिसिंग लिंक गेला कुणीकडे?"
No comments:
Post a Comment