मी: तू काय करतोस?
तू: काही नाही
मी: काही करत का नाहीस?
तू: मी आळशी आहे.
मी: तू आळशी का आहेस?
तू: कारण माझ्या जवळ
कळशी नाही, हाहाहा!!
मी: कसला फालतू विनोद करतोस?
तू: फालतू प्रश्नास फालतू विनोद हाहाहा!!
काही कर ना? पूर्वीसारखे?
तू: म्हणजे ?
मी: वाघाचे पंजे! हाहाहा!!
आता माझी टर्न फालतूपणाची!
मी: बरे चल थोडे सिरिअस बोलू.
तू: ओके,
मी: तू मागे कसा वेळ मिळाला की
सुंदर बासरी वाजवायचास किंवा
वाचलेल्या पुस्तकातील छान प्यासेजेस ,
नाटकाचे सवांद,कविता वाचून,
श्लोक, अभंग म्हणून दाखवायचास
फिल्मचे रिव्यू लिहायचास आणि बरेच काही
तुला असा आळशी बघायची सवय नाही,
अलीकडे तू एक प्रेमवीरा सारखा उदास
बसलेला असतोस, मी भेटल्यावर देखील
तुझ्याकडे, काय कशी आहेस? ह्या पलीकडे
डायलॉग नसतो. चल हो बघू पूर्वी सारखा.
तू: म्हणजे कसा? मला काही तरी पूर्वी पाठ केलेले
म्हणून दाखव, चल उठ हो जागा!
तू: नक्की?
मी: हो रे बाबा!
तू: तुला मी अनंत फ़ंदीचा फटका ऐकवतो.
ऐकलास कां कधी?
तुझा दुपट्टा दे,
मी: कशाला?
तू: असाला कि मसाला चार शिंगे कशाला? हाहाहा!!
बघत रहा. कसा जोशात सादर करतो!
तू: तुझा दुपट्टा दे, (दुप्पटा डोक्यास फेट्यासारखा बांधतो)
ऐक लक्ष देऊन.
बिकट वाट वहिवाट नसावी ,
धोपट मार्गा सोडू नको
संसारा मादी ऐसी आपुला
उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण, धरुनी निखालस,
खोटा बोला बोलूं नको,
अंगी नम्रता सदा असावी
राग कुणावर धरू नको
नास्तिकपणी तू शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मूठभर दाया मागे पुढती पाहू नकॊ
मायबापा वर रुसू दुर्मुखलेला असू नकॊ
व्यव्हारा मध्ये फसू नको...
आणि बरेच काही अंनतानी लिहिलंय
खरॊखरच फटका म्हणजे संसाराचे मर्म...
अरे, अर्धवट सोडू नको मला पण फटका ऐकून शिकायचंय
बरे तर ऐक,
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करु नको॥१॥
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसरयाचा ठेवा, करनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा धनाढ्याही, गर्वभार हा वाहू नको
एकाहन चढ एक जगामधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिब गरिबांला तूं गुरकावुं नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथां घेउं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शाहणयाचि परी मुर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आतां तुज गुजगोष्ट सांगतो. सत्कर्मा तूं टाकुं नको
सुविचारा कातरु नको, सत्संगत अंतरु नको
दैत्याला अनुसरु नको, हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती - नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको
तू : डोक्यात काही शिरले का? शिरायला आधी डोके लागते... हाहाहा!!
मी: खरंय तुझे... हा फटका एवढा जोरात बसलाय की रोज पठण करेन तेव्हां कुठे समजेल व त्यानांतर आचरणात आणणे आणखी कठीण. ते जाऊ दे समाधान एवढेच की तुला पूर्ववत बोलता केला. असाच आनंदात रहा या ओळी आता ¸लक्षात ठेव.
मायबापा वर रुसू नकॊ
व्यव्हारा मध्ये फसू नको...
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको
अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. त्यांचे आडनाव घोलप. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने यांचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. त्यांची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ हा त्यांचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून ते कीर्तन करू लागले, अशी आख्यायिका आहे. त्यांनी श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची यांच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या यांच्या काही लावण्या आहेत. त्यांचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता.