आमचे अण्णा (वडील) खूप हौशी होते.
त्यांना नवीन टेकनॉलॉजी बरोबर
आपण असावे अशी हौस.
माझ्या आठवणीत आमच्या घरी
टेलेफोन १९४८,मी ४वर्षाचा असल्या पासून
पहात आलो. जेव्हां संपूर्ण ल्यामिंगटन रोडवर
केवळ ३ फोन होते. शेजारी पाजारी आमचा नंम्बर
आपला असल्या सारखा मित्र मंडळीना देत असत,
त्यांना फोन आल्यावर बोलावणे हा आमचा
शेजारधर्म.फोन नंतर मोठी वस्तू कोठली आली
असेल तर ती म्हणजे LPरेकार्ड चेंजर आणि
रेडीओ. ३’उंच २’ रुंद आकाराच्या एका लाकडी
कपाटात ह्या दोन्ही गोष्टी बसविल्या होत्या
त्यास वर छान तीन आरसे बसवून दर्शनी ड्रेसिंग
टेबल दिसावे असे अण्णांनी स्वतः डिझाईन केले होते.
गाणी किवा रेडीओ चालू असल्यास आवाज
ऐकू यायचा पण कुठून पटकरून समजायचे नाही.
रेकार्ड चेंजर मध्ये एका पाठो पाठ ७ रेकॉर्ड्स लागायच्या.
आम्हा सर्वाना गम्मत वाटायची ती एक रेकॉर्ड संपली की
राहिलेल्या रेकॉर्डस पैकी एक रेकॉर्ड संपलेल्या रेकॉर्डवर पडायची
मग चेन्जरचा पिन असलेला हात हळूच येऊन त्या रेकॉर्डचे गाणे लावायचा.
त्या बालवयात ऐकलेली गाणी
आज हि मनात ताजी तवानी आहेत.
“यमुना जळी खेळूखेळ कन्हया”...
“परवशता पाश दैवी”...
“एक तत्वनाम दृढ धरी”...
“दर्यावर डोले माझे चिमुकले घरकुल”...
“दत्त दिगम्बर दैवत माझे”...
“दर्या फोफावला माझे ग तारू”...
“चल ग सखे वारूळाला”...
“रमला कुठे ग कान्हा”...
“नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू”...
“कल्पवृक्ष कन्येसाठी”...
“दादा मलां एक वहिनी आंण”...
ज्योत्स्ना भोळे, भीमसेन, माणिक वर्मा,
गंगुबाई हंगल, दिनानाथ मंगेशकर, बाल
गंधर्व,
माधव वाटवे, पराडकर,पु ल, लता, आशा,
सुधीर फडके, अशा उत्तम गायकांना
ऐकत आन्ही लहानाचे मोठे झालो.
३०० हून अधिक LP’sआमच्या
त्या ड्रेसिंग टेबलच्या पोटात दडल्या होत्या.
ती ऐकूनच संगीत ऐकण्याची आवड निर्माण झाली.
गाण्याचा गळा काही नव्हता पण ऐकून
शिळेवर गाणी म्हणावयाची सवय मात्र
६व्या वर्षापासून लागली ती आजतागयात कायम
काम करताना स्वतःचे मनोरंजनाचे उत्तम
साधन.
कालान्तराने रेकॉर्ड चेन्जरची ट्रानझीस्टरने जागा घेतली
LP’s वरील गाणी आता ट्रानझीस्टरवर ऐकणे सोपे झाले होते.
रेकॉर्ड प्लेयर नादुरुस्तझाला. अण्णा गेल्या नंतर
त्याचा वापर ड्रेसिंग टेबल म्हणूनच वाढला,जसे कुटुंब वाढले तसे
आम्ही प्रत्येकाने आपापले वेगळे संसार थाटले.
आजमितीला चेंजरचे माझ्या धाकट्या भावाने
चेहरा मोहरा तोच ठेऊन सुंदर पैकी खण
असलेले कपाट बनवले आहे. मला मात्र त्याकडे
पाहील्यावर बालपणीच्या आठवणीना मनात उजाळा मिळतो.
नकळत मनोमनी प्रत्येकवेळेस एकच ओळ रेंगाळते
‘आहा ते सुंदर दिन हरपले’.