१९६२
एका रटाळ १५० मुलांच्या वर्गात, विज्ञान शाखेत १ अपयशी वर्ष घालविल्यानंतर, जे जे च्या सुंदर वास्तूत प्रवेश केला व प्रेमात पडलो. आता हेच आपले देऊळ मानून शिकायचे ठरविले. प्रवेश मिळविणे तसे कठीण गेले,पण वडिलांचा आशीर्वादाने तेही शक्य झाले.केवळ ४० मुलांना एका वर्गात प्रवेश, एकूण ४वर्ग सर्व मिळून कमर्शिअलचे १६० विद्यार्थी.
जेजे कमर्शिअलची इमारत पाहून कोणीही आकर्षित होईल, गेट मधून प्रवेश केल्यावर एक मोठे शिल्प त्या पाठीमागेच उभी असलेली हि एक मजली टुमदार वास्तू.( त्या काळी) प्रवेश मिळवण्यासाठी त्या काळात ड्रॉईंग च्या २ परीक्षा आवश्यक होत्या, नशिबाने मी त्या दिल्या होत्या व सीग्रेड मिळवून सर्टिफिकेट मिळवली होती.गेट मधून पाय आत टाकला समोरची वास्तू पाहून आनंद झाला.इमारतीतप्रवेश केला व पहिल्या मजल्यावर असलेल्या डीन श्री.दादा अडारकरांच्या केबिन बाहेर असलेल्या सोफ्यावरआत बोलवण्याची वाट पहात बसलो. काही तासांनी मला दादांनी आत बोलवले माझी सर्टिफिकेट व एस एस सी त लावलेला दिवा पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या माझ्या चेहऱ्या कडे वरती पाहून नकारारार्थी मान हलवायच्या आधीच मी शिताफीने महान चित्रकार श्री देऊस्कर ह्यांची चिट्ठी पुढे केली. दादांनी माझ्याकडे पहात चिट्ठी उघडली वाचून म्हणाले ठीक आहे वेटिंग लिस्टवर नाव टाकतो कोण सोडून गेले तर प्रवेश मिळेल मी ठीक म्हणून निराशेनेच घरी आलो. दुसरे दिवशी पुन्हा गेलो वेट लिस्ट लागली होती व माझे नावही होते,बोर्डाला नमस्कार केला व तळ मजल्यावरील खिडकी खालील फळी वर जाऊन बसलो पाय काही घरी जाण्यास तयार नव्हते, फायनल लिस्ट लागायची होती. कॉलेज चालू असल्याने येणाऱ्या मुलामुलींचे आनंदी चेहरे पाहून मलाही माझ्यात स्फुरण आल्यासारखे वाटले. उगाचच ३ वाजे पर्यंत बसून राहिलो पण सार्थक झाले. लिस्टच्या बोर्ड वर शिपायाने येऊन नवीन फायनल लिस्ट चिकटवली मनातून धावत जाऊन बघावेसे वाटले पण संयम राखून शांतपणे बोर्ड जवळ चालत गेलो फायनल लिस्ट मध्ये माझे नाव दिसले व आनंद गगनात मावेना. मनाशीच ठरविले माझे स्वप्न ध्येय आता पूर्ण होणार.
कॉलेजचा पहिला दिवस.
आजही कालच्या प्रसंगा सारखा डोळ्यासमोर सरकला.मी वर्गात प्रवेश केला वर्तुळाकारात डेस्क लावले होते एक दोन मुलगे व मुली बसल्या होत्या. मीही आत शिरलो कुठं बसावे ह्या विचारात असताना एका मुलाने हात करून शेजारच्या डेस्क कडे हात केला, मी त्या दिशेने गेलो त्याच्या शेजारील रिकाम्या डेस्कच्या बाकड्यावर बसलो, त्या मुलाने स्मित हास्याने स्वागत केले, मुलगा उंच व खूपच शीड शिडीत, हसरा चेहरापाहून मलाही बरे वाटले
त्याच्यात नावडण्यासारखे काहीच नव्हते. मी बसल्यावर त्यांनी आपली ओळख स्वतःहून करून घेतली मी 'राजाराम भानजी ' व हात पुढे केला माझा हातही पुढे झाला व मी 'अरुण काळे'. ही आमची
हातमिळवणी काल २५ मे २०२३ ला राजाराम गेल्याचा फोन आला तेव्हां सुटली. तब्बल ६० वर्षे ही मैत्री राहिली कधी आम्ही भांडलो नाही एकमेकाला विसरलो नाही, एक मेकाच्या आयुष्याचे भाग बनून राहिलो यश अपयशाचे दुःख वाटले तसे आनंदाचे क्षण अधिक वाटले.
प्रत्यक्ष भेटी मात्र राजाराम गेल्या ४/५ वर्षात आजारी पड्ल्याप्सून फोनवर व्हायला लागल्या, पुढे त्याही त्याच्या श्वासाच्या प्रॉब्लेमने कमी झाल्या, शेवटचे बोलणे झाले ते एप्रिल सुरवातीस.
राजाराम माझा 'मारुती' सारखा भक्त होता. अरुण जे बोलेल तो त्याच्या साठीअखेरचा शब्द.
त्याला मी कधीही इतर मित्रां प्रमाणे 'राजा' हाक नाही मारली माझ्यासाठी तो 'राजाराम.च राहिला. राजाराम एक उत्तम फोटोग्राफर होता पण त्याला मिळावे तेवढे यश काही मिळाले नाही, पण राजारामला त्याचे दुःख कधी वाटले नाही किवां त्यांनी कधी बोलूनहीदाखवले नाही.
राजारामचा हात आता कायमचा सुटला.
No comments:
Post a Comment