Monday, July 31, 2023

चालताना आता झुलायचे

 


कविवर्य श्री. मंगेश पाडगावकर यांच्या सुप्रसिद्ध कवितेने स्फुरणलेली गुंफण.

दिवस आपले सांभाळायचे,
एकमेकास जपावयाचे

चालताना आता झुलावायचे  
एकमेका सांभाळायचे

दिवस आता विस्मरणाचे 
डोक्यावरील चष्मा शोधावयाचे 
तारीख वार न आठवण्याचे 

समोर एकमेका पाहून
"कोण तू" म्हणून विचारायचे.
डोक्या वरील चष्मा 
नाकावर सरकवीत निरखायचे
मिश्कीलपणे डोळे मिचकावयाचे
दिवस आता घालवायचे 
एकमेकास हसविण्याचे

तुझ्या खोकल्याला 
सिरप मी पाजावयाचे
माझ्या पाठीस तू शेकावयाचे
दिवस आपले सांभाळायचे,
एकमेकास जपावयाचे 

अगणित वेळा ऐकवलेल्या 
एकमेकाच्या हुशाऱ्या 
एकमेकास ऐकवून
दिवस आता घालवायचे 
एकमेकास खुश करायाचे

आणखी एक दिवस सरला,
स्वगताने समाधान मानावयाचे
एकमेकांच्या सोबतीने 
दिवस आता घालवायचे 

वेळ झाली कि बसल्या जागी पेंगायचे,
समोरून 'आत झोपता का?'
पृच्छा आल्यास मानेने नकार देऊन
तरतरी आणल्याचे नाटक करायचे 

समाधानाने अंथरुणावर पडावयाचे
फिरत्या पंख्याकडे डोळे लावून
निद्रा नाशाला अंगाई गीताने रिझवायचे

एकमेकांचा श्वासाचा अंदाज 
घेत सूर्योदया बरोबर उठायचे 

वर्तमानात श्वास घेत
भूतकाळातील गुंता सोडवीत 
स्मितहास्य करीत सरत्या 
भविष्याचे स्वप्न बघावयाचे
एकमेकास जपावयाचे

आल्या दिवसास सामोरे जात 
भास्कराचे स्वागत करायचे,
मागील पानावरुन पुढे चालू
स्वगताचे पालुपद गुणगुणायचे

दिवस आपले सम्भाळायचे,
एकमेकास जपावयाचे

दिवस आपले आता आठवणींचे 
झोपाळ्याविना झुलायचे


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Tuesday, July 18, 2023

वावटळ

 वावटळ 

अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे

डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    

1} तुझ्या कडे पहात मनातील सर्व प्रश्न, 

 चुटकी सरशी नाहीसे होतात की सुटतात? 

अशी  काय जादू आहे तुझ्यात?  

इतरांमध्यें का नाही? 


2} आणखी एक दिवस उजाडला 

हात लिहिताना नाही थरथरला!

हस्ताक्षर उगाचच हसू लागले.


3} "कोणास ठाऊक?"

ह्याचे उत्तर, पहा प्रयत्न करून सापडते का?

हा प्रश्न विषय सम्पवायचे एक उत्तम शस्त्र 

पहा वापरून समोरचा घायाळ होऊन जाईल.

"कोणास ठाऊक?"

हा प्रश्न म्हणजे"कापूस कोंड्याची गोष्ट"

"आज पाऊस पडेलसा वाटतो",

"कोणास ठाऊक?" 

"मुख्यमंत्री  बदलेल का हो?"

"कोणास ठाऊक?" 

थोडक्यात "कोणास ठाऊक?"

हा प्रश्न म्हणजे कुलूप,

अथवा 

"मला तुमच्याशी बोलावयाचे नाही."

4] नाते 

एक नसुटणारा गुंता,

कधीही ना सुटणाऱ्या 

अहंकाराच्या गाठी,

 एक वेळ दोन देशातील तंटे बखेडे मिटतील 

पण नात्यातला  तिढा सुटणे 

रुसवे फुगवे दूर होणे,

पिढ्या न पिढ्या अशक्य.

 कारण... 

अतिशय शुल्लक असते 

पण अहंकार हिमालया एव्हढे उंच. 






 


Tuesday, July 11, 2023

मी हे करावे का?



 मी हे करावे का?


मी समीक्षक किंवा व्यावसायिक लेखक नाही. वाचकांना माझे लेखन कसे समजेल याची मला खात्री नाही. कित्येक वर्षांपूर्वी, एका दिवशी, मला माझे विचार कागदाच्या कोऱ्या पेपरवर ओतणे भाग पडले. त्या क्षणी, मी काय लिहिले ते मी वाचले नाही. 

त्या संध्याकाळी, मी खरडलेला पेपर उघडला आणि त्यावर खरडलेली अक्षरे मला आवडली, आकर्षक वाटली. त्यांच्यात असंबंधित विचारांचा समावेश होता, जो माझ्या डोक्यात सारखा फिरत असतो. ह्या वेड्या विचारांनीच मला ब्लॉग चे नाव 'खचखोळ' ठेवण्यास प्रेरणा दिली. होय. 

मी माझा ब्लॉग माझ्या मित्र मंडळात कधीही प्रसारित केला नाही, सोशल मीडियाचा वापर केला नाही, माझे कोणतेही अनुयायी नाहीत, परंतु माझे ब्लॉग वाचणारे सरासरी 7/8 वाचक आहेत. हे वाचक कोण आहेत आणि त्यांना ब्लॉग आवडतो की नाही हे जाणून घेण्यासाठी माझ्यासाठी कोणतीही टिप्पणी/सोडत नाहीत. मनमोकळेपणाने आणि कोणत्याहीs अडथळ्याशिवाय लिहिणे मला आवडते.

आज ह्या ब्लॉगद्वारे मी ह्या तूट पुंज्या वाचकांना विनंती करतो कृपया कॉमेंट लिहा जेणे करून मc स्वतःला सुधारता येईल व थोडे प्रोत्साहन देखील मिळेल.

'खचखोळ'  हा मराठी शब्द कोणत्याही थेट संबंधाशिवाय विविध वस्तूंच्या संग्रहाला सूचित करतो. ही संकल्पना माझ्या मनातील विचार ज्या पद्धतीने मार्गक्रमण करतात, त्यात सामंजस्याचा अभाव आहे. अनेक वर्षांच्या आत्म निरीक्षणा  नंतर मी कारण शोधून काढले. ते म्हणजे मला एखाद्या गोष्टीत ५ मिनीटावरती एकाग्र होता येत नाही. हा विदयार्थी दशेपासुन भिनलेला दुर्गुण आज मला गुण वाटतोय.

अलीकडे, मी हे ब्लॉग्ज सोशल मीडियावर प्रकाशित करावे की नाही याचा विचार करत आहे, परंतु माझ्या मनात संघर्ष कायम आहे. मी अजून कशाबद्दल अनिश्चित आहे. 

माझ्या तुटपुंज्या वाचकांनो मी नम्रपणे तुमचे मत विचारत आहे.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.



Monday, July 10, 2023

'जागृती'

 


७ /१0/२३

जागृती' 
आज ब्लॉग लिहायची सकाळीच खाज आली,पण काय लिहायचे हे नक्की होत नव्हते, एव्हढ्यात अंजलीने विचारे अहो २७ नव्वे किती? मी तिचा 'किती?' हा शब्द ऐकण्या आधीच उत्तरलो त्रेचाळीसदोन. क्लिक ... ब्लॉगला विषय मिळाला.माझे २ ते ३० पर्यंत पाढे तोंड पाठ कसे झाले,ह्याचा एक मोठा किस्सा आठवला. 

साल १९५४ मी, इयत्ता ५वी त होतो, शाळा व वर्गातील मुले नवीन असल्या कारणाने व मी अबोल असल्याने फारशी मैत्री कोणाबरोबर झाली नव्हती. आमची तिमाही परीक्षा नुकतीच सम्पून आम्हाला रिपोर्ट कार्ड मिळण्याचा दिवस उजाडला, त्या दिवशी मी पेपर चांगले गेल्याने  खुशीत वर्गात प्रवेश केला. आमच्या वर्ग शिक्षिकेने प्रगती पुस्तकांचं गठ्ठा घेऊन वर्गात प्रवेश केला.त्यांच्या हातातिल गठ्ठा पाहून कुजबुज सुरु झाली. बाईंनी रोल नम्बर प्रमाणे प्रगती पुस्तक वाटण्यास सुरवात केली. माझे नाव पुकारले मी थोडा भीत भीत जाऊन प्रगती पुस्तक घेतले.त्यांच्या टेबल पासून माझ्या जागेवर येताना मी हळूच प्रगती पुस्तक उघडून पाहिले व गप्प पणे जागेवर येऊन पुस्तक पाकिटात घुसवले. आता इतर मुलांचं आपसात होणारा गोंगाट माझ्या कानात पुसटयेऊ लागला मी आता शाळा कधी सुटते त्याची वाट पहात होतो.
त्या काळात भावन्डे बहुतकरून एकाच शाळेत प्रवेश घेत. माझा मोठा भाऊ आनंद ७ वीत होता, शाळेत त्यांनीच माझा प्रवेश मिळवला होता. मी नुकताच नवीन शाळेत आलो होतो म्हणून आमचे येणे जाणे बरोबर असे.
त्या दिवशी शाळा सुटल्यावर दादा माझ्यासाठी थांबला होता, मी जवळ येताच त्यांनी प्रगती पुस्तक मागितले. काही न बोलता मी पाकिटातून काढून त्याला दिले. गणितात झालेला माझा रक्तपात पाहून तो दचकला, मला विचारले हे काय? मी काहीही न बोलता प्रगती पुस्तक त्याच्या कडून घेतले व पाकिटात ठेवले. त्याचा चेहरा गंभीर झाला .आम्ही त्या वेळेस लॅमिंग्टन रोड वर राहत होतो,आमच्या रस्त्यावर एकूण ३ थिएटर लागायची, शाळेच्या वाटेवरच होती, इंपिरियल, नाझ, व स्वस्तिक येतायेता सिनेमाची होर्डींग्ज बघायला मला आवडत असे. दर शुक्रवारी नवीन सिनेमा लागत असे. पहिला शो बघण्यास गर्दी खूप असे.

त्या दिवशी देखील शुक्रवार होता येताना होर्डींग्ज बघत आलो, माझे लक्ष स्वस्तिक सिनेमाच्या होर्डींग्ज वर गेले तेथे 'जागृती'  सिनेमाचे पोस्टर पाहून मला तो बघावासा वाटला, दादाला विचारले आपण जाऊया का? दादाने माझ्याकडे काळजीनेच पाहिले मी मात्र खुशाल होतो गणिताच्या मार्कांच्या काळजीचा चेहऱ्यावर लवलेशही नव्हता.

आम्ही घरी आलो निकाल मिळाल्याचे कोणास बोललो नाही,दादा बिचारा चांगले मार्क्स मिळवून देखील गप्प राहिला.
जेवण झाल्यावर मी आमच्या अण्णांकडे 'जागृती'चे पिलू सोडले व पाच रुपये मिळवले. दादा माझे धैर्य पाहून थक्क झाला. मी व दादा ३ वाजताच्या खेळासाठी निघालो, तसे थिएटर  एका ढेंगेवर होते पण सिनेमाचा पहिला दिवस म्हणून थोडे लवकर, वर पोचलो पण सिनेमा हाऊस फुल्ल. ब्लॅक मार्केट वाले फॉर्मात होते १२आण्याचे तिकीट २.५०रुपयांना विकत होते. माझी मूठ शिवशिवत होती तिकीट घेण्यासाठी पण उरलेले पैशे अण्णांना  परत द्यायचे होते एव्हढ्यात एक ब्लॅकवाला ५ आनेका तिकीट  १.२५रु. ओरडत आला, मी काही विचार न करता त्याला थांबवून २ तिकिटे घेतली, दादा माझ्याकडे पहातच राहिला. एकदाचा काळोखात प्रवेश केला तिकिटावर टॉर्च ने आम्हाला रस्ता दाखवत 
डोअरकीपरने पहिल्या रांगेत नेऊन बसवले. मला तसा फारसा फरक पडला नाही पण सम्पूर्ण सिनेमा मानवर करून पहिला.आम्हा दोघांनाही तू खूप आवडला.वाटेत दादाने हळूच विचारले अण्णांची सही प्रगति पुस्तकावर कधी घेणार मी बिनधास्तपणे त्याला म्हंटले "अरे ८ दिवसाने आणायला सांगितलेय" घेईन सही तोपर्यंत. त्या रात्री मी सिनेमाचा विचार करत शांत झोपलो देखील.  दादा मात्र त्या रात्री माझ्या गणितातील पराक्रमाला घाबरून झोपला नाही. 
खरोखर मी पराक्रम, प्रताप, अशक्य ते शक्य केले होते. मला गणितात शंभर पैकी 00असे दोन शून्य मिळाले होते व त्या खाली वर्ग शिक्षिकेने दोन लाल रेषा देखील मारल्या होत्या. हा विक्रम आज पर्यंत कुटुंबात कोणीही मोडू शकलेला नाही. मोडेल असे वाटत नाही.
दुसरे दिवशी सकाळी दादाचे पेंगुळलेले डोळे पाहून मला वाईट वाटले. 

आता पुढची लढाई म्हणजे अण्णांची सही घेणे, कशी, कधी घ्यावी ह्या विचारात शाळेत निघालो.जिने उतरून रस्त्यावर ७/८ पावले टाकली आणि 'दानव' पावला. रस्त्यावर थोड्या गर्दीतून फेरीवाल्याचा आवाज येत होता,
'काली हो या निलि  आसनीसे मिटाओ अपनी गलती." वयातील कुतूहलाने गर्दीत डोके खुपसले फेरीवाला कागदावर काही तरी लिहून ते छोट्याबाटलीत असलेल्या द्रव्याने ते पुसत होता, कागद पहिल्या सारखा स्वछ होत होत. शैतानीआयडीया ने माझ्या डोक्यात  एन्ट्री मारली. 
मी खिशातून ४ आणे काढून १ बाटली विकत घेतली. माझ्यात घुसलेल्या शैतानाने शाळेच्या बिल्डिंग पाठी जाऊन काम केले. मिळालेले 00 चे रूपांतर ३३ मध्ये झाले, करताना हात थोडा थरथरला. संध्यकाळी शाळेतून घरी आल्यावर अण्णानचा मूड बघून प्रगती पुस्तकावर सही  घेतली,अण्णांनी गणितात लक्ष देण्याबाबत दरडावले त्यास मान डोलावून होकारही दिला. मनातला ससा आता पुढची काळजी करत होता. आता पुन्हा एकदा पाप करावयाचे होते.३३ चे 00 करावयाचे  होते. दुसरे दिवशी शाळेत पोहचल्यावर पुन्हा बिल्डिंग पाठी गेलो व जादू च्या रसायनाने पाप पुसून पूर्ववत 00 करण्यास गेलो आणि आधी केलेल्या जागी पेपर केमिकल रिऍक्शनमुळे थोडा नाजूक झाला होता तो फाटला कपाळावर हात मारून 00 कसेबसे पुन्हा लिहिले व प्रगती पुस्तक बाईंच्या टेबलावर इतर प्रगती पुस्तकांमध्ये घुसवले. तास सम्पला बाई प्रगती पुस्तकांचा गठ्ठा घेऊन गेल्या आणि मी सुस्कारा टाकला व स्वतःशीच सुटलो म्हंटले.

दुसरे दिवशी वर्गात जागेवर बसतो न बसतो तोच बाईंनी वर्गात प्रवेश करता करता मला उभे रहाण्याची खूण केली मी समजलो 
आता आपली खैर नाही. मुले स्थानापन्न झाल्यावर बाईंनी वर्गास सम्भोदून बोलण्यास सुरवात केली, 
त्यांच्या हातात माझे प्रगती पुस्तक होते मला कुठे लपावे कळेना "मुलांनो हे पहा आपल्या वर्गातील रत्न आणि हा त्याचा पराक्रम,"00 मिळवून वरती आपल्या पालकांना फसवण्याकरिता ह्याने त्याचे ३३ मार्क केले, कसे ते तुम्ही त्याला विचारा  पण त्याचे अनुकरण करू नका. मग मला बोलवले व दमात वडिलांची चिठ्ठी खऱ्या सहीने घेऊन येण्यास सांगितले न आणल्यास वर्गात प्रवेश नाही असे दरडावले. 
घरी येताना दादाने माझा हिरमुसलेल्या रडका चेहरा पाहून  विचारे काय झाले, तो पर्यंत त्याला माझ्या पराक्रमाची कल्पना नव्हती. दादाला सर्व प्रकार वाटेत सांगीतला त्याने प्रगती पुस्तक पाहून मला आता अण्णांचा मार खाण्याची तयारी ठेव सांगितले. त्या संध्याकाळी घरात इतर भावन्डाना, आईला माझा प्रताप कळला व मी आता मार खाणार हे भाकीत सर्वानी केले. 

मी थोडीशी शक्कल लढवली शाळे निघायच्या  अर्धा तास आधी अण्णांच्या टॉवेलचे फटके खाण्यास सज्ज झालो झालेला प्रकार पाहून अण्णांनी फटके दिले व चिट्ठीही दिली. अण्णांचे माझ्यावरील विशेष प्रेम असल्याची मला जाणीव झाली.

मनाशी गाठ बांधली, ह्या पुढे आयुष्यात गणितात प्राविण्य मिळवायचेच. दादांनी मला काही दिवस गणितातले बारकावे समजवले. मला आता गणित हा विषय भाषे नंतरचा आवडता विषय म्हणून आवडू लागला. पुढील ६ वर्षे बोर्डाच्या परीक्षेत देखील मी ८०च्या खाली गणितात मार्क घेतले नाहीत. हा किस्सा असा काही माझ्या आयुष्यातील मोठा किस्सा जो मला गणिताची कायम 'जागृती' देऊन गेला.

त्याच बरोबर पाहिलेला "जागृती" चित्रपट बरेच काही शिकवून गेला, ५० वर्षाने देखील त्यातील बरीचशी गाणी मी आजहि गुणगुणतो.
दे दि हमी आझादी खडग बिना ढाल 
साबरमती के संत तुने कर दिया कमाल.


 


   


   

 
 







  
  

Sunday, July 2, 2023

आज गुरु पोर्णिमा!


 आज गुरु पोर्णिमा!

वर्षातून गुरुचे एकदा दर्शन घेण्याचा दिवस .गुरु कोणाला म्हणावयाचे?
"आई वडील सर्व प्रथम गुरु" 
त्यानंतर माझे अस्तित्व सुरु
माझ्या अस्तित्वास आकार दिला माझ्या 
शालेय, विद्यालयातील गुरुजनांनी, नंतर
माझ्या आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर भेटलेल्या 
अनेक गुरूनी , 
यातील अनेक गुरु आज चंद्राने नेले. 
प्रत्येक गुरुपोर्णिमेस, 
चंद्र अधिक तेजोमय दिसू लागला. 
आता हे विश्वची माझे गुरु.
या विश्वात येणाऱ्या सर्व  गुरुपोर्णिमेस 
माझा चंद्रास नमस्कार,
मी करतो माझी गुरुपोर्णिमा साकार. 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...