Saturday, September 9, 2023
पितृछत्र
Friday, September 8, 2023
मी पाहिलेलाअनभिषिक्त राजा
मी पाहिलेला अनभिषिक्त राजा
जे जे मध्ये १९६२ मध्ये प्रवेश करून २/३ महिने गेल्यावर वर्गातील सर्व मुलांची एकमेका सोबत ओळख झाली होती.
माझी काहीं बरोबर तोंड ओळख, काहीं बरोबर छान मैत्री.
अगदी नावेच घ्यायची झाली तर मित्र म्हणजे राजाराम भानजी, चंद्रकांत शेठ, जगदीश पुळेकर, दिनेश परुळेकर,सुहास तवकर,सैनी,भाटलेकर आणि मुलींमध्ये आशा पोतदार, सरला पप्पू , शामला हेमाडी, चित्रागुप्ते , नीलम गडकरी, आणि बऱ्याच मुली. ह्या सर्व मित्रां मध्ये जगदीश,दिन्या बरोबर एक हसरा हँडसम चेहेरा मी बघत असे ज्याची माझी तोंड ओळख होती. मला त्याचे स्मित खूप प्रसन्न वाटायचे. हा चेहरा वर्गात दिवस भर नसायचा. मधून मधून गायब व्हायचा, नंतर मला कळले तो बाहेरची कामे करतो. तो हसरा चेहरा म्हणजे राजा.
६३ मार्च मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत मी नापास झालो, मी पुन्हा ऍडमिशन घेतली माझ्या बरोबर नापास झालेली मुले देखील पुन्हा वर्गात दिसली. तो हसरा चेहरा म्हणजे राजा देखील दिसला. मला थोडे आश्चर्य वाटले, मी जग्याला विचारले तेव्हां मला कळले की राजा परीक्षेस बसला नाही.
हा नवीन वर्ग व त्यातील विद्यार्थी पहिल्या दिवसापासून एकमेकांशी जुनी ओळख असल्या प्रमाणे मित्र झाले. आम्ही सर्व एकीने वागत असू. एक दुसऱ्यास मदत करणे हा धर्म होता. आमच्यात पुरुष स्त्री हा फरक नव्हता. दांडी मारून सिनेमाला जायचे तर पूर्ण वर्ग एकत्र जाई. वर्गात मस्ती करायची तर ती देखील एकत्र, ह्यात महत्वाचे म्हणजे आम्ही सर्व सबमिशनला पक्के होतो, मग काम चांगले वाईट का असेनात ते वेळेवर देणे सर्वांसाठी महत्वाचे. त्यामुळे आमचा वर्ग सर्व सरांचा आवडता. ह्या सर्व गोष्टीत राजाची साथ होती.राजा मात्र पूर्वी सारखाच महिन्यातून आठवडा भर तरी गायब असे.जस जशी राजा बरोबरची माझी ओळख वाढली तसे राजा बद्दल असलेले कुतूहल उलगडू लागले. राजा आपल्या शिक्षणाचा व इतर खर्च स्वतः फ्री लान्स कामे मिळवून करत असे. त्यासाठी तो वेळोवेळी वर्गात गैरहजर असे, आपल्या परिस्थितीचा मागमूस मात्र त्यांनी कोणाला कधीच लागू दिला नाही. राजा फार जिद्दी व अपार मेहनत करणारा, मित भाषी, प्राध्यापकांचा आवडता. त्या वेळेस तो आचार्य अत्रे, एस एम जोशी, जॉर्ज फर्नांडिस ह्या सारखी मोठी राजकीय नावे घेत असे, मला त्याचे कौतुक वाटायचे. (ह्या व्यक्तीं बद्दल गेल्या २/३ वर्षात राजाच्या ब्लॉग मधून बरेच बौद्धिक मिळाले.)
फर्स्ट इयर ते फोर्थ इयर, राजा ढगा आड गेलेला चन्द्र पुन्हा ढगाबाहेर डोकावतो, तसा कधीकधी दिसायचा. आला की सर्वांमध्ये मिळून मिसूळून असायचा. राजा कुठे रहायचा मला तरी माहित नव्हते ते अलीकडे मला त्याच्या एका लेखात उलगडले. मी मात्र राजा दिसला की कुतूहलाने त्याचे नवीन अनुभव व गोष्टी ऐकण्यास उत्सुक असे.
असो ४ वर्षे कशी सरली कळाले नाही वर्गातील ४० मुले ४० दिशाना नाहीशी झाली. आम्ही काही मुले मात्र शिवाजी पार्कच्या नाक्यावर/ कट्ट्यावर भेटत असू. अचानक एक दिवस दिन्या परुळेकरने बातमी आणली राजा कॉलेज मध्ये लागला.
मधली अनेक वर्ष राजाच्या बातम्या मिळणे कठीण झाले. कारण होते गव्हर्नमेन्टला आलेला झटका, एकाच शहरात न शिकविता प्राध्यपकांनी महाराष्ट्रातील असलेल्या सर्व आर्ट स्कूल मध्ये शिकवणे जरुरीचे आहे. ज्याना हे मान्य नव्हते त्यांनी ह्या बदलीच्या संगीत खुर्चीत भाग न घेता नोकऱ्या सोडल्या. पण राजा पुढे ध्येय होते, त्याची ट्रान्सफर नागपूरला झाली त्यांनी ती स्वीकारली, त्याची खुशाली मिळणे कठीण झाले.याच सुमारास काही वर्षात जुने प्राध्यापक निवृत्त झाल्याच्या बातम्या मिळत होत्या,
राजा डीन झाल्याची बातमी ऐकून शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरील आम्हा सर्वाना आनंद झाला. राजाचे गुण गान सुरु झाले, प्रत्येकानी आपले राजाबरोबरचे नाते कसे होते ह्याचे कथा कथन देखील केले. नक्की असे आठवत नाही पण मी फोन वर अभिनंदन केले असावे. राजाने जिद्दीने ते सिंहासन जिंकले होते. आम्हा वर्ग मित्राना नुसता आनन्द नाही तर अभिमान वाटला.
राजाने सिहांसनाचा माज कधी दाखवला नाही.
राजा मित्रांना विसरला नाही,एके संध्याकाळी आमच्यासाठी त्यांनी मित्र भोजन आयोजित केले.त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते मी हे जिंकले आहे. तो आता डीन असल्याने,पूर्वी ज्या बंगल्यात किपलिंग, जंगल बुक चे लेखक यांचे वास्तव्य होते तेथे रहावयास लागला होता. आम्हा सर्वाना त्यांनी बंगल्याची एक छोटीशी गायडेड टूर पण करवली.
राजाच्या बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे, गजानन किर्तीकर, सुरेश जैन, प्रतापराव पवार, एस.पी. गोदरेज, टाॅम आल्टर, सारखी मोठी नावे पाहूणचार घेऊन गेली होती, अतूल भातखळकर, माधवराव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, कुमार कदम, सुधीर नांदगावकर, तसेच किरण ठाकूर अश्या पत्रकारांचाही ये जा सतत सुरु असे. सौ.भारती एक उत्तम होस्ट, पाहुण्यांचे स्वागत,सरबराई उत्तम करण्यात पटाईत.
१९९१ ते २००१ पर्यंत राजाने उत्तम प्रकारे अप्लाइड आर्ट भागावर राज्य केले, व १ सप्टेंबर २००१ साली म्हणजे त्याच्या ५७ व्या वाढदिवशी निवृत्ती घेतली, ह्या सर्व काळात राजाने ४/१ एक पुस्तके लिहीली.
आज राजा एक अतिशय उत्तम लिखाण, त्याच्या ब्लॉग द्वारे प्रसिद्ध करतो. त्याच्या एव्हढे उत्तम व्यक्ती वर्णन व स्मृती चित्रे मी आजतागायत वाचलेली मला आठवत नाही.राजाला एक दैवी देणगी आहे ती म्हणजे अफाट स्मरण शक्ती. लहानपणा पासून ते आज ७० री मध्ये देखील सर्व गोष्टी आठवतात. फोटोग्राफिक मेमरीचे त्याला वरदान आहे.
राजा आणखी एका बाबतीत नशीबवान आहे त्याला अनेक थोर मोठ्या व्यक्ती जवळून पहायला मिळाल्या त्यांच्या बरोबर संवाद साधण्यास देखील मिळाला हे त्याच्या लिखाणात दिसून येते. तो केवळ वरवर गाठी भेटी न लिहिता त्या व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतो. आज पर्यंत राजाने १०० हून अधिक ब्लॉग लिहिले आहेत. त्यातील कुठलाही डावा उजवा तुम्ही करु शकणार नाही.
विसरलो नाही, नाही विसरलो, अनेक वेळा घासलेली म्हण न लिहिता, राजा राजा होण्याचे श्रेय मी १००% सौ.भारतीस दिले पाहिजे.
माझ्या सर्व तुटपुंज्या वाचकास मी विनंती करतो. कृपया आपण सर्वानी राजाचा ब्लॉग www.bloggerspot// merajabolataahe फॉलो करून तो वाचावा त्यातील प्रत्येक व्यक्ती चित्रा पासून बोध घेण्या सारखे बरेच काही आहे ह्या साठी तुमचा ब्लॉटींग पेपर उत्तम पाहिजे. राजाचे लिखाण म्हणजे रिसर्च, व प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, लिखाणाची शैली ज्याने वाचणाऱ्यास माहिती सहीत ती व्यक्ती आपणही ओळखतो असे वाटावे, ही खासियत होय.
तुमच्या वाचकां पैकी कुणास राजाशी हसतोदंलंन करण्याचा योग्य आला तर लक्षात ठेवा कि तुम्ही केवळ राजाला न भेटता ६०/७० व्यक्तींना भेटताय.
ब्लॉग मधील मला आवडलेले काही लेख.
१. माझे वडील.
२. जे जे च्या मातीचा सुगंध
३. नाथ पै...
४. गोळवलकर गुरुजी
५. अविनाश धर्माधिकारी
७. तो एक काळ ...
८. मोहमद रफी ( राजाचा अत्यन्त प्रिय गायक )
(राजाने खारला राहिला आल्यावर त्याच्या बंगल्याबाहेर एक फोटो काढून इन्स्टावर टाकलाय)
९.हिटलर
१०. विवाह समारंभ
केवळ एव्हडेच नाहीत कारण १००/ १५० लेखातून चांगले ब्लॉग शोधणे फारच कठीण टास्क. या सर्व व्यक्ती लेखा मध्ये टॉम अँड जेरी सारखा लेख मला सुखावून गेला .
ज्या ज्या वेळेस मी राजाला जे जे मध्ये भेटलोय, तेव्हां राजाच्या केबिन बाहेर असलेली नावाची पाटी वाचून माझी छाती विनाकारण फुगायची. पाटीवर लिहिले होते.
प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
अधिष्ठाता
महत्वाचे :राजाच्या पेन इंक ड्राइंग चे 'माय रूटेड फ्रेंड्स' प्रदर्शन १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर नेहरू सेंटर येथे आहे एक सुंदर अनुभव घेण्यासाठी
भेळ विचारांची
पुन्हा एकदा, जुन्या डायरीची पाने चाळताना
२० वर्ष पूर्वींचे तारीखवार भरकट,
सवयीने केलेली नोंद,
२०/१/२०००
माणसे
जेवढी वरती जातील तेव्हढीच
जन्माला येणारी. नजर फिरवावी
तेथे नजरेस पडणारी,
घरात,दारात, रस्त्यात, विमानात
आगगाडीत, तुडुंब भरलेली,
पूलांना वाकवणारी,
सकाळ दुपार रात्र अथक फिरणारी.
माणसे कधीही जन्म घेतात
गरीब श्रीमंत जात पात
काही संबध नाही जेवढी अवतरतात
तेव्हढीच लोप पावतात
एक अद्भुत किमया, अद्भुत चक्र!
=============================
भांडण
शब्द कसा आला?
एक भांडे दुसऱ्या भांड्यावर आपटले
आदळले त्याचा जो कर्कश डणडण आवाज
व दोन व्यक्ती मध्ये होणाऱ्या भांडणाच्या
आवाजातील साम्य ह्यामुळे
भांडण शब्द तयार झाला असावा.
=====================================
मन स्वछ असणे हे काच स्वछ ठेवण्या सारखे.
मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.
======================================
पाण्यातील माश्याचे अश्रू कोणी पाहाणारा
असा भूमंडळी कोण आहे? कोणी असेल का?=============================
एक शांत तारा
एक शांत तारा
दूर आकाशात लुक लुकणारा
स्वतःशी बोलणारा, हसणारा
पाहाणाऱ्याला भारावून टाकणारा
सर्वाहून वेगळा, आपलासा वाटणारा
एक दिवस
अचानक नाही दिसला
आकाशात कोठे लुप्त झाला
शोधून सापडेना, नजरेने सर्व ढग
शोधले बाजू केले तरी पठ्ठ्या सापडेना
कुठे केव्हान कधी निखळला
कोणास ठाऊक? आता ह्या रिकाम्या
जागेवर त्याच्या सारखे आगळे वेगळे
कोण चमकणार ?
ध्रुव ताऱ्याची जागा देखील अढळ
नाही राहिली का?
मित्राला शोधायला.
हताश होऊन चंद्र देखील खंगत गेला,आपले देखील असेच आहे.
काहीच शाश्वत नाही .
=======================
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ,वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
Wednesday, September 6, 2023
रद्दी
रद्दी
आज सकाळी माझ्या ग्यारेज मधून जवळ जवळ 100 एक जुन्या फाइल्स आणल्या गेल्या. एव्हढी रद्दी घरात कशी ठेवणार म्हणून दरवाज्या बाहेर फाइल्स लावून ठेवल्या. निकाल कसावा लावावा ह्यावर १ तास चर्चा होऊन आम्ही श्रेडर विकत घेण्यापर्यंत पोहोचलो. मग विचार केला नको बाहेर घेऊन जाऊन श्रेड करण्याचे ठरले, नेट वर शोधून दुसऱ्या दिवशी नेण्याचे ठरविले. रात्री झोप लागेपर्यंत मी त्या दुकानापर्यंत जाण्याचा मार्ग तय केला.
सकाळी उठल्यावर मात्र माझा विचार पूर्ण बदलला.विचार केला,फाईल्स मधले पेपर एक तर १५ वर्षाहून जुने इनकम टॅक्स चे रिटर्न्स व इतर अकौंट्स चे होते. एकूण ती रद्दीच होती व मी अंबानी अडाणी नव्हतो, कुणाच्या हाती लागून देखील काही वाकडे होणार नव्हते.आपल्या नेहमीच्या रद्दीवाल्याला बोलावून नेण्यास सांगावे, हा निर्णय सर्वानी मान्य केला. एकदाचा रद्दीवाला आला, सोपस्कार झाले. रद्दी घेऊन तो निघूनही गेला.
पण डोक्यातून रद्दी शब्द हटेना.
रद्दी म्हणजे काय?
रद्दी म्हणजे जीवनात ज्यांचा उपयोग सम्पला व आवश्यकता नाही अशा गोष्टी,
वस्तू , माणसे?
आज ७९ वर्षी अनुभवाने माणसांची रद्दी मध्ये गणना नक्कीच होऊ शकते ?
रद्दी माणसांची व्याख्या काय?
थोडंक्यात करायची झाली तर "गरज सरो वैद्य मरो" हि व्याख्या.
काम झाल्यावर सम्बध तोडला जातो ती माणसे रद्दी, विसर पडलेली माणसे, देवाघरी गेलेले नातलग, परिस्तिथीने गरीब असलेले बालपणीचे मित्र,म्हणजे रद्दी का?
एकेकाळी तुमच्या संगोपनासाठी रक्ताचे पाणी केले त्या आई वडिलांना रद्दी समजणारी अपत्ये म्हणजे निर्दयी कृतघ्नेतेचा कळस,
आई वडिलांनी अखेरपर्यंत ताजे वर्तमान पत्र असल्या सारखे आपले स्थान टिकविणे महत्वाचे.
आर्थिक स्वावलम्बन हा एक रामबाण उपाय.
चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम
मी पाहिलंय ते अबोल प्रेम, ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे त्याचे रोज तिच्या बाकावर नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच हळुवा...
-
एकाच वेळीस मनात भिर भिरणार्या विचारांची वावटळ, १) जो आला तो आपला जो गेला तोही आपला आलेला ही चांगला गेला तो ही चांगला दृष्टीकोन मात्र अ...
-
मी पाहिलेला अनभिषिक्त राजा जे जे मध्ये १९६२ मध्ये प्रवेश करून २/३ महिने गेल्यावर वर्गातील सर्व मुलांची एकमेका सोबत ओळख झाली होती. माझी क...
-
आला, आला आला वारा! सोसाट्याचा वारा !! ताड नाही पडला माड नाही पडला नारळ नाही हल्ला...अरेरे छत्रपतींचा 35 फुटांचा पुतळा मात्र पाडून ग...