Saturday, November 9, 2019

सावली


वास्तविक मला स्वतःला व्यक्ती चित्र रेखाटायला फारशी आवडत नाही, तरी देखील काही व्यक्ती माझ्या आयुष्यात फार महत्वाचे वळण लावून गेलीत, त्यातील माझ्या आई वडिला नंतर चिंचूला मी महत्वाचे स्थान देईन.
चिंचू म्हणजे (सुरेश हिराजी चिंचणकर). माझ्याहून १२ वर्षाने वयाने व व्यवसयात देखील वडील..पण मला कधीच याची जाणीव झाली नाही व  त्यांनीहि करून देण्याचा प्रयत्न केला नाही. चिंचू, एक मध्यम वर्गीय ठाकुरद्वार येथे एकत्र कुटुंबात वाढलेला पण स्वतःचे ठाम विचार असणारा, मोडेन पण वाकणार नाही असे व्यक्तिमत्व..

माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून माझे व चिंचू चे ३६ गुण जमले ते चिंचू आकाशातील तारा होई पर्यंत. माझ्या व्यावसायिक प्रवेशात प्रथम भेटलेली व्यक्ती जी खऱ्या अर्थाने फ्रेंड, फिलोसोफर, गाईड म्हणून पूर्ण व्यावसायिक व माझ्या आयुष्याच्या यात्रेत माझ्या सोबत सावली प्रमाणे राहिली. चिंचू बघता बघता माझ्या मुलांचा एक आवडता काका होऊन बसला , घरातील सर्व कार्यास चिंचूची हजेरी हक्काने असायची, कॉलेज मधील आमच्या  चार मित्रांच्या चौकोनाला पंच कोन करून बसला. आमच्या सर्व मस्ती मध्ये चिंचूने सहभाग घेतला नाही असे कधी झाले नाही.
५’ ६’ सावळा सडसडीत बांधा, त्या काळातील फ्याशन प्रमाणे काळी,मिलिटरी ग्रीन,व तपकिरी प्यांट वर रंग संगतीत बसेल असा शर्ट, कॉलर खाली ठाकुरद्वार छाप रुमाल, सोनेरी काड्यांचा चष्मा,खिशातून थोडा डोकवणारा रुमाल,पायात कोल्हापुरी किंवा बाटाचे स्यांडल असा चिंचू. हो आणखी महत्वाचे म्हणजे चिंचू ३ मीलीमीटर एवढी बारीक ओठाजवळ मिशी ठेवायचा,सर्वांनाच ते कुतूहल होते की एवढी अचूक मिशी कशी ठेवत असेल? ह्यावर बरीच थटा-मस्करी चालायची.

चिंचू एक उत्कृष्ट फिनिशिंग आर्टिस्ट होता.त्याकाळात जाहिरातील हेडलाईन्स विशिष्ट व योग्य font मध्ये एक एक अक्षर जोडून तयार करावयाचे काम तो लीलयेने व वेगाने  करावयचा,हे करताना letter space,word space, lead- in between the lines  ह्या सर्व गोष्टीं साठी त्याची तीक्ष्ण नजर व सरावलेली होती. माझ्या सारख्याला ४ तास लागणारे काम चिंचू ३० मिनिटात उडवायचा. भारतात संगणक म्हणजे काय? हा जेव्हा प्रश्नच होता तेव्हा चिंचूला ‘कॉम्प्यूटर’ म्हणून आमचे वरिष्ठ हाक मारावयाचे इतक्या वेगाने तो कामे अचूक रित्या संपवे. त्याला काम करताना बघण्यात देखील मला मज्जा येत असे. माझी त्याची दोस्ती फार लवकरच जमली आम्हा दोघांना कळण्या आधी ती दाट झाली. 
मला चिंचू चा स्वभाव का आवडला? स्पष्ट वक्ता, निर्भीड, आपल्या सतरंजीची लांबी जाणून वागणूक, निस्वार्थी मैत्री, भले तरी देऊ कासेची लंगोटी...
हा एक महत्वाचा पैलू  आणि अति महत्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा, चिंचू ठरल्या वेळे पेक्षा ५ मिनटे आधी हजार असायचा, ऑफिसला चिंचू सर्वा आधी हजर. ९:३० ला आपल्या जागेवर तो दिसला नाही म्हणजे तो गैरहजर हे गणित पूर्ण ऑफिसला माहित. ह्यातले बरेचसे गुण मी त्याच्या सहवासात राहून आत्मसात केले.

सुरवातीस माझा पगार फारच लाजीरवाणा असल्याचे चिंचूला कळाले असावे, न बोलता न विचारता तो पहिली २ वर्षे माझे लंच बिल भरत होता.वेळेस माझी कर्ज देणारी बँक पण तो झालाय. पहिली ४ वर्षे मी ‘अन्नासाठी ... आम्हा फिरविसी जगदीशा’ ह्या म्हणी प्रमाणे देशातील ऑफिसच्या सर्व ब्रांचेस मध्ये फिरलो. १९७३ ला पुन्हा मुंबईत आलो ते नवीन ३००० स्क्वेर फुट ऑफिसमध्ये.आता माझी वर्णी तिसऱ्या पदावरून ८ व्या पदावर घसरली माझ्या गैर हजेरीत ५ नवीन आर्ट डिरेक्टर भरती झाले होते, त्यामुळे माझ्या वाटणीला येणारे काम म्हणजे  उरलेले खरकटे फोल्डर्स, लेटर हेड्स वगैरे. पण ‘भगवान ने मेरी सून ली, थोड्याच दिवसात मला आमच्या एजन्सी मधून निघालेल्या काही लोकांनी सुरु केलेल्या ‘रिडीफ्युजन’ ह्या एजन्सीचा बुलावा आला. पगार मी कमावत होतो तेवढाच. पण पोस्ट ‘सिनियर आर्ट डिरेक्टर  
खरोखर छप्पर फाडके ऑफर.
विचार करायला चार दिवस. द्विधा मनस्थिती. मित्रवर्गांचे म्हणणे कशाला हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावतोस, अरे तुझा स्टूडीओ म्यानेजर करतील, इथे कमीत कमी स्थैर्य तरी आहे, त्यांच्याकडे बिझनेसचा पत्ता नाही, वगैरे वगैरे. ह्या सर्व उपदेशामध्ये माझे कान उघडे पण तोंड बंद. चिंचू मात्र गप्प. पण मी मात्र ‘ऐकावे जनाचे पण करावे मनाचे’ ह्या म्हणी प्रमाणे मी ऑफर चा स्वीकार केला.

चिंचूची आणखी एक गंमतीशीर खासियत म्हणजे ९:३० ये ६ वाजेपर्यंत त्याच्यासाठी मी ‘काळे साहेब’ त्यानंतर मी त्याच्यासाठी  ‘अरुण’ असायचा, मला देखील ह्याची गम्मत वाटायची.
माझ्या MCM मधील शेवटच्या दिवशी इतके दिवस अवाक्षरहि न काढलेल्या चिंचूने घरी जातांना हळूच विषयाला सुरुवात केली,ऑफिस कुठे आहे, किती जण आहेत,कधी पासून सुरवात करताय असे जुजबी प्रश्न विचारून झाल्यावर मुद्द्यास हात घातला “अरुण केलेस ते बरे केलेस, अरे येथे तुझी धाव कुंपणापर्यंतच राहिली असती आता लवकरच पंखात हवा भरून तू आता उंच उडशिल व नावा रूपास येशील तेव्हाच ही हसणारी तोंडे गप्प होतील.”बस्स ही एवढी दोन वाक्य माझी छाती फुगवून गेली आणि खरच, माझ्या हातून थोडा फार इतिहास लिहिला गेला,काही वर्षात चिंचू माझ्याबरोबर त्या कंपनीत आला. पुढे “जेथे जातो तेथे तू माझा संगाती”ह्याप्रमाणे मी आणि चिंचू बरोबर राहिलो. १९९९ ला चिंचूने रिटायरमेंट घेतली मी पण माझ्या कंपनीतून राजीनामा दिला व घरां जवळच ऑफिस सुरु केले. माहीमहून आठवड्यातून एक दिवस तो मला भेटल्याशिवाय राहिला नाही. अनेक वेळा मी त्याला भेटावयाचे ठरवे पण तोच हजर व्हायचा. तास २ तास गप्पा मारून निघायचा.

२०१४ च्या दरम्याने चिंचूची तब्येत बिघडावयास सुरुवात झाली,कॉमन मित्रां कडून बातमी मिळत होती पण मी नालायक, त्याला भेटण्याचा आळस करत होतो. थोडे बरे वाटले की चिंचू हजार व्हायचा,२०१५पर्यंत त्याचे येण सुरूच होते.
आता नक्की आठवत नाही पण त्याच वर्षात त्याचा धाकटा तरुण मुलगा दीप अचानाक हृदय विकाराच्या झटक्याने गेला, आणि चिंचू तो धक्का सहन करू शकला नाही एक महिन्याच्या आत माझा जीवश्च मित्र इहलोकात विलीन झाला.
चिंचू आज तुला जाऊन नक्की किती वर्षे झाली हे काही मला आठवत नाही, पण मी असे पर्यंत तरी तू माझी सावलीच राहशील. 






No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...