तारीख दिसली कि मला दुसरीचा पहिला दिवस आठवतो.
आमच्या बाई वर्गात आल्या व काहीही न बोलता
'नमस्ते बाई'ह्या स्वागतास उत्तर न देता फळ्याकडे पोहोचल्या
फळ्यावर त्यांनी एका कोपऱ्यात आकडेमोड लिहिली,
त्यावेळी पूर्ण अपूर्णांक शिकवले नसल्यामुळे
लिहिलेल्या आकड्यांचा अर्थ लागला नाही
पण कुणाला विचारावे म्हणजे माझा मूर्खपणा
जाहीर होणार दुसऱ्या दिवशी बाईनी तसेच खरडले,
मी धीर करून शेजारी बसलेल्या मुलीस विचारले
बाई हे काय लिहितात? तिने देखील खांदे उंचावून
नकारार्थी मान हलवली, पण तिने शेजाऱ्यास
विचारले, तो म्हाणाला तारीख तेव्हां निरीक्षण
केल्यावर लक्षात आले कि रेषेच्या डावीकडील आकडा
त्या महीन्याच दिवस, रेषेवरील आकडा
म्हणजे महिना व रेषेखालील आकडा म्हणजे चालू वर्ष.
त्या दिवसापासून फळ्यावर कोपर्यात खरडलेले आकडे
म्हणजे तारीख दिवस मोजावयाचे साधन
माझ्या पाटीवर मग वहीत, मग भिंतीवरील दिनदर्शिका
तारीख वार वर्ष कळू लागले, मग आज अरुणचा
"८ वा वाढदिवस "ह्याचा अर्थ लागू लागला,
घरातील सर्वांच्या,वाढ दिवसाच्या, इतर महत्वाच्या
तारखा दिवसा गणिक लक्षात राहू लागल्या,
बघताबघता तारखानि मला गुरफटले,
डोळे उघडायच्या आधीच त्या दिवसाची तारीख
डोळ्या समोर नाचू लागली.
तारखा सरकत होत्या आणि त्या बरोबर
माझे आयुष्य सरकत होते. कॉलेज संपले तारीख...
पहिली नोकरी तारीख... दुसरी नोकरी तारीख...
लग्न तारीख...मग मुलगी, तारीख...
मग मुलगा तारीख..., स्वतः चा उद्योग तारीख...,
भागीदारीत उद्योग तारीख..., पहिली गाडी तारीख...,
यशाच्या पायऱ्या तारीख..., उद्योगाचा पसारा तारीख...,
तारीख पे तारीख पडत होती, आयुष्य पुढे नेत होती,
आज अरुणचा ७५,७६,७७ वा वाढदिवस
कधी आले कधी गेले, चेहरा आरशात
पाहिल्यावर स्पष्ट दिसू लागले.
असाच तारखांचा हिशोब केला तर
उद्या पर्यंत २८४७० तारखा उलटल्या गेल्या,
तारीख म्हंजे काय हा बोध झाल्यापासून
आजपर्यंत मी २५५४९ माझ्या डोळ्यांनी उलटल्या.
उद्या पुनः अरुणचा वाढदिवस तारीख...?
तारीख पे तारीख हा खेळ...
आपल्या तसेच जगाच्या अंता पर्यंत
चालूच रहाणार.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.