Sunday, October 11, 2026

दोन बाजू नाण्याच्या...




दोन बाजू नाण्याच्या...

नाण्याला दोन बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. छापा म्हणजे चित्र आणि काटा म्हणजे नाण्याची किंमत. नाणं तेच असतं, पण बाजू दोन. आपल्या माणसाचंही असंच काही असतं.

जगप्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे आपण चलनी नोटांवर छापतो. तोच चेहरा दहा, शंभर, दोनशे, पाचशे अशा वेगवेगळ्या किमतींच्या नोटांवर दिसतो. म्हणजे माणसाची किंमतही आकड्यांप्रमाणे बदलते? की नोटेवर छापलेल्या चेहऱ्याची किंमत आणि त्या माणसाची खरी किंमत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत? सरकारने तरी कधीतरी या चष्म्यातून पाहावं, असं मला वाटतं.

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबर दोन बाजू घेऊन येतो का? अर्थातच नाही! त्या तो हळूहळू आत्मसात करतो. जगाला दाखवायचा मुखवटा आणि अंतरमनात जपलेलं दुसरं रूप. परिस्थितीप्रमाणे या दोन्ही बाजू वापरण्याची कला प्रत्येक जण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी शिकतोच.

जो मनावर ताबा ठेवतो, तोच साधू ओळखावा. देव तेथेच जाणावा!

लहानपणी आपल्याला हे सगळं का शिकवलं जातं याची उकल मला तरी झालेली नाही. ज्या वयात खोटं, चोरी, आदर, खरं या शब्दांचे अर्थसुद्धा नीट माहीत नसतात, त्याच वयात चांगला माणूस होण्याची सगळी लक्षणं पालक आपल्यावर लादतात.
कशी? स्वतःच्या अंतरमनाचा आरसा झाकून!

थोडंसं पचवायला कठीण आहे, नाही?
मोठं झाल्यावर लक्षात येतं की नियम वेगळे आणि व्यवहार वेगळा. आणि आपणही शिकतो, नियम कधी पाळायचे आणि कधी सोयीप्रमाणे वाकवायचे.

खरी गंमत इथेच आहे.
आपण एखाद्याला चांगला म्हणतो, तर दुसऱ्याच्या अनुभवात तोच माणूस वाईट असू शकतो. कुणासाठी तो देवमाणूस, तर कुणासाठी डोकेदुखी. मग नेमका खरा कोण? की दोघेही आपापल्या जागी बरोबर? फक्त चष्मे वेगळे!

इतिहासाची पानं उलटली तर मोठमोठ्या व्यक्तींच्या आयुष्यात असे विरोधाभास दिसतात. ज्यांनी जगाला दिशा दिली, ज्यांच्या विचारांनी लाखो लोक प्रेरित झाले, त्यांच्या आयुष्यातही काही गोष्टी स्वीकारणं कठीण वाटतं. काहींचे सार्वजनिक विचार उदात्त होते, पण खासगी आयुष्यातील वागणूक त्याच आदर्शांशी जुळत नव्हती. काहींच्या मोठ्या कामगिरीमुळे त्यांच्या चुका झाकल्या गेल्या, तर काहींच्या एका चुकीमुळे त्यांची सगळी कामगिरी आपण विसरून गेलो.

इतिहासात माणसाचं मूल्यमापन करणं सोपं नाही. कारण इतिहास लिहिणारा कोण, त्याला काय महत्त्वाचं वाटतं आणि तो कोणती बाजू मांडतो, यावरही बरंच काही अवलंबून असतं.
आपल्याकडे महात्मा गांधींचंच उदाहरण घ्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान प्रचंड आहे. सत्य आणि अहिंसेचा संदेश त्यांनी जगाला दिला. पण त्यांच्या काही वैयक्तिक विचारांबद्दल, प्रयोगांबद्दल आणि निर्णयांबद्दल आजही चर्चा होते.
मग गांधीजींच्या कार्याचं महत्त्व कमी होतं का? की त्यांना महात्मा मानलं म्हणून त्यांच्या प्रत्येक विचाराला मान डोलवायची?
बहुधा एखाद्या माणसाच्या कार्याचा आदर करणं आणि त्याच्या प्रत्येक विचाराशी सहमत असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण शिकायला हवं.

पण इथे मला थोडंसं विषयांतर करावंसं वाटतं.
जगाने काही व्यक्तींचे चेहरे आपल्या चलनी नोटांवर छापले. त्या चेहऱ्याला एक प्रतीकात्मक स्थान मिळालं. पण त्या चेहऱ्यामागच्या माणसाची खरी किंमत आपण कशी ठरवणार? त्याचं योगदान, त्याचे विचार, त्याच्या चुका आणि त्याच्या मर्यादा यांचं मोजमाप एका नोटेवरच्या चित्रातून होऊ शकतं का?
नाण्याच्या एका बाजूला चित्र असतं आणि दुसऱ्या बाजूला त्याची किंमत. पण माणसाच्या बाबतीत चित्र कोणतं आणि किंमत कोणती?
राजकारणात तर या दोन बाजूंचा खेळ रोजच दिसतो. निवडणुकीपूर्वी जनतेची सेवा करण्याच्या शपथा आणि निवडणुकीनंतर जनतेलाच आपल्या कामासाठी रांगेत उभं राहावं लागणं! भाषणात साधेपणा आणि प्रत्यक्ष राहणीत थाटमाट. विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका.सध्याचे पंतप्रधान आठवतात, असं अनेकांना वाटू शकतं. पण प्रश्न एखाद्या एका नेत्याचा नाही. प्रश्न आहे बोलणं आणि करणं यांतल्या अंतराचा. ते अंतर तपासण्याचा अधिकार जनतेला नक्कीच आहे.

चित्रपटसृष्टीतही काही वेगळं नाही. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक प्रेक्षकांच्या मनात देवासारखं स्थान मिळवतो. त्याच्या एका संवादावर टाळ्या पडतात. पण पडद्यावरची भूमिका आणि प्रत्यक्ष आयुष्यातला माणूस या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, हे आपण अनेकदा विसरतो.
एखादा अभिनेता उत्तम अभिनय करतो म्हणून तो उत्तम माणूस असेलच असं नाही. आणि एखाद्याच्या खासगी आयुष्यात दोष आहेत म्हणून त्याची कलाही नाकारायची का?आपण कलाकाराला त्याच्या कलेसाठी दाद देतो की त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला प्रमाणपत्र देतो? उत्तर काय?

हा प्रश्न फक्त प्रसिद्ध माणसांपुरता मर्यादित नाही. आपल्या आजूबाजूला पाहिलं तरी अशी अनेक उदाहरणं सापडतील. ऑफिसमध्ये शिस्तप्रिय आणि कडक असणारा माणूस घरी प्रेमळ असेल. घरात सगळ्यांची काळजी घेणारी व्यक्ती बाहेरच्या माणसांशी कठोरपणे वागत असेल. एखादा माणूस गरजवंताला मदत करेल, पण त्याच वेळी आपल्या जवळच्या माणसाशी अन्याय करेल.
मग माणूस चांगला की वाईट? त्याचं मूल्यमापन कसं करावं?
प्रत्येक माणसात चांगुलपणा आणि स्वार्थ, धैर्य आणि भीती, उदारता आणि संकुचितपणा यांचं काही ना काही मिश्रण असतं. कुठली बाजू केव्हा वर येते, हे परिस्थिती, स्वभाव आणि निवडींवर अवलंबून असतं.
दुसऱ्याच्या दोन बाजू शोधण्यात आपण फार हुशार असतो. त्याच्या चुका लगेच दिसतात; चांगल्या गोष्टी मान्य करताना मात्र हात आखडता घेतो. स्वतःच्या बाबतीत आपण आपल्याच वकिलाची भूमिका घेतो. चूक झाली तर परिस्थिती कारणीभूत. दुसऱ्याने तीच चूक केली तर त्याचा स्वभावच असा!

जिवंत माणसाच्या बाबतीत आपण त्याचं बोलणं ऐकतो, त्याची कृती पाहतो, त्याच्याशी आपले अनुभव जोडतो. पण माणूस गेल्यावर? तेव्हा त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधीही नसते. तरीही आपण त्याच्या आयुष्याची चिरफाड करायला मोकळे!

म्हणून सोशल मीडियावर शब्दांचे प्रहार करताना थोडं भान ठेवावं.

कारण...

दोन बाजू नानांच्याही...


दोन बाजू नाण्याच्या...

दोन बाजू नाण्याच्या... नाण्याला दोन बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. छापा म्हणजे चित्र आणि काटा म्हणजे नाण्याची किंमत. नाणं तेच असतं, पण ...