Friday, March 15, 2019

खोक्याचा झाला बोका


मोबाईलने जीवन सुखकर केल्या पासून फोन करण्या ऐवजी तरुण मंडळी Whats-app वर लिहून कळविणे पसंद करतात.असाच एक निरोप माझ्या पुतणी ने मला केला...त्याला उत्तर देताना न कळत मजेशीर यमक जुळत गेले. एक गम्मत.

पुतणी: काका,मी आज येऊ का भेटायला?
मी: वळकम अम्मा!
पुतणी: मी ४ वाजेपर्यंत पोहचते
मी: ओके अम्मा!
पुतणी: c u soon, on my way, could be delayed by 15 min.
मी: ओके अम्मा! 
(माझा मेंदू सरकला आणि...whats-appवर फिरू लागली बोटे )

...ओके  बोके डोक्यावर पडले खोके
खोक्यातून पडला साबण तुझा मित्र रावण
रावणाची आई सुगरण तिने केले शिकरण
शिक्रणात पडली माशी झाली शिकरण नकोशी
रावणाची आई चिडली झाडावर जाऊन बसली
डोक्यात पडला पेरू रागावून आई म्हणाली 
आता याला कसा कापू?नाही सुरी नाही चाकू
केला केला विचार तिने मारली उडी झाडावरून 
रागाने गेली पाय आपटीत घरात 
पाहून तिला धूमस्ताना लागला रावण हसायला 
म्हणाला आई आई शांत हो एवढा क्रोध बरा नव्हे 
काप त्या पेरूला उभा आडवा भर त्यात तीखट मीठ चाट मसाला 
आणि दे सर्वाना खायला  ऐकून रावणाचे बोलणे
आईला खुद्करून  हसली... 

एवढ्यात बेल दाराची वाजली
मी आलो whats-app मधून बाहेर 
दार उघडले आणि लागलो हसायला
पुतणीने विचारले काय झाले काका
पट करून उत्तरलो काकांचा झाला बोका
बोक्याचा झाला खोका ...



Sunday, March 3, 2019

आहा ते सुंदर दिवस...






आमचे अण्णा (वडील) खूप हौशी होते.
त्यांना नवीन टेकनॉलॉजी बरोबर
आपण असावे अशी हौस.
माझ्या आठवणीत आमच्या घरी
टेलेफोन १९४८,मी ४वर्षाचा असल्या पासून
पहात आलो. जेव्हां संपूर्ण ल्यामिंगटन रोडवर
केवळ ३ फोन होते. शेजारी पाजारी आमचा नंम्बर
आपला असल्या सारखा मित्र मंडळीना देत असत,
त्यांना फोन आल्यावर बोलावणे हा आमचा
शेजारधर्म.फोन नंतर मोठी वस्तू कोठली आली
असेल तर ती म्हणजे LPरेकार्ड चेंजर आणि
रेडीओ. ३’उंच २’ रुंद आकाराच्या एका लाकडी
कपाटात ह्या दोन्ही गोष्टी बसविल्या होत्या
त्यास वर छान तीन आरसे बसवून दर्शनी ड्रेसिंग
टेबल दिसावे असे अण्णांनी स्वतः डिझाईन केले होते.
गाणी किवा रेडीओ चालू असल्यास आवाज
ऐकू यायचा पण कुठून पटकरून समजायचे नाही.
रेकार्ड चेंजर मध्ये एका पाठो पाठ ७ रेकॉर्ड्स लागायच्या.
आम्हा सर्वाना गम्मत वाटायची ती एक रेकॉर्ड संपली की
राहिलेल्या रेकॉर्डस पैकी एक रेकॉर्ड संपलेल्या रेकॉर्डवर पडायची
मग चेन्जरचा पिन असलेला हात हळूच येऊन त्या रेकॉर्डचे गाणे लावायचा.
त्या बालवयात ऐकलेली गाणी
आज हि मनात ताजी तवानी आहेत.
“यमुना जळी खेळूखेळ कन्हया”...
“परवशता पाश दैवी”...
“एक तत्वनाम दृढ धरी”...
“दर्यावर डोले माझे चिमुकले घरकुल”...
 “दत्त दिगम्बर दैवत माझे”...
“दर्या फोफावला माझे ग तारू”...
“चल  ग सखे वारूळाला”...
“रमला कुठे ग कान्हा”...
“नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू”...
“कल्पवृक्ष कन्येसाठी”...
“दादा मलां एक वहिनी आंण”...
ज्योत्स्ना भोळे, भीमसेन, माणिक वर्मा,
गंगुबाई हंगल,  दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व,
माधव वाटवे, पराडकर,पु ल, लता, आशा,
सुधीर फडके, अशा उत्तम गायकांना
ऐकत आन्ही लहानाचे मोठे झालो.
३०० हून अधिक LP’sआमच्या
त्या ड्रेसिंग टेबलच्या पोटात दडल्या होत्या.
ती ऐकूनच संगीत ऐकण्याची आवड निर्माण झाली.
गाण्याचा गळा काही नव्हता पण ऐकून
शिळेवर गाणी म्हणावयाची सवय मात्र
६व्या वर्षापासून लागली ती आजतागयात कायम
काम करताना स्वतःचे  मनोरंजनाचे उत्तम साधन.
कालान्तराने रेकॉर्ड चेन्जरची  ट्रानझीस्टरने जागा घेतली
LP’s वरील गाणी आता ट्रानझीस्टरवर ऐकणे सोपे झाले होते.
 रेकॉर्ड प्लेयर नादुरुस्तझाला. अण्णा गेल्या नंतर 
त्याचा वापर ड्रेसिंग टेबल म्हणूनच वाढला,जसे कुटुंब वाढले तसे
आम्ही प्रत्येकाने आपापले वेगळे संसार थाटले.
आजमितीला  चेंजरचे माझ्या धाकट्या भावाने
चेहरा मोहरा तोच ठेऊन सुंदर पैकी खण
असलेले कपाट बनवले आहे. मला मात्र त्याकडे
पाहील्यावर बालपणीच्या आठवणीना मनात उजाळा मिळतो.
नकळत मनोमनी प्रत्येकवेळेस एकच ओळ रेंगाळते 
 आहा ते सुंदर दिन हरपले’.

Friday, February 22, 2019

वावटळ ४





अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .

स्वप्न का पडतात?
जेव्हां मेंदू झोपेचे सोंग घेऊन 
सत्य घटनेवर आधारीत 
चित्रपट बघण्याच्या मनस्थितीत
असतो.तेव्हां.. 


मनावर ताबा ठेवा
स्वतःशी प्रामाणिक रहा
जगातील कुठलाहि 
संकटाचा समुद्र 
तुम्ही ओलांडू शकाल!

प्रश्न का भेडसावतात?

हुशार कावळ्याची गोष्ट 
मडक्या पर्यतच?
कोल्ह्याला कधीच गोड 
द्राक्षे  का मिळाली नाहीत?
चिमणीने एकदाही  कावळ्याला 
दार उघडले कां नाही?

 खरे किती खोटे किती?

चित्रपट अभिनेते व अभिनेत्री
खऱ्या आयुष्यातील प्रेमाची जाहिरात 
एका चित्रपटासारखी  करतात
प्रेमवीर प्रेमिका बदलला/ली की 
प्रेमाचे पोस्टर  बदलतात.
ह्याला प्रेम म्हणायचे की...??? 

 गेले हो गेले...

बघता बघता २ महिने गेले
आता किती राहिल्रे
फक्त दहां! वाट पहा
वर्ष उलटण्याची!

याद रहे
तन जो कर ना पाई 
वो मन कर पाई 


Tuesday, February 5, 2019

भविष्य वाणी











रोज सकाळी ७च्या सुमारास 
दाराच्या कडीचा आवाज कधी होतो
ह्याची वाट पाहत माझे कान टवकारलेले
असतात आवाज ऐकू आला रे आला

की धावत जाऊन वर्तमानपत्र घेण्यात
जो आनंद मिळतो... तो का?

अहो एकही बातमी न वाचता पान उघडलेजाते 
ते राशी भविष्य वाचण्यासाठी.
आजपर्यंत हे भविष्य कधीही खरे ठरलेले  नाही
तरी रोज ते वाचल्याशिवाय दिवस सुरु होत नाही.
जर आपणही माझ्यासारखे २ वर्तमानपत्रे
घेत असाल तर आपल्याच राशीचे दोन वेगळी भाकिते
वाचावयास मिळतात.त्या पैकी जे बरे असेल
(खरे कुठलेच होत नाही हे माहिती असूनही)
ते आपले समजून समाधान मानणे.

कां असावे हे कुतूहल,भविष्य जाणून घेण्याचे?
ग्रह अवकाशात भाविष्य वर्तविणारा पृथ्वीवर,
अभ्यासाने ग्रह ताऱ्याची सांगड घालून 
भविष्य वर्तविणार. आणि आपण वाचणार 
आपले केवळ मानसिक समाधान
वर्तमानात भविष्य पाहिल्याचे.    

Monday, January 21, 2019

माझा बोधिवृक्ष



मी ६ वर्षाचा होतो.
वडील भावंडाच्या शेपटीस पकडून
मी प्राथमिक  शाळेत  प्रवेश केला.
शाळा मिशनरी असल्याने छान टुमदार  होती.
२ मजली वास्तू त्यात १ ली ते ४थि चे वर्ग तळ मजल्यावर
५० मुले बसू शकतील असा प्रार्थनेची /नाचाची/ वार्षिक कार्यक्रमाची
/पावसाळ्यात खेळायचीमोकळी जागा.
शाळे समोर दुपारच्या सुट्टीत खेळण्याची जागा सोडून
भोवती बदाम, चाफा, गोंद अशी  झाडे.

मी स्वभावाने बुजरा (आजही)असल्याने
इतर मुलांशी ओळख करून घेणे,खेळणे  
वगैरे मला काही जमले नाही.
त्यामुळे मधल्या सुट्टीत मी एकटाच फिरत असे.
बदाम वेचणे ते खाणे हा माझा छंद.
ओल्या बदामाची तूरट चव मला आवडायची.
हे बदामाचे झाड मला खूप  आवडायचं,
मोठी मोठी लाल, गुलाबी, हिरवी पाने
पावसाळ्यात खूप छान दिसायची.

ह्या बदामाच्या झाडाखाली उभा राहिलो की
मी सानुली झुळुक व्हायचो आणि मग विचारू  नका  
मी (मन) मग पक्षा सारख आकाशात, माश्या सारखा पाण्यात,
कुठे कुठे भटकायचो, इथेच  स्वप्न बघायची सवय झाली
व सवय कायम राहिली. ह्या बदामाच्या झाडाने नकळत
मला भविष्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.
माझ्यासाठी खरे तर हे झाड बोधीवृक्षच होते.

आजही बदामाचे झाड कुठेही दिसले की
माझ्या अंगात एक प्रकारचा हुरूप संचारतो.    

Friday, January 11, 2019

काम तमाम


साल २०११
एक दिवस काय झाले,
कॉम्प्यूटर बिघडला
त्यात काय एवढे?
त्या काळात कॉम्प्यूटर नाही म्हणजे
माणूस निकामी
हृदय बंद पडल्या गत अवस्था
सर्व जीव सोशल मिडिया वर अवलंबून
मेल कुठे बघू,फेसबुकवर फेस कसे करू
गुगलवर सर्फ कसे करू
ताज्याबातम्यांचे काय?
सर्वात महत्वाचे ऑफिस प्रेझेंटेशन
केला एकदाचा फोन कॉम्प्यूटर डॉक्टरला
बाबा पुता करीत यायला तयार झाला
म्हंटले त्याला काहीही कर
तासा भरात दे माझ्या
आयुष्याचा प्रश्न सोडवून
उलट प्रश्न त्याने केला
सर एका तासात तुमची सर्दी,
खोकला कधी बरा झालाय?
नाही ना? मग?मग?
मी: बरे बाबा घे वेळ  
कॉ. डॉ: सर्वात सोपा उपाय सांगू का?
जगाबरोबर पाउल टाका
अर्ध्या तासाहून कमी वेळात काम होईल
‘दुनिया आपके मुठी मे आयेगी’
ते कसे रे बाबा मी चाचरत विचारणा केली
नीचे उतरो और एक स्मार्ट फोन ले आओ
हो जायेगा काम तमाम.
मी: दुनिया मुठी मे बाद मे
पहिले तुम आओ इस बिमार को बचावो. 
मी फोन ठेवला. खाली उतरलो.
क्रेडीट कार्ड सरकवत १ स्मार्ट फोन
खरेदी केला, “साला मै तो स्मार्ट बन गया”
या हुशारीत शर्टाच्या वरच्या खिशात दिसेल 
असा ठेऊन 'काम तमाम'
केल्याच्या ऐटीत दुकानातून बाहेर पडलो.

Sunday, January 6, 2019













प्रत्येकाच्या वाट्याची सुख दुखः
सोडली तर येणारे प्रत्येक वर्ष सर्वांचे असेच जाते.

जानेवारी गेला  हॅपी हॅपी करण्यात
फेब्रुवारी २८ दिवसांचा म्हणून आंनदीआनंद
मार्च हरवला  परिक्षेच्या तयारीत                                      
एप्रिल मात्र फूल फूल करीत गुल झाला
मे घामट खारट पण गावच्या आंब्याने गोड लागला
जून मात्र नवी वह्यापुस्तके भिजवीत झालाओला चिंब 
जुलै उजाडला सणवाराची नांदी देत 
ऑगस्ट स्वातंत्र्याच्या आठवणीत संपला
सप्टेम्बर बाप्पा मोरया मोरया करीत
‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात लपला 
ऑक्टोबर दसरा दिवाळीच्या
झेंडूने सजला पणत्यांनी उजळला
नोव्हेम्बर मात्र आला तसा गेला
डिसेम्बर नाताळ बाबा बरोबर
आनंदात नाचत गेला
संपले वर्ष पुन्हा एकदा
हॅपी हॅपीच्या गजरात
नव्या जोमाने नवा संकल्प करीत
सुरु झाले नववर्ष 
मागील पानावरून पुढे चालू.




खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...