महाअष्टमी
आमच्या आई वडिलांनी आम्हा मुलांना कुठल्याही प्रकारे धर्म ह्यावर कधी भाषण दिले नाही किवां आपण हिंदू ते मुसलमान , ते ख्रिस्ती, ते पारशीअसा भेद भाव करणे हि शिकवले नाही त्यात हिंदूंचे जाती विभाजन देखील शिकवले नाही.घरात एक अण्णांचे कपाट होते त्यात वरच्या खणात रामाचे चांदीचे सिंहासन होते त्यात अण्णांचे राम पंचायतन चे एक नाणे होते ज्याची अण्णा आंघोळीनंतर पूजा करीत आम्हाला कधीही सांगितले नाही कि तुम्ही रोज हात जोडलेच पाहिजेत वगैरे त्यानी शिकविलेला श्री राम, श्रीकृष्ण, व इतर दोन श्लोक मात्र नित्य नेमाने झोपण्यापूर्वी कपाटा समोर उभे राहून म्हणावयास शिकविले होते तोच आमचा देवाशी कॉन्टॅक्ट,बाकी मार्केट मध्ये जाताना मारुतीचे एक देऊळ, व रस्त्यात झाडाला टांगलेले साई बाबा ह्याना लांबूनच नमस्कार करणे. तो देखील देखल्या देवा ... एक हात छातीस लावून.
थोडक्यात सांगायचे तर आम्हा मुलांना फारशी सणावारांशी ओळख नव्हती.( म्हणजे सणाचे महत्व किवां का साजरे करतात, इतिहास वगैरे ) काही सण आई गोड पदार्थ करायची म्हणून कळायचे. होळीला पूरण पोळी, संक्रातीला तिळाचे लाडू, दसऱ्याला मसाले दूध, दिवाळीला फराळ वगैरे.
अरे हो आमच्या घरी एक पुस्तक होते ते घरात कुणी कुणी वाचले होते कोणास ठाऊक.मी तर नाहीच नाही,पुस्तकाचे नाव होते हिंदू सण व व्रते, माझ्या लक्षात फक्त त्याचे कव्हर आहे. पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंड वर एक वडाचे झाड व त्या भोवती फिरणाऱ्या बायका, आईनेच हे आणले असावे तिला वाचनाची खूप आवड.
असो विषय थोडा लांबला.
माझे लग्न ठाकरे कुटुंबात झाले व माझी खऱ्या अर्थाने देवांशी ओळख झाली. मला सर्व सण व्रते यांची माहिती महती समजली. त्यातील नवरात्री एक महत्वाचा भाग. त्यांच्या कडे म्हणजे सासरी पहिल्या रात्री पासून सणाला सुरवात व्हायची म्हणजेच घट बसायचे,रोज माहेरी जाणे शक्य नसल्याने अंजली आता घरात तिच्या परीने देवीची पूजा, पोथी वाचन ९ दिवस करते, त्याबरोबर देवाचा प्रसाद रोज केला जातो. अष्टमीला मात्र आम्ही माहेरी, सासरी, गेली ४६ वर्षे जातोय.ह्या दिवसाचे महत्व मी अलीकडे गुगल करून माहिती केले. अंजलीच्या माहेरी अष्टमीला घरी देविचा प्रसाद म्हणजे मटण, कलेजी. कोलंबी, मासे, गोडाचे पदार्थ ( ह्यातील अर्धा मासाहारी प्रसाद अंजली करते )ह्याने पूर्ण , तुडुंब, भरलेली परात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत,सर्वानी त्यास हाताने स्पर्श करावयचा असतो त्यानंतर सर्वांचा ९ दिवसाचा उपवास सुटतो. हे माझयासाठी लग्नानंतर नवीनच होते, आता हि प्रथा बऱ्याच घरातून असते हे समजले.
अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी (Mahaashtami) असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते. गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का आहे? पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते.
No comments:
Post a Comment