Tuesday, February 8, 2022

पहिले प्रेम



पहिले प्रेम

मी इयत्ता तिसरीत असेन त्तेव्हा तिचा आवाज मी प्रथम ऐकला 

आणि तिथेच माझा छोटासा कलिजा खल्लास झाला

ते देखील ती बाला नजरेस न पडता ! 

गाणे होते " ऐ मेरे दिल कही और चल" (दाग) 

त्यानंतर मी तुझा, तुझ्या आवाजाचा  वेडा झालो 

तो आज तागयात वेडाच राहिलो व मरेपर्यंत वेडा राहीन. 

ह्या गाण्या पाठोपाठ माझ्या ओठावर चिकटलेले शहारे आणणारे  गाणे म्हणजे 

"आयेगा आनेवाला..."(महल). आठवड्यातून एकदा तरी शिट्टी वर न कळत वाजले जाते .

" एका तळ्यात होती ... हे भाव गीत ऐकले कि  मला 

ते  कुरूप बदक कधी पाण्यात स्वतःला  पाहिलं

व त्याचा राजहंस होईल हे ऐकण्यासाठी कान अधीर होत. 

' कल्पवृक्ष कन्येसाठी"... गाणे ऐकले की आजही अंतरमन गहिवरून येते.

अगणित गाणी,अगणित भाव केवळ तुझा कंठ हि करामत करू शकतो.  

भाव गीते, अभंग, सिने गीत. ३५ भाषेतील कुठलेही गाणे ऐका,

तुझ्या दैवी आवाजाने जगाला  भारावून टाकले आहेस.

स्वत: मी दुसऱ्या आवाजात कधीच रमलो नाही, रमणे शक्यही नाही.

तुझ्या स्वराना ऐकून मी तरूणच राहीन.

झाले बहू होतील बहू... तुझ्यासम कोणी होणे नाही.


सहा फेब्रुवारी सकाळी  ८:१२ मिनिटाने तुझा कंठ अबोल झाला.

नुसत्या बातमीने हादरलो. जरी अलीकडे तू गात नव्हतीस.

पोटात कालवा कालव झाली, हृदयाची घालमेल झाली,

मूक होऊन टीव्ही समोर तुला शांत झोपलेले पहात बसलो. 

सायंकाळी  तू पंचतत्वात विलीन होई पर्यंत

नजर हटवली नाही.


तुझ्या  लाखो करोडो चाहत्याचे डोळे मात्र भरून आले.

पहिले प्रेम हेच खरे असे म्हणतात,

तुझ्यावरील माझे  प्रेम अमर राहील.


प्रिय मैत्रीणे तुला चीर शांती लाभो  ही प्रार्थना.  




Wednesday, January 12, 2022

सोन्या

 सोन्या .


रत्नाकर सोहोनी. ( ह्यातील ‘हो वर विशेष जोर देऊन सोन्या नाव सांगत  असे.) 

मी त्याला इतरा सारखा कधीच रतन, रत्न्या, रत्नाकर म्हणून संबोधिले नाही) माझ्यासाठी तो नेहमी सोन्याच राहिला.

 

आमची प्रथम भेट जेजेत.

मी एक वर्ष सायन्स करण्याचा वायफळ प्रयत्न केला आणि  जेजेत आलो.

सोन्या चे व्यक्तिमत्व उठून दिसण्यासारखे,गोरा पान हिरवे घारे डोळे,जन्मतः सोनेरी कुरळे केस ६ उंची, भरदार शरीरयष्टी सहसा कोणीही दुर्ल्क्ष करणे अशक्य असे. एकूण, एक उंचा पुरा देखणा ब्राह्मण. मराठी शाळेत शिकूनही इंग्रजी चांगले  बोलणारा. सोन्या माझ्या पुढे २  वर्ष.  

सोन्याशी माझी ओळख कशी झाली हे पक्के आठवत नाही पण तो माझ्या घरापासून १० मिनिटावरच असलेल्या नावलकर बिल्डींग मध्ये रहायचा, त्यामुळे  बऱ्याच वेळा एका बसचे आंम्ही प्रवासी होतो. मी तसा कमी बोलणारा जरी असलो तरी त्या पहिल्या  वर्षात आमची बस मैत्री तरी पक्की झाली. त्यानंतर मी त्याच्या घरी बऱ्याच वेळा पोहोचलो.

त्या काळात म्हणजे १९६२ साली जे जे कमर्शियलला सर्व चारही वर्गात मुले कमी असल्याने तिथे वर्ग भेद कधीच आड  नाही आला.

सोन्याची व्याख्या करायची झाल्यास मी एका शब्दात करेन. “आत्मविश्वास.” 

त्याच्या एवढा दांडगा आत्मविश्वास आजतागायत मी पाहिला नाही. त्याच्यातल्या आत्मविश्वासाला भीती माहित नव्हती तो ज्या ज्या ठिकाणी नोकरीत होता तेथील प्रत्येक एम डी चे पान त्याच्या शिवाय हलायचे नाही.

सोन्या पास झाल्यावर जगप्रसिद्ध कवी व उत्तम आर्ट डिरेक्टर श्री.अरुण कोलटकरांच्या सोबत कामास लागला व त्यांचा उजवा हात होऊन बसला, तो त्यांच्या शेवटा पर्यंत.  

१९६५ जे जे नंतर माझी सोन्याशी भेट झालीच नाही म्हणायला हरकत नाही.

मी १९६७ ला  पास झाल्यावर एम सी एम मध्ये नोकरीस लागलो व कॉलेज मधील सर्व मित्र दुरावले, कोणाशीच संपर्क राहिला नाही. सोन्याशी देखील नव्हता. 

सोन्यातील बऱ्याच गुणांपैकी एक उत्तम गुण म्हणजे कुणालाही मदत करणे, गरीब, श्रीमंत, काळा,गोरा हे भेद भाव कधीच त्यांनी बाळगले नाहीत. सोन्या त्यावेळेस बरीच एक्झीबिशन ची कामे करत होता  

आमच्या घरातील सोफा फारच खराब झाला होता, माझया ऐकीवात सोन्या फर्निचर देखील करतो आले होते, आमचे बजेटही फारसे नव्हते, मी सोन्याला फोन केला व सोफा करायचा आहे म्हंटले दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी मापे घेऊन नवीन डिझाईनचा सोफा सामानाच्या खर्चात करून दिला. हा त्याचा मदत करण्याचा गुण घेण्यासारखा.   

१९७० साली श्री कोलटकर एम सी एम मध्ये नोकरीस लागले. मी त्यांच्या कामातून बोध घेऊ लागलो असतानाच मला  बरोडा, हैद्राबाद, बंगळूर ह्या ऑफसच्या शाखा मधून कामासाठी पाठविले गेले

मी १९७३ साली पुन्हा मुंबईत परतलो. १ एप्रिल१९७३  रोजी सोन्याचे आगमन एजन्सीत झाले व पुन्हा आम्ही भेटलो. त्याच्यात वागण्यात काडीचाही बदल नव्हता.बदल होता पोशाखात.  खादीचा सदरा व पायात कोल्हापुरी एवढाच. एम सी एम मध्य येता क्षणीच  सोन्या सर्वांचा  एम डी पासून ते शिपाया पर्यंत लाडका झाला, तो केवळ त्याच्यातल्या  प्रेमळ स्वभावाने, त्याच्या स्वभावात जग मित्र होण्याचे चुंबक होते. जो कोणी भेटला तो मित्र झालाच समजा. 



सोन्याने ऑपेरा हाउस  सोडून सुमन नगरला जागा घेतली, या नवीन सुमन नगरच्या  घरी फ्यामिली रहाण्यास आल्यवर  मला घेऊन गेला, आम्ही सर्व जेजेतील मित्र त्याच्या नागाव येथील घरी  देखील राहून आलो. मी एक जवळचा मित्र झालो होतो. 

सोन्या एमसीएमला  नोकरीस लागला तेव्हां पासून रोज मला तो स्कूटर वरून पिल्लीयन दोस्त म्हणून ऑफिसला घेऊन यायचा.  आमचा रोजचा मार्ग  ग्रांट रोड ते कोलाबा  पोस्ट ऑफिस, वाटेत खयबर हॉटेल बाहेरील पानवाल्याकडे त्याला दिवसाला लागणाऱ्या पानांची पुडकी घेऊन ऑफिसला पोहचत असू. यात कधीच खंड पडला नाही. 

ह्या काळात सोन्याचे लग्न बिन बोभाटात झाले, आदले दिवशीचा  ब्रह्मचारी दुसरे दिवशी मी त्याच्या पाठी  स्कूटरवर बसताना, “अरण्या काल लग्न केले “ असे काही तरी पुटपुटला,मला ह्या बोलण्यात खरच किती तथ्थ्य असावे,ह्या विचारात ऑफिसला घेऊन आला.आठवड्यातच मी ज्योतीला भेटलो तेव्हांच त्या पुटपुटण्यातील तथ्य जाणवले.

ह्या मैत्रीत मला सोन्या कडून बरेच काही शिकायला मिळाले. थोडा फार माझा देखील आत्मविश्वास बळावला.१९७३ ला मी एमसीएम सोडली व पुन्हा एकदा आम्ही दुरावलो गेलो. अधून मधून,नाटकाला, शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाला एकमेकावर आपटत असू, सोन्या जग मित्र असल्याने  त्याची खबरबात मात्र मिळे. ह्या काळात त्याच्या दोन्ही मुलींचे विवाह झाले, एक अमेरिकेत स्थयिक झाली व दुसरी पुण्यात. सोन्या देखील पुण्यात स्थयिक झाला. मधून मधून अमेरिकेच्या वाऱ्यां असत. 

पुण्यात बस्तान बसवले तसे अधून मधून तो फोन न विसरता करे, “अरण्या कसा आहेस.”इथल्या तिथल्या गप्पा मारून अमेरिकेत काय काय केले ह्याचा वृतांत न विसरता देत असे.

अलीकडे म्हणजे गेले १/२ वर्षात त्याचा फोन मला न येता इतर मित्रांकडून बातमी समजे

त्याचे काहीतरी माझ्या बाबतीत काहीतरी बिनसले, कि कोणी कान भरवले असावेत, त्याचा फोन येणेही थांबले, मी एकदा प्रयत्न केला पण फक्त हुं हू चे हुंकारच ऐकावे लागले.

९जानेवारीला सोन्या गेल्याची बातमी आली.

माझ्या निस्वार्थी मित्रांच्या माळेतील आणखी एक मणी निखळला.

 

Friday, January 7, 2022

 ओळख.२०२२



 “वाटते सानुली मंद झुळूक
मी व्हावे,घेईल ओढ मन
तिकडे स्वैर झुकावे”




नवे वर्ष.  नवी ओळख. 

आज मितीला Blog ला ३ वर्षे होतील.

विचारांची भरकट मात्र तिच.
 
एक विचार सरकला कि दुसरा हजर. 
असो.

जाहिरात क्षेत्रांत या भिर भिरत्या, फिरत्या मनाचा हा स्वैराचार फार उपयोगी पडला.त्यामुळेच थोडे फार यश पदरात पडले.ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते ना राज कारण ,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,

हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा केवळ टाईमपास,आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात गेल्या २ वर्षा पासून digital drawings ची भर पडलीय.

हि चित्र देखील भन्नाट विचारांचा खचखोळ.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract विचार अथवा सेल्फ portrait असे समजावे.

माझ्या थोड्याशा वाचकांना हे नवे वर्ष सुखाचे, भरभराटीचे व निरोगी जावों 



Friday, December 10, 2021

काळ

 




शुक्रवार १० डिसेम्बर २०२१

काळ


वेळ, 
ज्याला लागत नाही
ह्याला कधी कोठेही कोणीही प्रवेश
नाकारू शकत नाही,
सांगून ह्याचे येणे


रंग रूप तो ठरवेल तेच
तो आपली भेटीची वेळ स्वतः ठरवितो.
एका झटक्यात  शेकडो,हजारो, लाखोनां
तो बासरीवाल्या सारखा
एकाच वेळेस घेऊन जातो.

काल ८ तारखेस असाच त्याने 
आपल्या भारतावर मोठा घाला घातला 
आपल्या सैन्य प्रमुख त्यांच्या पत्नी व
सैन्यातील ११ अधिकारी ह्यांना 
helicopter च्या रुपात येऊन 
घेऊन गेला.
सर्वांना पुन्हा एकदा सावध 
करून गेला 'आज' जगायला 
शिका येणारा 'उद्या ' उजाडेल 
ह्या शाश्वतीत राहू नका.

कालाय तस्मै नम:

वेळ. आपल्यावर राज्य करते.
वेळ. भूत,भविष्य,वर्तमानाची साक्षीदार.

ह्या विश्वात काहीही शाश्व्त नाही.
   


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Wednesday, December 1, 2021

तारीख पे तारीख

 

तारीख दिसली कि मला दुसरीचा पहिला दिवस आठवतो.

आमच्या  बाई वर्गात आल्या व काहीही न बोलता 

'नमस्ते बाई'ह्या स्वागतास उत्तर न देता फळ्याकडे पोहोचल्या 

फळ्यावर त्यांनी एका कोपऱ्यात आकडेमोड लिहिली,

त्यावेळी पूर्ण अपूर्णांक शिकवले नसल्यामुळे 

लिहिलेल्या आकड्यांचा अर्थ लागला  नाही 

पण कुणाला विचारावे म्हणजे माझा मूर्खपणा

जाहीर होणार दुसऱ्या दिवशी बाईनी तसेच खरडले,

मी धीर करून शेजारी बसलेल्या मुलीस विचारले 

बाई हे काय लिहितात? तिने देखील खांदे उंचावून 

नकारार्थी मान हलवली, पण तिने शेजाऱ्यास 

विचारले, तो म्हाणाला तारीख तेव्हां निरीक्षण

केल्यावर  लक्षात आले कि रेषेच्या डावीकडील आकडा 

त्या महीन्याच दिवस, रेषेवरील आकडा 

म्हणजे महिना व रेषेखालील आकडा म्हणजे चालू वर्ष.

त्या दिवसापासून फळ्यावर कोपर्यात खरडलेले आकडे

म्हणजे  तारीख दिवस मोजावयाचे साधन

माझ्या पाटीवर मग वहीत, मग भिंतीवरील दिनदर्शिका 

तारीख वार वर्ष कळू लागले, मग आज अरुणचा 

"८ वा वाढदिवस "ह्याचा अर्थ लागू लागला, 

घरातील सर्वांच्या,वाढ दिवसाच्या, इतर महत्वाच्या  

तारखा दिवसा गणिक लक्षात  राहू लागल्या,

बघताबघता तारखानि मला गुरफटले, 

डोळे उघडायच्या आधीच त्या दिवसाची तारीख 

डोळ्या समोर नाचू लागली.

तारखा सरकत होत्या आणि त्या बरोबर

माझे आयुष्य सरकत होते.  कॉलेज संपले तारीख...

 पहिली नोकरी तारीख...   दुसरी नोकरी तारीख... 

लग्न तारीख...मग मुलगी, तारीख...

मग मुलगा तारीख...,  स्वतः चा उद्योग तारीख...

भागीदारीत उद्योग तारीख..., पहिली गाडी तारीख...

यशाच्या पायऱ्या तारीख..., उद्योगाचा पसारा तारीख...,  

तारीख पे तारीख पडत होती, आयुष्य पुढे नेत होती,

आज अरुणचा ७५,७६,७७ वा  वाढदिवस 

कधी आले कधी गेले, चेहरा आरशात 

पाहिल्यावर स्पष्ट दिसू लागले. 

असाच तारखांचा हिशोब केला तर 

उद्या पर्यंत २८४७० तारखा उलटल्या गेल्या,

तारीख म्हंजे काय हा बोध झाल्यापासून  

आजपर्यंत मी  २५५४९ माझ्या डोळ्यांनी उलटल्या.

उद्या पुनः  अरुणचा वाढदिवस तारीख...?

तारीख पे तारीख हा खेळ...

आपल्या  तसेच  जगाच्या अंता पर्यंत 

चालूच  रहाणार. 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.







   


Saturday, November 27, 2021

श्रद्धांजली

 श्रद्धांजली


माझ्या लहानपणापासून मी (आम्ही) सर्व भावंडे 

सकाळच्या येणाऱ्या सर्व वर्तमान पत्रे आपापल्या 

सोयीनुसार वाचत  असू,  दोन मराठी एक इंग्रजी 

व दुपारी/ संध्कायाळी  एक इंग्रजी वर्तमान पत्र.

ह्या सवयी मुळे आज हि आम्हा सर्व भावंडाकडे 

वर्तमान पत्र हातात घेऊन चाळल्याशिवाय 

दिवस सुरु होत नाही.वाचनाचे हे बाळकडू कधीच 

कडू लागले नाही., 

वर्तमान पत्रे हातात आल्यावर माझी सवय म्हणजे

पहिल्या पानावरील मथळा वाचून, मी शेवटच्या पाना पासून 

पेपर उलटा वाचत असतो कारण खेळांची बातमी

महत्वाची वाटते. राज कारणा पेक्षा त्यात रस जास्त

खेळ मी खेळत असे किंवा नसे पण सर्व खेळात मध्ये रुची .

बुद्बिबळ, ब्याडमिनटन, बिलीयर्ड्स, टेनिस, हुतुतू, क्रिकेट,

 खेळाच्या बातम्या वाचल्या कि माझे पोट भरायचे,

मग एक एक पान उलटत नजर फिरवीत जगाच्या बातम्या 

आत्मसात करत मी थांबायचो तो, त्या ओबिचुरी पानावर 

ज्यावर व्यक्तीच्या छाया  चित्राबरोबर असलेल्या  

शाब्दिक श्रद्धांजली  वाचण्यात मला आजही रस आहे.

त्या छोट्या चार ओळीमध्ये गेलेल्या व्यक्तीचे कर्तृत्व,

स्वभाव, लोकप्रियता बरेच  काही सामावलेले असते  

पुन्हा वर्षाने  जेव्हां त्या व्यक्तीस ह्याच पानावर 

पहातो तेंव्हा आपल्या ओळखीचे कोणी गेल्या सारखे 

वाटू लागते. 

आजही माझा हा नित्यनेम चुकला नाही.

प्रत्येक छाया चित्र न्याहाळून पहाणे चुकत  नाही

 माझ्या ओळखीचे जरी  नसले तरी  मेंदूत गरगर 

चक्र फिरते व मी त्या सर्वांमधील लक्षात रहाणाऱ्या

चेहऱ्यापाशी थांबतो व त्याच्या जीवनात काय काय घडले असेल 

ह्याचा तर्क बांधतो छायाचित्राखालील श्रद्धांजली  वाचून 

त्याच्या प्रियजना बद्दल उगाचच विचार करतो. 

दिवस भर  कुठेतरी मेंदूत हा विषय अडकलेला असतो.

हे सर्व नातेवाईक कशासाठी प्रिय व्यक्ती गेल्यावर  

वर्षो न वर्ष कशाकरिता हे जाहीर दुखःप्रदर्शन करतात.

जनतेच्या माहिती  करिता कि गेलेल्या व्यक्तीची बातमी 

न मिळालेल्या मित्र परिवारास  व आप्तेष्टाना कळविण्यास? 

कि त्या व्यक्तीस मोक्ष  मिळावा म्हणून? की शिरगणतीवाल्यांना कळावे 

म्हणून? एक ना अनेक प्रश्न.पण हा आठ्वणीचा  

दिवस उलटल्यावर जवळचे कदाचित कात्रण जपत असतील, 

पण देशभर गेलेल्या वर्तमानपत्रांच्या  आवृतींचे काय? 

ह्याचा विचारही  करणे कठीण.


काल २६/११ /२००८ च्या ताज आतंकवादि हल्ल्यात 

नाहक बळी पडलेल्या व  आतंकवादिंशी जिगरीने दोन हात करणाऱ्या

आपल्या पोलीस दलास मनपूर्वक श्रधांजली 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.






 





Wednesday, November 17, 2021

दिपावली

 दिपावली - आली-गेली 


दूर करोनी,  सावट करोना भीतीचे. 

तुमची, माझी, आपली 

आली, आली,आली, यंदा बार उडवीत आली,

 

हसत, खुशीत, आनंदात, आली वाजत गाजत !

झगमग झगमग   झगमगाट पणत्यांचा,

दारोदारी पसरीत गालिचे रांगोळ्याचे !


ऐका गम्मत आमुच्या  घरची,

वर्शो न वर्षे न बदलले काही  

मिट्ट काळोखी डोळे चोळीत 

स्वागत करती भाव गीतांनी  पहाटेचे 


तेल उटणे लाउनी केली तयारी अभ्यंग स्नानाची

लहाना पासून मोठ्या पर्यंत 

झाली सज्ज, 

नटुनी तयार,घाई फराळ खाण्यासी


 लाडू, चकली, करंजी, 

अनारसे आणि चिरोटे, 

आईने, सजवली  फराळ ताटे,

सरसावून हात मारीती सारे  फराळावरी. 


आजीने उजवल्या पणत्या  अंगणात,

केले वाटप बाबांनी फुलबाजा,अनाराचे, 

 प्रसन्न होई मन पाहुनी, कारंजे, फुलबाजे फुलताना, 

 पाहून भुई चक्राला, सर सर  फिरताना वाटे, 

असेच असावे, चक्र सुदर्शन त्या गिरीधराचे. 

आली मावशी आली आत्या, 

पाहून मामा मामीला,

फुलली कळी आजीची, 

पाहिले तीस मी पदराने,

डोळे  हळूच टिपताना

गजबजले घर, अंगण, गप्पा शप्पाने . 

आली दिपावली घेउनी ४ दिवस 

कौटुंबिक जिव्हाळ्याचे,

ना समजले न उमजले 

कधी  गेले ४ दिवस मजेचे


हिरमुसली आजी एकली विचाराने 

 पाहीन का मी हा आनंद येत्या वर्षी 

 भरल्या डोळ्यांनी. 


जमलेले कुटुंब हळू हळू विखुरले

घर गजबजलेले, आता शांत झाले,

आली आली गेलीगेली दिपावली, 

आनंद पसरून.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.



 

    

  

 



  


बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...