Wednesday, February 22, 2023

तारांगण

 मनाला वाटले

तेच मी केले 

 बागेत टाकले खाटले,

निवांत पडलो त्यावर,

बघत,

तारांगण लुकलुकताना.

ओळखत, सप्तर्षी,धनुर्धारी,बारा राशी,

 चंद्राची रासक्रीडा,

अढळ ध्रुव ऐटीत चमकताना 

सारे  कसे रम्य पण प्रसन्न,

पापण्यांत साठवून हे तारांगण,

 शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या,

बरे झाले ऐकले मी मनाचे. 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Tuesday, January 31, 2023

ध्रुवोत्तर

 ध्रुवोत्तर 

प्रश्न पडत होता म्हणून, उत्तर सरसावले, 

प्रश्नाला हात देऊन, त्यांनी त्यास  सावरले 

तेव्हढ्यात कोणीतरी ओरडले

चूक चूक उत्तर चुकतेय, उत्तरांनी दिला हात सोडून,

गेले तिथून निघून.  प्रश्न पुन्हा (बुचकळ्यात) पडला, 

उत्तर काही दृष्टि  पडेना, कोणास उत्तर  सापडेना

शोधा शोध केली सर्व अक्षरांनी, स्वल्प विराम, 

अवतरण,उद्गार,अर्ध विराम 

शोधून शोधून थकले. 

बुचकळ्यातून  प्रश्नाला ना काढू  शकले.

प्रश्न,प्रश्न

बुचकळ्यातून बाहेर येईना,

अन उत्तरीत प्रश्न तसाच राहिला अनुत्तरित

"जीवन म्हणजे काय?"

अक्षरांना बाजूस सारून 

पूर्व,पश्चिम,दक्षिण धावून आले मदतीला,

म्हणाले 'चला शोधूया उत्तरेला' 

लुक लुक लुक्णाऱ्या ध्रुवाने हक मारली

अरे वेड्यांनो, उत्तर माझ्या घरात आहे

सर्व  एक सुरात ओरडले, ठाऊक आहे आम्हाला, 

पण प्र्श्नाच्चे उत्तर कुठाय? माहित आहे काय?"

फारच सोपे आहे उत्तर, हसत,हसत  ध्रुव म्हणाला 

ऐका तर  "जीवन म्हणजे अढळ रहाणे "

कोणी न म्हणावे "उठ " कोणी न म्हणावे "बस"

आपले 'जीवन' ही आपली नौका 

वल्हवा आत्मबळावर, 

आपल्या मर्जीने, पाहिजे त्या दिशेने,

हेच जीवनाचे सार. 

Saturday, January 7, 2023

गुरुदक्षिणा

नव वर्षआरंभ.

आज लागला मुहूर्त. ५ दिवस उलटून गेले. 

३६० राहिले.सवय झालीय आता 

दिवस मोजण्याची.

खास भेट मिळालेल्या घोटीव कागदाच्या 

वहीत सुरवात केली.

माझ्या विद्यार्थीनिची हंपीवरून 

आणलेली भेट.

विद्यार्थ्या कडून भेट घेणे 

माझ्या स्वभावाला न पटण्या सारखे.

तिने देताना सर गुरुदक्षिणा, म्हणून आणलीय.

त्यावरील चित्र पहा, ते पाहून मला तुम्ही दिसलात..

आणि माझ्या खिशाला परवडण्या सारखी होती.

मी काही न बोलता  स्वीकारली.

सर,दुकानात असलेल्या गर्दीत सामील झाले

आणि माझी नजर ह्या छोट्याशा वहिवर पडली,

ते चित्र पाहून तुमच्या वृक्षासारख्या ज्ञानाच्या

सावलीचा  लाभ आम्हाला मिळाला 

म्हणून ही गुरुदक्षिणा समजा.

मी गप्प,

नववर्षाची  सुरवात ह्याहून 

उत्तम होऊच  शकत नाही. 

HAPPY  NEW YEAR EVERYONE

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Saturday, December 31, 2022

शेवटचा सप्ताह

 शेवटचा सप्ताह.

५१ आठवडे. गेले, घालवले, ढकलले, जोपासले. 

गेले.

आजारा शिवाय,

म्हणजे जेथे बाहेरील डॉक्टरची 

गरज भासली नाही. देवाची कृपा.

सर्व साधारण सर्वांनाच 

होणारे सर्दी, खोकला, डोके दुखी,

ह्यात घरातील औषधे 

काढा, वाफारा, बाम,

चाटण, ह्यांनी आप आपले काम चोख बजावले.

आजीचा बटवा कामी आला,

घालवले.

पावसामुळे,

टी. व्ही , बघण्यात

वर्तमान पत्र वाचण्यात(बघण्यात) 

खिडकीतून रहदारी बघण्यात

पंखा कमी जास्त करण्यात 

वाद उकरून काढण्यात

वामकुकक्षीत्त 

ढकलले

 कपड्यांचे, पुस्तकांचे 

कपाट लावण्यात  

कपड्याचा ढीग  इस्त्री करण्यात  

मित्रांना भेटण्याचा कंटाळा करण्यात

अर्थहीन बडबड ऐकण्यात

जोपासले.

मराठी,इंग्रजी 

कादम्बऱ्या वाचण्यात  

सुमधुर श्रवणीय संगीत ऐकण्यात

हिंदी सिनेमातील 

जुनी गाणी ऐकण्यात, 

लता आशा, सुमन किशोर 

मोहमद , मुकेश, तलत 

हेमंत , मन्ना ह्यांना धन्यवाद  देण्यात,

डिजिटल पेंटींगस करण्याचा 

मनसोक्त आनंद, 

माझ्या ब्लॉग वर लिखाण 

करण्यास वेळ देण्याचा 

उत्साह जोपासला.

शेवटचा 

सप्ताह  

आज येशू जन्माला येईल 

उद्या त्याचा जन्म दिवस 

साजरा होईल. मग राहिले ५ दिवस

नवीन वर्षाच्या आगमनाचे, नवीन 

वर्षाचे निश्र्चय मोडण्याची  यादी तयार होईल.

शेवटचे दोन दिवस आप आपल्या 

आवडी नुसार कार्यक्रम आखले जातील.

माझे मात्र ठरलेय माझ्या आवडत्या 

टीव्ही समोरील खुर्चीवर स्थानापन 

होऊन च्यानल बदलीत १२ चे ठोके

फटाक्यांची रोषणाई पाहेन / ऐकेन.

सर्व काही शांत झाले व बायको जागी 

असल्यास नव्या वर्षाच्या शुभेछांची

देवाण घेवाण  होईल. 

संपले २०२२.

पहाटे सुर्योदयास नमस्कार करून 

नववर्ष सर्वांस सुखाचेआनंदाचे  

जावो ही  प्रार्थना करून 

२०२३ वर्षाचे 

स्वागत करेन.

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Friday, December 16, 2022

५५ वर्षे एक तपश्चर्या.

 गेले काही दिवस मी  केलेल्या कामाचा सुटसुटीत पोरटफोलिओ बनवायला बसलो होतो.. सुरवातीला वाटले कि सहज एक दोन दिवसात आटपेल. पण मला स्वत:लाही विश्वास बसणार नाही एव्हढे काम मी गेल्य्या ५५ वर्षाच्या कारकिर्दीत केले आहे.

क्षमा करा मी गेली ५५ वर्षे जाहिरात व्यवसायात क्रिएटीव्ह डीरेकटर म्हाणून सक्रीय आहे.

माझेच काम मी कॉम्पुटरवर एकत्रित करत बसलो(य) जे अजून हि संपले नाहीय. कमीत कमी १५ दिवस अजून जातील से वाटते आहे.

जाहिरात विश्वातील माझ्या माहिती प्रमाणे आज मिती पर्यंत सर्वात अधिक वर्षे सक्रीय असणारा मी एकमेव असेन , असा माझा तरी समज आहे.

ह्या ५५ वर्षात मी सर्व प्रकारच्या मिडीयम मध्ये, म्हणजे वर्तमान पत्रे, होर्डीगस. पोस्टर्स,फिल्म. टी. व्ही. काम केले आहे. हि एक प्रकारे कामाशी प्रामाणिक राहून केलेली तपश्चर्या होय.

आज का कुणास ठाऊक आपल्या ब्लॉग वर आपले काम टाकावेसे वाटले. माझ्या मोजक्या वाचकासाठी एक छोटसे प्रदर्शन समजा. आवडल्यास जरूर कळवा,  आणखी बरेच काम येथे टाकू शकत नाही कारण मला येथे निट रचनेत मांडता येत नाही त्याबद्दल  खेद.

Saturday, November 5, 2022

खचखोळ सप्ताह

सोमवार:

नव, नवीन 

जूने, जुने

हरवले ते कोठे गेले,

सापडेल तरी कोठे?

नाही कळत, कधी उमजेल...

काय हरवले? 

धुंद आठवणीत,

 वेडे मन. हरवून गेले.

मंगळवार:

भिर भिरल्या आठवणी 

काही ठळक काही पुसट 

लहानपणीच्या, 

तुझ्या विजयाचे प्रतिक

माझ्या उजव्या 

हातातील कडे'

सरकवीताना, 

तुझ्या चेहऱ्यावर ओसंडलेला 

तुझ्या 'आनंद' नावाचे सार्थक,

करणारा आनंद 

आजही दिवसातून 

असंख्य वेळा आठवण 

ते कडे वर खाली करताना 

त्या ६२ वर्षा पूर्वीच्या दिवसाची,

आज तुला जाग येऊन 

बरीच वर्षे लोटली सर्व काही विसरून,  

नवा जन्म घेऊन तू आज 

जगाच्या पाठीवर सुखात असशील 

मी मात्र तुझ्या आठवणीत 

मी त्या चिरंतन झोपेची वाट पहात

आजही अडकलोय.

बुधवार :

झाली पहिली ओळख त्याची 

तिच्याशी नजरेने. जवळीक 

वाढली केवळ नजरेच्या भाषेने,

वाचक मात्र ती दोघेच त्यांना

गरज नव्हती शब्दांची.

डोळ्यात वाच माझ्या ...

गुरुवार : 

अबोल प्रेम,

चाफ्याचे आणि सोनटक्याचे

फुलांची अदला बदल 

हेच त्यांचे बोल

एक सुवासिक प्रेम 

अबोलच राहिले. 

शुक्रवार:

तारुण्याची ऐट

औट घटकेची 

बघता बघता 

विश्वसुंदरी देखील 

म्हातारी होते. 

"आज" मिळालेला आनंद 

समजण्या आधीच 

"काल चा " होतो.

वार्धक्य थांबवणे  म्हंजे 

सूर्यास उगविण्या पासून थांबवणे. 

-----------------------------------------

शनीवार:

आयुष्यात काही केले का?

उत्तर नसलेला प्रश्न 

भेडसावू लागलाय 

उत्तर सापडण्यास 

उशीर झालाय का?

नसावा 

नाही नक्कीच,

it's never too late.

-------------------------

रविवार :

शांत मन घेऊन 

डोळे झाकले, 

जाग सकाळी आली 

पुसल्या पाटी सारखी

खच् खोळ विचारांचा खडू, 

सज्ज  झाला 

नव्या आठवड्यासाठी. 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Thursday, October 13, 2022

रिकामा न्हावी...

 नुकताच  सूर्योदय होत होता.

आकाशाची लोभनीय लाली पहाताना,

नेहमी सारखी विचारांची वावटळ 

भिर भिरू लागली,थांबली ती एका 

वेड्या विचारावर.

विचार म्हणा किंवा रिकामपण म्हणा.

आज  पर्यंत म्हणजेच गेल्या ७८ वर्षात 

"आपण किती मनुष्य प्राण्यांना भेटलो?"

झाले, लगेच तुंबडया लावण्यास सुरुवात.

१) आसमंत: 

जन्मानंतर पहिली पाहिली घरातील,

बिल्डींग मधली, नात्यातील, घर पोच 

वाण सामान व इतर जीवनापयोगी

घरपोच पोहचवणारे, आस्म्न्तातले 

दुकानदार, मार्केटमधील भाजी,फळ,

मासे,मटण, कोंबडी, व इतर विक्रेते

एकूण अंदाजे ३००+ ह्यातील अर्धे अधिक 

आजही नाव,चेहऱ्या सहित आठवतात.

२). मोंटेसरी ते इयता ४थी.(वय ६ ते ९)

वर्गातील ४०+ इतर वर्गातील कमीत कमी 

४० नावे,चेहरे मी आज हि भेटल्यावर ओळखेन.

३). इयता ५ वी ते ११वी वर्गातील,

शाळेतील इतर, मास्तर, बाई, शिपाई,

मुलांचे आई ,वडील, क्यांटीन, बोरे,आवळे, 

भेल, केळी विक्रेते.अंदाजे ५०० सहज.

४) ११वी स्पेशल गणित क्लास, हिंदी स्पेशल

कोवीद परीक्षे पर्यंत येथे १०० ओळखी.

५) कॉलेजच्या  ५ वर्षात भेटलेला मित्रपरिवार,

गुरुजन, बस, ट्रेन प्रवासातील भेटणारी 

माणसे, 

नोकरीतील ५० वर्षे सहवासातील,

लग्न, सामाजिक समारंभात झालेल्या 

असंख्य भेटी, तंगड्यात तंगडी असलेले 

एकमेकांचे नातेवाईक,शेजार पाजार.

 मित्रपरिवार.ह्या व्यातरिक्त डॉक्टर, वकील, प्लम्बर, 

इलेक्ट्रिशिअन,हॉटेल ओनर्स, वेटर्स, 

समाज सुधारक, राजकारणी, चांभार सुतार,

वगैरे, वगैरे वगैरे,...ह्या सर्वांना नावासहित 

आठवत बसलो, ते दुपारच्या जेवणाची हाक 

येईस्तो आकडा ५००० पर्यंत गेला  , 

माझा वेळ मस्त गेला.

त्याजबरोबर 

रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी 

म्हण सार्थक केली.

(देवाने  पुरुशांना २.७ ग्र्याम मेंदू व स्त्रियांना २.२ग्र्याम)* 
एवढासा मेंदू (५-५ X६.५ X ३ .६से.मी.)
शर्टाच्या खिशा एवढा  
कुठल्याही बाहेरील अधिक जीबीची 
मदत न घेता जगातील सर्वात मोठे
आठवणींचे स्टोरेज स्पेस,  प्रत्येक जीवितास 
भेट दिले आहे.

भगवान तुसी ग्रेट हो. 

*The average brain weight of the adult male was 1336 gr; for the adult female, 1198 gr. With increasing age, brain weight decreases by 2.7 gr in males and by 2.2 gr in females per year. Per centimetre body height, brain weight increases independent of sex by an average of about 3.7gr 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...