Tuesday, September 10, 2024

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम, 

 


ते देखील दुतर्फी,

विचार करा १ नाही तर ५ वर्षे 

त्याचे रोज तिच्या बाकावर 

नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच 

हळुवार हाताने पिवळा चाफा ठेवणे, 

पाहिलंय मी. 

तिला पण पाहिली,

चहूकडे नजर टाकीत स्मित करीत 

चाफा वेणीत माळताना, 

तो देखील सर्वांच्या नजरा 

सम्भाळत तिने बाकावर ठेवलेला

सोनटक्का मुठीत घेऊन वास घेताना

पाहिलंय मी, त्याला 

दोघांच्या नजरेतील अबोल प्रेम 

ओसंडताना पाहिलंय मी.

५ वर्षे ५ दिवसासारखी सरकली.

शेवटच्या दिवशीची त्यांची मानसिक 

ओढाताण पाहवेना मला. 

आज चाफा नाही माळला 

त्याने देखील सोनटक्का नाही शोधला,

कॉलेज गेट मधून बाहेर पडताना 

मान मोडेस्तोवर एकमेकाकडे 

वळून,वळून पहात, करुण नजरेने  

वेगवेगळ्या वाटेने निघून जाताना,

अबोल प्रेमाचा शेवट झाला.


मनात एकच प्रार्थना 

घेऊन मी हि वळलो माझ्या  वाटेवर 

कधीतरी चाफा आणि सोनटक्क्यास 

प्रेमाचे बोल, सूर सापडतील 

हे प्रेमही  बोलके होईल.

 

 




  



Sunday, September 8, 2024

पितृछत्र

ऐन तारुण्यात पितृछत्र हरवले,

पितृछत्र म्हणजे काय
याची जाणीव झाली.
रोज दिसणारी व्यक्ती अचानक
कायमच्या सुट्टीवर जाते,
हाक मारणारा आवाज
ऐकूच येत नाही आशीर्वादाचा हात
डोक्यावरून फिरत नाही
गाऱ्हाणे ऐकणारे कान बहिरे होतात
अशाप्रसंगी...हृदयात जपलेल्या
पितृ प्रतिमेशी स्वगत करून
आयुष्याचे गाडे ढकलावे लागते.
आज बघता बघता...
57 वर्षे उलटली.

Monday, September 2, 2024

नारळ का नाही पडला????




आला, आला आला वारा! 

सोसाट्याचा वारा !!


ताड नाही पडला 

माड नाही पडला 

 नारळ नाही हल्ला...अरेरे  

छत्रपतींचा 35  फुटांचा पुतळा 

मात्र पाडून  गेला, 

सुरु झाला कल्ला, 

कसा पडला!  पडला कसा!

कोण म्हणे वारा कोण म्हणे पाऊस

जनतेस प्रश्न पडला??? 

नारळ का नाही पडला????


आले मंत्री आले संत्री 

बोटे एकमेकाकडे  दाखवू लागले, 

बनवला कोणी? कोणी? कोणी?

तो कुणाचा कोण? चर्चेला आले उधाण,

याचा मित्र, त्याचा भाऊ, त्याचा नातू, 

या गोंधळात, 

शिल्पकार फरार, शोधू कोठे?

नौदल, पोलीस चक्रावले,

महाराजांसमोर गुढघे टेकून, 

खालच्या मानेने हा मंत्री, तो मंत्री, माफी स्तर सुरु झाले,

झालेला गोंगाट दिल्लीत पोहचला 

जनतेचा कैवार मिळवण्यास, धावत आले पंतप्रधान,

महाराजांची लोटांगणा सहित माफी मागितली एक डोळ्याने, 

दुसरा डोळा इलेक्शन  वर ठेवून. 

महाराजांच्या कमजोर पुतळ्या प्रमाणे 

तीन पायाचे सरकार पडेल कि काय?

याचे भय वाढू लागले,  

तीन दिशेला तिघे गेले, 

विरोधकांवर आरोपाच्या फैरी झाडू लागले,

विरोधकांना कारण मिळाले,

जोडा मारो आंदोलन छेडले,

सुज्ञ जनता समजावयाचे ते समजून गेली,


रोज मरे त्याला कोण रडे?


जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा

 


 



 



  

 

 






 

Monday, August 26, 2024

उज्वल भविष्य



उज्वल भविष्य बेरोजगारी वर जालीम उपाय! कुठल्याही प्रकारचे  साईड  इफेक्ट्स नाहीत 

हा उपाय आता भारतात उपलब्ध!! आपल्या महाराष्ट्राच्या मुख्याना देशाच्या मुख्याने दिलेला कानमंत्र !!!!

बेरोजगारी नाहीशी करणार युवा रक्त आता परदेशाचे गाजर खाणार आपल्या देशाला जर्मन भाषेत राम राम ठोकणार 

लग्न संसार आता जर्मनीत. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा तुम्हाला महाराष्ट्र सरकार स्वखर्चाने शिक्षण व नोकरी देणार 

आता तुम्ही जर्मन होणार. आपल्या राष्ट्राची बेरोजगारी हटवणार.

तरुणांनो विचार करा पक्का. मायबोली,संतवाणी,महापुरुष आता जर्मन होणार, 

तुमच्या ललाटावर मोठे भाग्य महाराष्ट्राचे मुख्य व दोन उप लिहिणार.


त्या बदलय्यात जाता जाता  मत पेटित  गुरु दक्षिणा टाकण्यास विसरू नका. कधी मध्ये आठवण झाली तर येत जा.

 

कृष्णजन्माच्या शुभेच्छा

 कृष्णाय वासूदेवाय 

हरये परमात्मने 

प्रणतीक्लेश नाषाय 

गोविंदाचे नमो नमः



कृष्णजन्माच्या शुभेच्छा
 

Wednesday, August 21, 2024

तू आणि मी


 मी: तू काय करतोस?

 तू: काही नाही 

 मी:  काही करत का नाहीस?

 तू: मी आळशी आहे.

 मी:  तू आळशी का आहेस? 

 तू: कारण माझ्या जवळ 

कळशी नाही, हाहाहा!!

 मी:  कसला फालतू विनोद करतोस?

 तू: फालतू प्रश्नास फालतू विनोद हाहाहा!!

काही कर ना? पूर्वीसारखे?

 तू: म्हणजे ?

 मी:  वाघाचे पंजे! हाहाहा!!

आता माझी टर्न फालतूपणाची!

 मी:  बरे चल थोडे सिरिअस बोलू.

 तू: ओके, 

 मी:  तू मागे कसा वेळ मिळाला की

सुंदर बासरी वाजवायचास किंवा 

वाचलेल्या पुस्तकातील छान प्यासेजेस , 

नाटकाचे सवांद,कविता वाचून, 

श्लोक, अभंग म्हणून दाखवायचास  

फिल्मचे रिव्यू लिहायचास आणि बरेच काही

तुला असा आळशी बघायची सवय नाही,

अलीकडे तू एक प्रेमवीरा सारखा उदास 

बसलेला असतोस, मी भेटल्यावर देखील 

तुझ्याकडे, काय कशी आहेस? ह्या पलीकडे 

डायलॉग नसतो. चल हो बघू पूर्वी सारखा.

 तू: म्हणजे कसा? मला काही तरी पूर्वी पाठ केलेले 

म्हणून दाखव, चल उठ हो जागा! 

 तू: नक्की? 

 मी:  हो रे बाबा!

 तू: तुला मी अनंत फ़ंदीचा फटका ऐकवतो.

ऐकलास कां कधी?

तुझा दुपट्टा दे, 

 मी:  कशाला?

 तू: असाला कि मसाला चार शिंगे  कशाला?  हाहाहा!!

बघत रहा. कसा जोशात सादर करतो!

 तू: तुझा दुपट्टा दे, (दुप्पटा डोक्यास फेट्यासारखा बांधतो)   

ऐक लक्ष  देऊन. 

बिकट वाट वहिवाट नसावी ,

धोपट मार्गा सोडू नको 

संसारा मादी ऐसी आपुला 

उगाच भटकत फिरू नको 

चल सालसपण, धरुनी निखालस,

खोटा बोला बोलूं नको,

अंगी नम्रता सदा असावी 

राग कुणावर धरू नको 

नास्तिकपणी तू शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊ नको 

आल्या अतिथा मूठभर दाया मागे पुढती पाहू नकॊ 

मायबापा वर रुसू दुर्मुखलेला असू नकॊ 

व्यव्हारा मध्ये फसू नको...

आणि बरेच काही अंनतानी लिहिलंय 

रॊखरच फटका म्हणजे संसाराचे मर्म...  


अरे, अर्धवट सोडू नको मला पण फटका ऐकून शिकायचंय 

बरे तर ऐक,

परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करु नको॥१॥

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलुं नको

बुडवाया दुसर‌याचा ठेवा, करनी हेवा, झटू नको

मी मोठा शाहणा धनाढ्याही, गर्वभार हा वाहू नको

एकाहन चढ एक जगामधी, थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिब गरिबांला तूं गुरकावुं नको

दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथां घेउं नको

विडा पैजेचा उचलुं नको

उणी तराजू तोलुं नको

गहाण कुणाचे डुलवु नको

उगिच भीक तूं मागुं नको

स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको

बरी खुशामत शाहणयाचि परी मुर्खाची ती मैत्री नको

कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरू नको

दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको

असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको

आतां तुज गुजगोष्ट सांगतो. सत्कर्मा तूं टाकुं नको

सुविचारा कातरु नको, सत्संगत अंतरु नको

दैत्याला अनुसरु नको, हरिभजना विस्मरू नको

सत्कीर्ती - नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको



तू : डोक्यात काही शिरले का? शिरायला आधी डोके लागते... हाहाहा!!

 मी:  खरंय तुझे... हा फटका एवढा जोरात बसलाय की रोज पठण करेन तेव्हां  कुठे समजेल व त्यानांतर आचरणात आणणे आणखी कठीण. ते जाऊ दे समाधान एवढेच की तुला पूर्ववत बोलता केला. असाच आनंदात रहा या ओळी आता ¸लक्षात ठेव.


मायबापा वर रुसू नकॊ 

व्यव्हारा मध्ये फसू नको... 

दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको





अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. त्यांचे आडनाव घोलप. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने यांचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. त्यांची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ हा त्यांचा  उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून ते कीर्तन करू लागले, अशी आख्यायिका आहे. त्यांनी श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची यांच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या यांच्या काही लावण्या आहेत. त्यांचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता.

 



 

 



 

   






 
















Tuesday, August 13, 2024

अहो, देश चाललाय की !

 

अहो, चाललय काय?

ट्राफिक नाही हलत,

पाऊस नाही थांबत,

ट्रेन नाही चालत,

विरोधकांसाठी सरकार नाही चालत,

पेट्रोल, डीझेल, फळे भाजी पाला, 

महागाई शिवाय देश नाही चालत,

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

लष्कराची दमदाटी,राजकीय हेराफेरी,

बँकांची लुट मार चालूच,

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

निवडणुका कोपऱ्यावर 

मुख्य मंत्र्यांच्या नवीन गर्जना

चालूच आहेत,  बनून भाट, 

दिल्लीच्या धन्याची स्तवन गातायत,

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

 ऐका, हो ऐका 

आठवण झाली लाडक्या बहिणींची 

मिळणार ओवाळणीचे गाजर  १५०० रुपये

खिसा रीकामा असताना लाडक्या बहिणींना, 

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

खुर्चीसाठी पक्ष/पक्षी उडतायत,

ह्या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात 

घोडे बाजार नेहमीचा झालाय

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

 देवाचा अंश असलेला एकमेव पंतप्रधान

लाभलाय या देशाला आता कसली भीती 

मागाल ते वरदान पडेल पदरात.

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

आपण खुर्चीवर नसणार ह्या खात्रीने,

 गर्जना बहिऱ्या कानी पडतायतात 

घोटाळे चालूच आहेत,जरांगे बोम्बलतोय, उपोषण करतोय  

तरी देखील देश चाललाय,राष्ट्र चाललंय 

असा हा सावळा गोंधळ

राज्या राज्यातून चाललाय

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

अर्थमंत्री, कॉर्पोरेटना खुश करून

बजेटचा शिरा फक्त ब्राम्हणा बरोबर खातायत, 

ओबीसी दोघे दारातून वास घेतायत 

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

पंतप्रधानांचे भ्रमण मात्र जोरात चाललय, 

मीच राजा समजून पंतप्रधान ऑस्ट्रियाला 

ऑस्ट्रेलिया सम्बोधून जगाला हसवतायत, 

विराट छक्के मारून संघास निडर बनवतोय,

कंगना मी खासदार म्हणून गालावरील 

५ बोटांचा ठसा लपवतेय 

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

दस्तूर खुद पंतप्रधान व गृह मंत्री 

कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करतायत

शेअर बाजार वधारतोय,

अहो, चाललय काय?

अहो,  देश चाललाय की !

स्वातंत्र्य दिवस साजरा करू या. 

हर घर मे तिरंगा लावू या!

लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा जनतेस 

खोटी वचने देऊया  


गांधीजींच्या तीन माकडाच्या 

उलट अवस्था, आता झालीय जनतेची

डोळे, कान, भाष्य उघडे ठेऊन,

हे सर्व बघत ऐकत तुमचे, माझे,

आयुष्याचे रहाट गाडे चालवू या !


अहो,  देश चाललाय की !



यंदा स्वातंत्र्य दिवसाला लाजरा करूया. 


 









Monday, July 29, 2024

फ्री! फूकट! फ्री!

 फ्री! फूकट! फ्री!


विलन कसे बनावे किवां दुष्टपणा अंगी 

कसा भिनवावा ह्याचे ऑन लाईन क्लासेस.

वयाची अट नाही! दूध पित्या बाळा पासून 

ते घरातील वृद्धां पर्यंत कोणीही.

धर्म जात याचा मज्जाव नाही. 

दाक्षिणात्य दुष्टपणा ( बऱ्याचशा मालिका दक्षिणेतील मालिकेचे अनुवाद आहेत)

महाराष्ट्रात पसरवा.

वेळ: सायंकाळी ७ ते रात्रौ ११:३०. 

नाते कोणतेही असू द्या 

भाऊ, बहीण, सावत्र,सख्ख्ये , 

मानलेले, शेजारी, पाजारी, 

नेता, सावकार, पाटील,

गल्लीतले, बोळातले! 

कुठलेही म्हणजे कुठलेही.

शिकण्याचे विषय देखील 

द्वेष, मत्सर, लोभ, काम, क्रोध,

लोचटपणा, तुम्हाला शिकावेसे 

वाटतील असे. तुम्ही स्वत:चे शिक्षण 

कधी संपवायचे स्वतः ठरवू शकता 

अथवा आमचे रेकमंडेशन सिरीयल 

संपेपर्यंत केल्यास तुम्ही दुष्टपणाचे 

अनेक पैलू आत्मसात करू शकता.

उदाहरणार्थ

तुला शिकवीन चांगलाच धडा :झी मराठी 

प्रसारणाची वेळ: दररोज रात्री ८ वाजता

वाहिनी: झी मराठी

शिक्षक पात्र:

भुवनेश्वरी

चंचला 

या दोन्ही पात्रांकडून आपण 

दुष्टपणा कसा करावा

हे उत्तम प्रकारे शिकू शकाल.

ह्या व्यतिरिक्त सायंकाळी 

सात वाजल्या पासून रात्रौ ११:३०पर्यंत . 

तुम्ही तयारीत राहून तुम्हाला पसंत 

पडेल ते व्यक्तिमत्व स्टार टीव्ही 

अथवा झी टीव्ही पाहत राहावे.

आज पर्यंत ह्या दोन वाहिन्यांनी 

समाजात दुष्टाव्याची अनेक रोपे लावली असावीत 

ज्यांचा आपणास आपल्या आसपास 

आढळून येत असतीलच

बघा आणि विचार करा. 

समाजाचे भले कशांत आहे?

फ्री! फूकट! फ्री! मिळते आहे 

म्हणून हे दुष्ट धडे शिकणे चांगले 

की आपला टीवी बंद, अथवा 

माहिती बोधपर चॅनल पहाणे 

योग्य. सर्वात उत्तम आप आपल्या 

कुटुंबा बरोबर उत्तम वेळ 

घालविणे योग्य. 

सबळ कारण तुम्ही शोधावे.  




Saturday, July 20, 2024

‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’

 गुरु पौर्णिमा 

इयता ५ वीत न्यूटनच्या ‘गुरुत्वाकर्षण’ शोध आणि ‘गुरुपोर्णिमा’ह्यात विशेष फरक  नाही हे मत मी मनोमनी  पक्के केले होते.  त्याच वेळेस मराठी व्याकरणात शब्दाची संधी फोड शिकत होतो. 

गुरुत्वाकर्षण’= गुरु + त्वा (तूझे ) + आकर्षण 

म्हणजेच :

ज्या व्यक्तीस आपण ज्ञान देणारा’ मानतो त्याच्या कडे आपण आकर्षित झालेलो असतो. म्हणजेच

‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’ हे  समीकरण माझ्या बालमना (?) पासून  ते आजतागायत रुतले आहे.

पुन्हा एकदा उजळणी असो.

त्याच लहान शाळेतून मोठ्या  शाळेत (ईयता ७वी) गेलो तेव्हा वर्गात पुनर्वसन केलेल्या मुलांच्या होणाऱ्या 

सवांदावरून  “चांदोरकर बाई’ म्हणजे ‘गुरूत्वाकर्षण.’मेंदू थोडा गोंधळला अर्थ खरा कोणता न्यूटन की बाई?

म्हणजेच चांगल्या शिकवणाऱ्या (?) समजावणाऱ्या शिक्षकाविषयी वाटणारे आकर्षण 


कसे काय?

ह्याचे उत्तर मी स्वतःस दिले की जो गुरु गुरुपोर्णीमेस आठवत नाही ते गुरूत्वाकर्षण नव्हे.नोकरीत देखील आपला 

वरिष्ठ हा आपला गुरु, हा समज मात्र एकलव्या प्रमाणे दुरूनच अनुभवले.

आपल्याला आयुष्याचे मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला हवा हे मनाशी पक्के केले पण ह्या गुरूला शोधावयाचे कुठे?  हे काही समजेना ‘वेळ येईल तेव्हा बघू’ अशी स्वतः ची समजूत काढली. जसा कामातून मोकळा झालो तेव्हां पुन्हा ‘गुरु’ शिवाय मोक्ष नाही असे बऱ्याचदा कानावर पडू लागले.काही बोधप्राय  वाचनात देखील आली, जसे.

गुरु एक असे तेज आहे ज्यांनी मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.

गुरु म्हणजे असे ज्ञान: की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 

गुरु ही एक अशी दीक्षा आहे: की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 

गुरु ही एक अशी नदी आहे: जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते. 

गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे: जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 

गुरु म्हणजे एक बासरी आहे : जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि 

शरीर आत्मानंदात मग्न होऊनजाते.

गुरु म्हणजे केवळ अमृतच: ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 

गुरु म्हणजे एक अशी कृपाच: असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि 

काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.

गुरु कुबेराचा अक्षय्य पात्र आहे: त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

गुरू म्हणजे एक प्रसाद आहे: ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही. 

असे बरेच कानावरून गेले आणि मी चांगलाच संभ्रमात पडलो

कारण...

आतापर्यंत झालेले महात्मे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच साई बाबा,शेगावचे गजानन  महाराज, अक्कल कोटचे 

स्वामी समर्थ, ह्यांना देखील माझा नमस्कार एक अद्भुत शक्ती म्हणूनच नम्रपणे होतो.

अंध श्रद्धेचा फायदा घेणारे आसाराम बापू सारखे अनेक गुरु वावरताना पाहून ‘गुरु’हा केवळ शब्द असावा असे वाटू लागते.

अजूनही गुरु भेटेल हि आशा मात्र आहे ज्या दिवशी मला 'गुरु' लाभेल 

त्या दिवशी  ‘गुरूत्वाकर्षण.’ चा अर्थ 

समजेल अशी अशा बाळगून आहे.

गुरुपोर्सणिमे निमित्, सर्व गुरुजनाना समर्पित.

 

 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 


Friday, July 19, 2024

अब कि बार ४०० पार

 


झाल्या निवडणूका 

सुटला होता वारा भाजपा चा 

अब कि बार ४०० पार 

होता हा नारा!

शहाण्यां जनता जनार्दनांनी

बदलली दिशा वाऱ्याची,

रडत खडत २४० मिळवले भाजपाने 

 मात्र सत्तेसाठी कमी पडले 

लंगडत रडत कुबड्या शोधल्या,                                                             

स्वार्थी आले पुढे दोन, सरकार पुढे शर्ती  ठेऊन,

केले सरकार त्यांनी चालू 

स्वार्थी निर्लज्ज बोके पुन्हा एकदा 

गादीवर बसले,

राष्ट्र्पतींनी, दिलेले भाषण वाचले,

राष्ट्रपतींच्या भाषणास खणखणीत

प्रत्युतर दिले विरोधक म्होरक्याने 

धाबे दणाणून सोडले सत्ताधाऱ्यांचं   

विरोधक आता राहिले नाही कच्चे

सर्व सरकारी तोंडे बंद केली भाषणाने 

जनतेस आता  चांगला बोध  मिळाला 

बोलेल तो करेल काय?

झोप उडवली गु...गँगची 

उतरादाखल केली टाळा टाळ

 हवा गेलेल्या ५६ इंच छातीने

जेव्हां आली पाळी भाषणाची 

 समजेना बोलू काय?

उकरत बसले थडगी ५० वर्षा पूर्वीची

नव्हता रस जनतेला केले कान बंद

२४० टाळ्या मिळवून, झाले विराजमान 

 खोटे खोटे खुश होऊनि 

कळून चुकले मनोमनी आपले दिवस सम्पले 

खात्री पटली आता काही खैर नाही 

आता अरे ला कारे होत रहाणार 

तेव्हां धूम ठोकली परदेशी 

गेले ज्या देशी, 

त्याचे नावही चुकविले भाषणी

आता धनाजी संताजीच्या रूपाने 

विरोधक दिवसा ढवळ्या दिसू लागले     

सरकार आता भागो  विरोधक आया 

भीतीने पळते झाले. 

अवतरले देवाचे अंश महाराष्ट्री  

गोड गॉड वचने देऊन पुसली पाने

१+२ उप-मंत्र्यांना,माना डोलावत मुखवास 

चघळत राहिले वचने १+२ उपमंत्री . 

१+२ उप मंत्र्यांना वाटली वचने खरी  

 लाडक्या बहीणभावांना 

खिरापत वाटली शब्दांची

करीत आपलेसे पुढील निवडणुकीला.

दिवाळी उलटून जाईल ओवाळणीचे 

ताट मात्र  रिकामे राहील ताई दादांचे 

जनतेचा विश्वास उडाला 

असा हा सावळा गोंधळ

राज्या राज्यातून चालला 

सरड्याचे कुंपण आता लहान झाले 

कळून चुकले बागडण्याचे 

उडण्याचे दिवस सम्पले

जनतेनेच पंख छाटले 

जनतेस चांगला बोध मिळाला.

सावधानतेने टाकूया पाय 

जेणे करून मत फुकट ना जाय.
 

बोलेल तो करेल काय ...


  

 


Tuesday, June 18, 2024

पुन्हा एकदा मोर.

 

पुन्हा एकदा मोर.

आज सकाळी जागआली व खिडकी बाहेर पाहिले आकाश काळ्या ढगांनी आच्छादलेले. पाहून त्या आकाशाकडे , आठवण झाली जुन्या ब्लॉगची. पहा वाचून आजही वाचण्यात किती आनंद आहे तो.





एके दिवशी काय झाले

काळे ढग वेगाने धावत आकाशात एकत्र  जमू लागले
एका पांढऱ्या ढगाने काळ्या ढगास विचारले
“ अरे कारे जमला आहात तुम्ही सारे? ”
तसे काळा म्हणाला “ माहित कसे नाही तुला?
सारे काळे जमले म्हणजे आता मोर नाचणार!
आम्ही सर्व एकमेकावर आपटून ढोल वाजवणार,
आमची मैत्रीण डिस्को बिजली, लाईट चालू करणार,
तुला यायचे आहे का? तर चल... पण आधी काळा हो”
असे म्हणताच पाढरयाने काळयास मिठी मारली व झाला काळा.
निघाला नाच पहायला, ढोल वाजवायला.
पोहोचले सर्व महाला समोरील बागेवर. लागले हळू हळू ढोल वाजवायला,
ऐकून ढोल, मोरांचा थवा लागला थुई थुई नाचायला,पिसारे लागले फुलायला,
डिस्को बिजलीने सुरु केला थय थयाट, आता मोर, ढग,बिजली येऊ लागले रंगात,गडगडाट,कडकडाट, गडगडाट, कडकडाट आवाज वाढू लागले
बगीचा पिसाऱ्यानी कृष्णमय झाला, एवढ्यात...
काळ्याचे ढोल फाटले, आणि पावसाच्या धारा लागल्या,
बिजली पळाली भिजून,थकले मोर नाचून,

धरती मात्र हसू लागली हिरवीगार होऊन.

'बकेट लिस्ट'

 



२८मे २०२४ एक  अविसमरणीय तारीख. 

मला स्वप्नात देखील कल्पना नव्हती कि मी कोविड च्या २ वर्षात घरात बसून रोज काही चित्रे माझ्या आय पॅड वर काढून ती इंस्टाग्राम वर लावत असे त्या चित्रांचे प्रदर्शन भरवेन.

पण अंजलीने मला भरीस पाडून मला ह्या अनुभवासाठी तयार केले. २८ ते ३मे पर्यंत मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट ग्यालरीत आमच्या तिघांचा एक ग्रुप शो आम्ही सादर केला.

आता आम्ही तिघे म्हणजे अंजली, प्रतिमा ( अंजलीची बाल मैत्रीण ) आणि मी. 

माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव.

अंजलीचे हे ४ सोलो शो नंतरचे हे ५वे.

अंजलीचे सर्व काम लाकडात आणि ऍक्रेलीक रंगाने . तिच्या कलाकृती बघण्यासारख्या.

प्रतिमा आम्हा दोघापेक्षा जुनी खिलाडी. तिची ऑइल मधील ऍबस्ट्रॅक्ट आणि ब्लॅक न व्हाईट मधील स्केचेस व सिरॅमिक मधील वस्तू सर्वच मास्टर पिसेस. 

ह्या दोंघांपुढे मी डिजिटल drawings करणारा थोडा वेगळाच. 

२८ तारखेला सकाळीच अंजली प्रतिमा यांनी जहांगीरला जाऊन पूर्ण रचना केली त्यावर उत्तम प्रकाश योजने मुळे सर्वांची पैंटिंग्स खूप उठावदार वाटत होती. एक प्रसन्न वातावरण वाटत होते.

 

एक प्रकारची जाहिरातबाजी करण्याचे पूर्ण काम माझया कडे लागले होते.  समरणशक्तीस ताण देऊन  सर्व मित्र, आप्तेष्ठ, ओळखी पालकीच्याआ सर्वांचे व्हाट्स अँप नंबर मिळवून अगत्याचे बोलावणे केले. माझ्या लिस्ट मध्ये अंदाजे ८० नावे अंजली प्रतिमाची एक ३०/३५ नावे. लोकांना विसरू नये म्हणून आठवडा आधी व reminder करण्या पासून सर्व करून आता ह्या निमित्ताने न भेटलेले मित्र मंडळ भेटेल ह्या आशेत खुश होतो. पण तसे काही घडले नाही.खरी आस्था असणारे ४ मित्र मात्र अगत्याने आले.

पुढील ६ दिवस मात्र आम्हा तिघा शिवाय ओळखीचे असे कोणी फिरकले नाही. मुंबई दर्शन च्या बसेस मात्र दर ३० मिनीटांनी येत होत्या. माझ्या आणि प्रतिमांच्या कलाकृती पेक्षा अंजलीच्या कलाकृती पसंतीस येत होत्या कारण त्यात 

नावीन्य होते. भारतातील अनेक ठिकाणाहुन आलेल्या प्रवाशांनी तिच्या पेंटिंग्स समोर अनेक सेल्फी घेतले. आज तुम्ही मध्य प्रदेश, आंध्र, अशा ठिकाणी कोणाकडे गेलात तर तुम्हाला अंजलीचे पेंटिंग दिसल्याशिवाय रहाणार नाही.

अतिशयोक्ती मुळीच नाही.

६ दिवसात मिळालेले अनुभव गाठीस बांधून आता पुढील वाटचाल.

माझ्या  सारख्या नवोदित कलाकाराला आपली कला स्वतः एका मोठया दालनात पहाण्यात मिळालेले समाधान शब्द वर्णनं करू शकत नाहीत.


आज अंजलीचा आग्रह नसता तर मी ह्या अनुभवाला मुकलो असतो.

तिला मात्र मी हे बोललो नाही कि नकळत तिने माझ्या 'बकेट लिस्ट' वरील एका विश वर टिक केले.

थँक यु  अंजली. 

Tuesday, April 9, 2024

आत्मपरीक्षण.

 

 

आज गुढी पाडवा.

नवे वर्ष. 

 आत्मपरीक्षण.

विषय फारच कठीण. 

स्वतः च्या आत डोकवायचे, 

म्हणजे गुण, दोष.

सत्यात उतरवायचे .

प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. 

स्वतः चे गुण स्वतः सांगयचे म्हणजे बाका प्रसंग

मित्र परिवार जमवलेला आहे त्यावरून

काहीतरी बरे गुण असावेत.

 शत्रू म्हणायला गेलो तर ते हि कठीण.

 ज्यांना मी आवडत नसावा किवां काही कारणांस्तव 

माझ्या वागणुकी मुळे ज्यांना दुखावले ते माझे शत्रू

माझ्यात दुर्गुण बरेच आहेत. 

यादी खूपच मोठी होईल तरी प्रयत्न करतो.

१) स्मित हास्य फार दुर्मिळ.

२) लोकांनी स्वतःहून बोलावे हा हट्ट 

३) माणूस घाणा ( एकाल कोंडा) 

४) तर्कट 

५) अल्प एकाग्रता (चार लोकांमध्ये असताना)  

स्वतःच्याच विचारात मश्गुल

६) चे बऱ्याच विषयांचे अज्ञान. वगैरे  

वगैरे अनेक असावेत ते बायको इतके  

खरे कोणीही सांगू शकणार नाही.


सर्व गुण सम्पन्न असणे म्हणजे संत असणे.



नवं वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.



Thursday, April 4, 2024

एकांत.कोपरा.

 


एकांत. 

एकांतात. मी पहात होतो आकाश पौर्णिमेस

 चालू होता  चंद्राचा तारकां सोबतचा लपंडावाचा खेळ.

उजवीकडे रमने भरलेला ग्लास.

एकी एक दुरकी दोन तिरकी तीन 

करीत होता व्यायाम उजवा हात. 

पहात चंद्राकडे. चंद्राचे चाळे चालूच होते,

नकळत चौकी चार झाले.  हात आता मात्र दमला,

डोळ्यांना आता चन्द्र फुटलेल्या हाफ फ्राय सारखा दिसू लागला,

चांदण्या गायब . चन्द्र आता एकटा. मी एकटा. सोबतीचा

एकांत हि एकटा.

 पाहून निद्रेने पांघरूण सरकवले डोळ्यांवर.   

 कोपरा.

मूठभर आपले हृदय,

म्हणजे हौसिंग सोसायटी.

कितीतरी वेग वेग वेगळ्या हृदयांना 

जागा देते, कोणास १ रूम किचन, 

कोणास २ बेडरूम,काहींना पूर्ण मजलाच,

जसे प्रेम तसे जागा वाटप.

हृदय कोणाचे पण असो

प्रेमाने भरलेले असतेच असते,

द्वेषाने भरलेले हृदय 

फार क्वचित. 


 हृदयात देखील एक गुपित 

 एक राखीव कोपरा, जो केवळ त्या 

हृदयास माहीत.

कोपरा, एक अबोल प्रेमाचा असतो 

अबोल प्रेम फार खास असत 

म्हणूनच त्याला कोपरा मिळतो 

जेथे हृदयच सवांद साधू शकते.

ह्या कोपऱ्यात रहाणाऱ्याला 

एकांताशी मैत्री बरी वाटते 

ह्या मैत्रीस व्याख्या नसते 



 

Tuesday, March 12, 2024

आठवण



आज एक प्रेम कविता 

चक्क वर्तमान पत्रात मिळाली 


इंग्रजी वर्तमान पत्रात, 

आज आपल्या आई वडीलांवर 

लिहिलेल्या लेखात, लेखिकेने

आपल्या वडिलांनी 

आई गेल्यावर केलेली कविता 

ते रोज कसे प्रार्थने सारखे तिच्या फोटो 

जवळ उभे राहून वाचत असत 

ह्याचा उल्लेख केला आहे.

मला ह्या खऱ्या प्रेमाची प्रार्थना 

खुपच स्पर्श करून गेली 

ही प्रेम प्रार्थना मी मराठीत अनुवादित करून सादर करतोय 


"आज तुझी आठवण मी प्रेमाने काढली

पण त्यात काही नावीन्य नव्हते 

मी काल देखील तुझी  आठवण  काढली

आणि त्याच्या आदल्या दिवशी देखील 

शांत चित्ताने देखील मी तुझा विचार करतो 

तुझे नाव देखील घेतो 


माझ्या पाशी केवळ तुझ्या आठवणीच

आणि तुझे छाया चित्र असलेली ही फोटो फ्रेम 

तुझ्या आठवणी केवळ माझ्यासाठी

मी  त्या कधीच दूर करू शकत नाही,

करणार ही नाही, 

परमेश्वरासाठी तू त्याच्या स्वर्गात आहेस 

माझ्यासाठी मात्र तू सदैव 

माझ्या हृदयातच रहाशील. "


 

Tuesday, March 5, 2024

‘Expressions in wood’4





अंजलीचे मनोगत.

"कला विषयी पुस्तके जमविण्याचा माझा आवडता छंद. 

कुठल्याही पुस्तकाच्या दुकांनात शिरले कि माझी पाउले आर्ट सेक्शनकडे आजही अजाणतेपणे वळतात.

माझा ह्या आवडीच्या विषयावर बऱ्यापैकी संग्रह मी केलाय . थोडासा रिकामा वेळ मिळाला कि मला हीपुस्तके चाळण्याचा छंद आहे. पाहिलेल्या पुस्तकांतील आर्टच्या विचारात मन रमविण्यास मला आवडते व आपल्याला यातील काही करता येईल का ह्याचा मनोमनी पाठ पुरावा कसा करता येईल हा आणखी एक छंद.

२००७ साली मी पुण्यास आमच्या रहात्या सोसायटीच्या कामानिमित्त गेले होते परत येताना शिवनेरीच्या बस प्रवासात बाहेरील पावसाळयाने भरलेली झाडे पहात, मी माझ्या art पुस्तकात रमले. त्यात माझ्याकडे असलेल्या पिछवाई आर्ट च्या पुस्तकांची पाने उलटू लागले, एका पानावर थांबले आणि विजेप्रमाणे विचार चमकला “ही art मला लाकडात करता येईल कां? स्वतः च्या विचारात मी पेंटींग देखील करू लागले व दादर थांब्यावर त्याच विचारात आणखी एक वीज चमकली. Taxi पकडली व न कळत बांद्रा न सांगता नेहरू सेंटरला टॅक्सी वळवली.मी कशासाठी हे करत आहे मला समजायच्या आधीच मी नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या क्युरेटर नीना नाडकर्णीच्या समोर बसले व गॅलरीचे बुकिंग करून घरी पोहचले .

अरूणना घरी शिरल्या शिरल्या हे सांगितलं .थोडा वेळ अरुण माझ्या कडे पहात राहिले “विचार काय?” 

“काही नाही सोपा विचार मी येत्या फेब्रुवारीत लाकडाचा* वापर करून पेंटिंग्स करणार व प्रदर्शन भरवणार. 

अरुण:  दॅट्स ग्रेट, चला तयारीला लागा.” 

मी: आज नव्हे आता पासून, शब्द पूर्ण व्हायच्या आधीच मी माझ्या सहकारी  अनंत सुताराला हाक मारून बातमी दिली व तयार रहाण्यास सांगितले. 

त्या रात्री मी पेंटींगसचा  विचार करत, झोपले? नाही, डोळे मिटून जागीच राहिले.

सकाळी उजाडल्या बरोबर मी माझा घरातील खिडकी जवळील जागा studio साठी प्रस्थापीत केली.  

माझा studio म्हणजे ३’x३’ काचेचे गोल टेबल. व त्या बाजूला असलेला १’ रुंदीचा प्ल्याटफॉर्म, ज्यावर रंगसामान पाणी वगैरे वस्तू ठेवण्याची सोय. आपल्या संस्काराप्रमाणे देवाचे नाव घेऊन श्रीनाथजीचे  स्केच करण्यास सुरुवात केली, दुपारपर्यंत स्केच पूर्ण झाले. ह्या कलाकृतीची साईझ पक्की केली ४’x४’, माझे स्केच देखील तेवढेच. ह्या कलाकृतीत श्रीनाथजी च्या दागिन्यांना व अंग वस्त्राना महत्व देऊन पाठी मागे येणाऱ्या पिछ्वाई वर येणारे डिझाईन पक्के केले.

कागदावर करणे फारच सोपे होते पण ते लाकडात उतरावयाचे कसे ह्याचा विचार देखील डोक्यात घोळवत होते.  पहिला दिवस ह्या सर्व डीटेलिंग मध्ये गेला. जागेवरून उठले तेव्हां घड्याळाचे ७ ठोके झाले, दिवेलागणीची वेळ, लगेच मनात वेळा पत्रक तयार, सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत, मध्ये २ सुट्या जेवणाची व चहाची, नैसर्गिक बोलावणे वेगळे.

दुसया दिवशी पहाटे ठरविल्या प्रमाणे वेळापत्रक अमलात. अनंत ९:३० ला येईपर्यंत स्केच निट करून घेतले. अनंत घरात शिरला मात्र लगेच त्याला समोर बसवून पूर्ण चित्र समजावले

नंतर चित्रा प्रमाणे लागणारी लाकडाची जाडी कुठले लाकूड चित्रातील कुठल्या भागासाठी वगैरे. आम्ही सागाचे लाकूड मुख्य भागासाठी, पण ते मुंबईत मिळत नाही मग अनंतच्या गावावरून मागवायचे ठरविले, जेव्हढे लाकूड वापरात येणार तेवढी नवीन रोपे लावण्याची व्यवस्था देखील केली. झाला आमचा कारखाना सुरु. एका मागून एक करत आम्ही १० व्या महिन्यात ३५ पेंटींग वेग वेगळ्या मापाची केली. विषय देखील विविध होते. श्रीनाथजीच्या पेंटींगलामहत्वाची जागा देण्याचे ठरविले, ट्री ऑफ लाईफ (७’ x३’)  एक  प्रदर्शनाचा सेंटर पीस असणार होता. ११ व १२ महीना आम्ही प्याकिंग, किमती, इंव्हीटेशनकार्ड, चीफ गेस्ट ठरविण्यात गेला.

चीफ गेस्ट म्हणून अंबानीच्या नवीन घराचे काम करणाऱ्या आर्किटेक्ट्, श्रीमती दलाल यांना विनंती केली व त्यांनी देखील ती मान्य केली.आता प्रदर्शनाला नाव ‘Expressions in wood’असे सरळ सोपे नाव देण्याचे ठरविले. इंनव्हीटेशन कार्ड डिझाईन छापण्यास दिली, एकेक दिवस जसा जवळ येऊ लागला तशी माझीएक्साइटमेंट  वाढू लागली, पहील्यांदिवशी येणाऱ्या पाहुण्यांची यादी, त्याच्या अल्पोपहाराची व्यवस्था,ऑनलाईन जाहिराती अशां अनेक  बारीक सारीक गोष्टींची व्यवस्था करण्यात प्रदर्शनाचा दिवस येऊन ठेपला, ठरल्याप्रमाणे आदल्या सन्ध्याकाळी टेम्पोत ३५ पेंटींगटाकून गॅलरीत पोहोचलो.  

गॅलरी ची मदत करणारी माणसे तयारच होती, मी अरुण व माझी मैत्रीण प्रतिमा आम्ही तिघांनी प्रत्येक पेंटिंगची जागा ठरवली व त्याप्रमाणे सर्व गॅलरी व्यापली.. अरुण काही 
कामासाठी लवकर निघाले,आमचा एक तरुण हितचिंतक गौतम मात्र अखेर पर्यंत थांबला.

ती रात्र थोडी अस्वस्थच गेली उद्या काय व कसे सर्व होईल ह्या विचाराने. एकदाची सकाळ झाली. गॅलरी १० वाजता उघडली पण प्रदर्शन संध्याकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खुले होणार होते.सकाळची कामे आटपून आम्ही गॅलरीत थडकलो, राहिलेल्या गोष्टी तपासून पुन्हा तयारी झाल्याची खात्री करून घेतली. 

दुसरा दिवस हा माझ्या आयुष्यातील कल्पना करू शकणार नाही इतका भाग्याचा ठरला. त्या दिवशी मी सकाळी १० वाजता गॅलरीत पोहोचले, माझा मित्र राजू आसगावकर (फोटोग्राफर) सांगितल्या प्रमाणे पेंटिंग्स शूट करण्यास हजर होता मी शिरताच त्याने आहेस कुठे?अग तुझी वाट पाहत कोण बसलेय बघ, मी : कोण रे?  अग एस एच राझा!  मी


अरे बापरे कुठे आहेत असे म्हणून मान वळवली आणि जग प्रसिद्ध (बिंदू) कलाकृतीचे चित्रकार एस एच राझा समोर अवतरले मला कसे स्वागत करावे कळेना मी खुर्ची कडे इशारा करून बैठिये असे काहीतरी पुट पुटले. त्यांनी नमस्कारचा स्वीकार स्मित हास्यांने करून प्रदर्शन पाहण्यास सुरवात केली, पाहून झाल्यावर ते खुर्चीवर स्थानापन्न झाले.

त्यांनतर १ तास माझ्याशी माझ्या कलाकृतीवर गप्पा मारल्या हा तास माझ्यासाठी अविसमरणीय. केवळ दैवी आशीर्वाद.

माझ्या सोबत एक फोटो घेऊन माझ्या गेस्ट बुक मध्ये एक सुंदरसा विचार लिहून त्यांनी गमन केले. खोटे वाटेल पण मी स्वत:ला चिमटा काढून मी सत्यात आहे हि खात्री केली.


‘Expressions in wood’4 

आज मी १,२,३, आणि ४ थ्या प्रदर्शनाच्या दालनात माझ्या कलाकृतीकडे समाधानाने बघत आहे व पुढील ७ दिवसात येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची उत्कंठेत वाट पहात आहे".एक वेडा विचार मनात येतोय पुन्हा रझा साहेब येतील का माझी प्रगती बघायला?"


ऐकलंत ना तिचे मनोगत

हे नुसते मनोगत नाही तर त्यापाठी असणारा तिचा निर्धार, ईर्षा, व आपल्या कलेवरील आत्म विश्वास.

एखादे काम हाती घेतले कि ते उत्कृष्ट पणे तडीस नेणे तिचा गुणधर्म.. 

माझया भार्येस माझा प्रेमपूर्वक नमस्कार व शाबासकी, जय हो अंजली.

   


श्री हनुमानजी एक कला कृती








Friday, February 16, 2024

जीवन गौरव


माननीय राज्यपाल,माननीय जमलेले श्रोते गण, आणि सर्व पुरस्कार विजेते.



आज तुमच्या समोर एका नामवंन्त कला तपस्वी श्री.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव उत्त्योच्य पुरस्कार स्वीकारताना मन गहिवरून आलेय.

हा पुरस्कार म्हणजे, माझ्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीचा सन्मान.  माझ्या केलेल्या कामाचा हा गौरव नसून  दृश्य कला व्यवसातील प्रत्येकावर असलेल्या जबाबदारीचे मोजमाप आहे.  दृश्य कला क्षेत्र, जनते मध्ये स्फूर्ती,नावीन्यता, एक नवीन दृष्टी कोन निर्माण करते त्याची  हि एक सुखद शाब्बासकी . 

हा पुरस्काराचा मानकरी मी एकटा नसून असंख्य ग्राहक, ज्यांनी मला आज तुमच्या समोर एक प्रतिनिधी म्हणून उभे केलय, तसेच व्यवसातील माझ्या सर्व अनुभवी वरीष्ठ ज्यांनी पदो पदी मला योग्य मार्ग व माझ्यावर विश्वास दाखविला त्या सर्वांचा यात मोठा वाटा आहे.
आज ह्या व्यवसायात येणाऱ्या सर्व तरुण मंडळींना छोटासा कानमंत्र. 
इतरा पेक्षा वेगळी स्वतःची स्वप्ने पहा. जाहिरात बनवणे हे तुमचे वेड असू द्या. तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक समस्या एक नवी चॅलेंज  आहे असे समजा. थोडक्यात तुमच्या जागेपणी, झोपेत, चालताना बोलताना लिहिताना कामास श्वास समजा. ही अत्यंत महत्वाची कला आहे. जेथे तुमची बुद्धी दिलेल्या चौकटीस नेहमीच्या रटाळ विचाराना तोडून उत्तर शोधावयाचे असते व जनतेस योग्य प्रचार करून आपलेसे करावयाचे असते हि जबाबदारी पेलण्याची तयारी असेल तरच या, केवळ ह्या क्षेत्रात दिसणाऱ्या दिखाव्याला फसू नका.
महत्वाची पण उपयोगी टिप म्हणजे कोठेही असाल तेथील आसमंत समरणशक्तीत भरून  ठेवा, उदाहरणार्थ, समजा तुम्ही कोणाच्या घरी पहिल्याने प्रवेश करत असाल तर त्या घरात शिरताना तुमच्या मेंदूचा कॅमेरा चालू ठेवा प्रत्येक दिसणारी गोष्ट टिपत जा, एव्हढी कि तुम्हाला सोफा, खिडकी पडदा जमीन पंखा है सर्वांची चित्रे नंतर आठवली पाहिजेत. ह्याला 'ऑबसेर्व्हशन',म्हणतात जे तुमच्या कामी कधीही केव्हांही उपयोगी येऊ शकते. ह्या सवयीची जर तुम्हा युवकांना प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही रस्त्यावर, मार्करत मध्ये ट्रेन मध्ये  बस मध्ये दिसणाऱ्या असंख्य चेहऱ्यातील  केवळ दोन चेहरे राती झोपण्यासाठी डोळे बंद करण्यापूर्वी डोळ्या समोर आणा.
जाहिरात क्षेत्रात तुम्हाला रोज नवीन गणित सोडवायचे असते ते तुम्ही किती कल्पना शक्ती वापरून सोडवता ह्यावर तुमचे यश असते. हि शक्ती वाढविण्यासाठी वाचन, लेखन, समरणशक्ती फारच उपयोगी पडते.

असो. भाषण लांबवीत नाही. ज्या कुणाला  "हे काय कोणीही करू शकेल" वाटत असेल त्यांनी ह्या क्षेत्राच्या जवळ पास देखील फिरकू नये.

या यशाचा सारांश म्हणजे अपार मेहनत, इतरां पेक्षा नवीन कल्पनेने आलेले गणित(विक्री वाढविण्याचे ) सोडविणे.

सर्व मान्यवरांचे व समोर असलेल्या प्रेक्षकांचे कान भरल्याबद्दल क्षमस्व.


Friday, February 2, 2024

एक वेडी कल्पना.


एक वेडी कल्पना.  


दीदी ची स्वतःशी गाण्याची अंताक्षरी 


आज रियाझ वेगळया प्रकारे करावा 

असे दीदी ला वाटले

आणि तिने सुरुवात केली

बैठे बैठे क्या करे 

करना है कुछ काम

शुरु करे अंताक्षरी 

लेकर प्रभू का नाम 



दीदी  

द से शुरु ...

...दम भरके मुह फेरे ओह चंदा 

मै उनसे प्यार कर लुंगी

बाते हजार कर लुंगी

ग....

गुम है किसी के प्यार मे

दिल सुबहा  और शाम

पर तुम्हे लीख नही पाऊ मै उस्का नाम 

म...

मन डोले, मेरा तन डोले

मेरे दिल का गया क़रार रे

ये कौन बजाए बाँसुरिया?

या...

याद किया दिल ने 

कहां हो तुम

झुमती बाहार हो कहां हो तुम

प्यार से पुकार लो जहां हो तुम

प्यार से पुकार लो जहां हो तुम

म...

मोहें भूल गाये सावरिया 

मोहे भूल गए साँवरिया, भूल गए साँवरिया 

आवन कह गये, अजहुं न आये 

ली नी न मोरी खबरिया

मोहे भूल गए...

ए...

ऐ  मेरे दिल कही और चल 

गम की दुनिया से दिल भर गया 

ढुंढ ले अब  कोई घर नया

या...  

अंताक्षरीला सकाळी सुरुवात झाली 

ती दीदी ने दुपारच्या भीमपलासी रागा ने

सांगता केली 

आ निले गगन के तले ...

कल्पना करा दीदीने  

अंताक्षरी चालू ठेवली असती तर ...



Thursday, January 25, 2024

झाले बहु होतील बहु ...

 

झाले बहू... ही ब्लॉगमाला माझ्या १५ वया पासून २१ वया पर्यंत लागलेल्या व्यसनांतील मोजके बॉलीवूड हिरो, हेरॉईनस, म्युझिक डायरेक्टर, प्ले बॅक सिंगर्स, डायरेक्टर्स, ज्यांनी मला त्यांच्या विविध कलागुणाने आकर्षित केले व आनंद दिला त्यांना समर्पित,

ऐ मेरे वतन के लोगो
कुछ याद उन्हे भी करलो 


झाले बहु होतील बहु ... या पलीकडे माझ्या कडे शब्द नाहीत.




Monday, January 15, 2024

माकड चेष्टा

 माकड चेष्टा


दोन बोके. नाव त्यांची सोम्या गोम्या 

एक न्यायाधीश माकड.  नाव त्याचे चेष्टा

झाले बोक्यांचे भांडण कारण काय तर वाघाचा खरा नातेवाईक कोण?

न्यायासाठी गेले माकड " चेष्टा" कडे माकडांनी ४ दिवसाचा वेळ मागितला 

४ दिवसांनी माकडाने आणखी ४ दिवस मागितले नावा प्रमाणे चेष्टा करत  त्याने १ वर्ष ६ महिने काढले 

शेवटीं वनराजाने त्यास दिली तंबी  व न्यायाचा दिवस ठरविला.ते  समजल्यावर लबाड सोम्यानें गोम्याच्या नकळत  माकडास घरी बोलावले पंच पक्वाने जेऊ घातली वर  दक्षिणा म्हणून दिल्लीची सहल घडवली माकड खुश  ढेकर देत घरी गेला.ह्या दीड वर्षात माकडाने दोन्ही बोक्यांना ८ पिढयांच्या वंशावळीचापुरावा देण्यास सांगितला.

निकालाचा दिवस उजाडला आतुरतेने दोघे बोके माकडासमोर हजर झाले,माकडाने दोघांनी दिलेल्या वंशावळीचे वाचन सुरु केले. गोम्याची माहिती वाचताना काही माहिती न दिल्याचे सांगितले यावर गोम्याची येणारी प्रतिक्रिये कडे दुर्लक्ष करून 

सोम्याच्या बाजूनें  निर्णय देऊन टाकला व जाहीर केले, सोम्याच वाघाचा वंशज आहे. व त्यालाच वाघाचे पट्टे मिळाले आहेत.

बिचारा गोम्या हिरमुसला होऊन परतला येताना काळोखात त्याच्या हातात सोम्यानें गर्वाने चेष्टा करीत  एक मशाल देत म्हणाला आता ह्याच्या उजेडाची सवय करून घे हि जर विझली तर तुझे अस्तित्वच नाहीसे होईल.

गोम्याने मशालीच्या उजेडात प्रस्थान केले वाटेत वनराजाला कडून. न्याय मिळवायचाच ह्यचा निश्चय केला .गोम्या गेलेला पाहून सोम्याने न्यायमूर्ती माकडास टाळी दिली दोघे हसत हसत आप आपल्या वाटेस लागले.

बिचारा गोम्या आता वनराजाच्या बोलवण्याची वाट पहातोय. सोम्याने मात्र आपल्या खुर्ची मागे एक वाघाचे मोठे तैल चित्र लावले.

ह्यालाच माकड चेष्टा म्हणतात.


 

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...