Friday, July 19, 2024

अब कि बार ४०० पार

 


झाल्या निवडणूका 

सुटला होता वारा भाजपा चा 

अब कि बार ४०० पार 

होता हा नारा!

शहाण्यां जनता जनार्दनांनी

बदलली दिशा वाऱ्याची,

रडत खडत २४० मिळवले भाजपाने 

 मात्र सत्तेसाठी कमी पडले 

लंगडत रडत कुबड्या शोधल्या,                                                             

स्वार्थी आले पुढे दोन, सरकार पुढे शर्ती  ठेऊन,

केले सरकार त्यांनी चालू 

स्वार्थी निर्लज्ज बोके पुन्हा एकदा 

गादीवर बसले,

राष्ट्र्पतींनी, दिलेले भाषण वाचले,

राष्ट्रपतींच्या भाषणास खणखणीत

प्रत्युतर दिले विरोधक म्होरक्याने 

धाबे दणाणून सोडले सत्ताधाऱ्यांचं   

विरोधक आता राहिले नाही कच्चे

सर्व सरकारी तोंडे बंद केली भाषणाने 

जनतेस आता  चांगला बोध  मिळाला 

बोलेल तो करेल काय?

झोप उडवली गु...गँगची 

उतरादाखल केली टाळा टाळ

 हवा गेलेल्या ५६ इंच छातीने

जेव्हां आली पाळी भाषणाची 

 समजेना बोलू काय?

उकरत बसले थडगी ५० वर्षा पूर्वीची

नव्हता रस जनतेला केले कान बंद

२४० टाळ्या मिळवून, झाले विराजमान 

 खोटे खोटे खुश होऊनि 

कळून चुकले मनोमनी आपले दिवस सम्पले 

खात्री पटली आता काही खैर नाही 

आता अरे ला कारे होत रहाणार 

तेव्हां धूम ठोकली परदेशी 

गेले ज्या देशी, 

त्याचे नावही चुकविले भाषणी

आता धनाजी संताजीच्या रूपाने 

विरोधक दिवसा ढवळ्या दिसू लागले     

सरकार आता भागो  विरोधक आया 

भीतीने पळते झाले. 

अवतरले देवाचे अंश महाराष्ट्री  

गोड गॉड वचने देऊन पुसली पाने

१+२ उप-मंत्र्यांना,माना डोलावत मुखवास 

चघळत राहिले वचने १+२ उपमंत्री . 

१+२ उप मंत्र्यांना वाटली वचने खरी  

 लाडक्या बहीणभावांना 

खिरापत वाटली शब्दांची

करीत आपलेसे पुढील निवडणुकीला.

दिवाळी उलटून जाईल ओवाळणीचे 

ताट मात्र  रिकामे राहील ताई दादांचे 

जनतेचा विश्वास उडाला 

असा हा सावळा गोंधळ

राज्या राज्यातून चालला 

सरड्याचे कुंपण आता लहान झाले 

कळून चुकले बागडण्याचे 

उडण्याचे दिवस सम्पले

जनतेनेच पंख छाटले 

जनतेस चांगला बोध मिळाला.

सावधानतेने टाकूया पाय 

जेणे करून मत फुकट ना जाय.
 

बोलेल तो करेल काय ...


  

 


Tuesday, June 18, 2024

पुन्हा एकदा मोर.

 

पुन्हा एकदा मोर.

आज सकाळी जागआली व खिडकी बाहेर पाहिले आकाश काळ्या ढगांनी आच्छादलेले. पाहून त्या आकाशाकडे , आठवण झाली जुन्या ब्लॉगची. पहा वाचून आजही वाचण्यात किती आनंद आहे तो.





एके दिवशी काय झाले

काळे ढग वेगाने धावत आकाशात एकत्र  जमू लागले
एका पांढऱ्या ढगाने काळ्या ढगास विचारले
“ अरे कारे जमला आहात तुम्ही सारे? ”
तसे काळा म्हणाला “ माहित कसे नाही तुला?
सारे काळे जमले म्हणजे आता मोर नाचणार!
आम्ही सर्व एकमेकावर आपटून ढोल वाजवणार,
आमची मैत्रीण डिस्को बिजली, लाईट चालू करणार,
तुला यायचे आहे का? तर चल... पण आधी काळा हो”
असे म्हणताच पाढरयाने काळयास मिठी मारली व झाला काळा.
निघाला नाच पहायला, ढोल वाजवायला.
पोहोचले सर्व महाला समोरील बागेवर. लागले हळू हळू ढोल वाजवायला,
ऐकून ढोल, मोरांचा थवा लागला थुई थुई नाचायला,पिसारे लागले फुलायला,
डिस्को बिजलीने सुरु केला थय थयाट, आता मोर, ढग,बिजली येऊ लागले रंगात,गडगडाट,कडकडाट, गडगडाट, कडकडाट आवाज वाढू लागले
बगीचा पिसाऱ्यानी कृष्णमय झाला, एवढ्यात...
काळ्याचे ढोल फाटले, आणि पावसाच्या धारा लागल्या,
बिजली पळाली भिजून,थकले मोर नाचून,

धरती मात्र हसू लागली हिरवीगार होऊन.

'बकेट लिस्ट'

 



२८मे २०२४ एक  अविसमरणीय तारीख. 

मला स्वप्नात देखील कल्पना नव्हती कि मी कोविड च्या २ वर्षात घरात बसून रोज काही चित्रे माझ्या आय पॅड वर काढून ती इंस्टाग्राम वर लावत असे त्या चित्रांचे प्रदर्शन भरवेन.

पण अंजलीने मला भरीस पाडून मला ह्या अनुभवासाठी तयार केले. २८ ते ३मे पर्यंत मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट ग्यालरीत आमच्या तिघांचा एक ग्रुप शो आम्ही सादर केला.

आता आम्ही तिघे म्हणजे अंजली, प्रतिमा ( अंजलीची बाल मैत्रीण ) आणि मी. 

माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव.

अंजलीचे हे ४ सोलो शो नंतरचे हे ५वे.

अंजलीचे सर्व काम लाकडात आणि ऍक्रेलीक रंगाने . तिच्या कलाकृती बघण्यासारख्या.

प्रतिमा आम्हा दोघापेक्षा जुनी खिलाडी. तिची ऑइल मधील ऍबस्ट्रॅक्ट आणि ब्लॅक न व्हाईट मधील स्केचेस व सिरॅमिक मधील वस्तू सर्वच मास्टर पिसेस. 

ह्या दोंघांपुढे मी डिजिटल drawings करणारा थोडा वेगळाच. 

२८ तारखेला सकाळीच अंजली प्रतिमा यांनी जहांगीरला जाऊन पूर्ण रचना केली त्यावर उत्तम प्रकाश योजने मुळे सर्वांची पैंटिंग्स खूप उठावदार वाटत होती. एक प्रसन्न वातावरण वाटत होते.

 

एक प्रकारची जाहिरातबाजी करण्याचे पूर्ण काम माझया कडे लागले होते.  समरणशक्तीस ताण देऊन  सर्व मित्र, आप्तेष्ठ, ओळखी पालकीच्याआ सर्वांचे व्हाट्स अँप नंबर मिळवून अगत्याचे बोलावणे केले. माझ्या लिस्ट मध्ये अंदाजे ८० नावे अंजली प्रतिमाची एक ३०/३५ नावे. लोकांना विसरू नये म्हणून आठवडा आधी व reminder करण्या पासून सर्व करून आता ह्या निमित्ताने न भेटलेले मित्र मंडळ भेटेल ह्या आशेत खुश होतो. पण तसे काही घडले नाही.खरी आस्था असणारे ४ मित्र मात्र अगत्याने आले.

पुढील ६ दिवस मात्र आम्हा तिघा शिवाय ओळखीचे असे कोणी फिरकले नाही. मुंबई दर्शन च्या बसेस मात्र दर ३० मिनीटांनी येत होत्या. माझ्या आणि प्रतिमांच्या कलाकृती पेक्षा अंजलीच्या कलाकृती पसंतीस येत होत्या कारण त्यात 

नावीन्य होते. भारतातील अनेक ठिकाणाहुन आलेल्या प्रवाशांनी तिच्या पेंटिंग्स समोर अनेक सेल्फी घेतले. आज तुम्ही मध्य प्रदेश, आंध्र, अशा ठिकाणी कोणाकडे गेलात तर तुम्हाला अंजलीचे पेंटिंग दिसल्याशिवाय रहाणार नाही.

अतिशयोक्ती मुळीच नाही.

६ दिवसात मिळालेले अनुभव गाठीस बांधून आता पुढील वाटचाल.

माझ्या  सारख्या नवोदित कलाकाराला आपली कला स्वतः एका मोठया दालनात पहाण्यात मिळालेले समाधान शब्द वर्णनं करू शकत नाहीत.


आज अंजलीचा आग्रह नसता तर मी ह्या अनुभवाला मुकलो असतो.

तिला मात्र मी हे बोललो नाही कि नकळत तिने माझ्या 'बकेट लिस्ट' वरील एका विश वर टिक केले.

थँक यु  अंजली. 

Tuesday, April 9, 2024

आत्मपरीक्षण.

 

 

आज गुढी पाडवा.

नवे वर्ष. 

 आत्मपरीक्षण.

विषय फारच कठीण. 

स्वतः च्या आत डोकवायचे, 

म्हणजे गुण, दोष.

सत्यात उतरवायचे .

प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. 

स्वतः चे गुण स्वतः सांगयचे म्हणजे बाका प्रसंग

मित्र परिवार जमवलेला आहे त्यावरून

काहीतरी बरे गुण असावेत.

 शत्रू म्हणायला गेलो तर ते हि कठीण.

 ज्यांना मी आवडत नसावा किवां काही कारणांस्तव 

माझ्या वागणुकी मुळे ज्यांना दुखावले ते माझे शत्रू

माझ्यात दुर्गुण बरेच आहेत. 

यादी खूपच मोठी होईल तरी प्रयत्न करतो.

१) स्मित हास्य फार दुर्मिळ.

२) लोकांनी स्वतःहून बोलावे हा हट्ट 

३) माणूस घाणा ( एकाल कोंडा) 

४) तर्कट 

५) अल्प एकाग्रता (चार लोकांमध्ये असताना)  

स्वतःच्याच विचारात मश्गुल

६) चे बऱ्याच विषयांचे अज्ञान. वगैरे  

वगैरे अनेक असावेत ते बायको इतके  

खरे कोणीही सांगू शकणार नाही.


सर्व गुण सम्पन्न असणे म्हणजे संत असणे.



नवं वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.



Thursday, April 4, 2024

एकांत.कोपरा.

 


एकांत. 

एकांतात. मी पहात होतो आकाश पौर्णिमेस

 चालू होता  चंद्राचा तारकां सोबतचा लपंडावाचा खेळ.

उजवीकडे रमने भरलेला ग्लास.

एकी एक दुरकी दोन तिरकी तीन 

करीत होता व्यायाम उजवा हात. 

पहात चंद्राकडे. चंद्राचे चाळे चालूच होते,

नकळत चौकी चार झाले.  हात आता मात्र दमला,

डोळ्यांना आता चन्द्र फुटलेल्या हाफ फ्राय सारखा दिसू लागला,

चांदण्या गायब . चन्द्र आता एकटा. मी एकटा. सोबतीचा

एकांत हि एकटा.

 पाहून निद्रेने पांघरूण सरकवले डोळ्यांवर.   

 कोपरा.

मूठभर आपले हृदय,

म्हणजे हौसिंग सोसायटी.

कितीतरी वेग वेग वेगळ्या हृदयांना 

जागा देते, कोणास १ रूम किचन, 

कोणास २ बेडरूम,काहींना पूर्ण मजलाच,

जसे प्रेम तसे जागा वाटप.

हृदय कोणाचे पण असो

प्रेमाने भरलेले असतेच असते,

द्वेषाने भरलेले हृदय 

फार क्वचित. 


 हृदयात देखील एक गुपित 

 एक राखीव कोपरा, जो केवळ त्या 

हृदयास माहीत.

कोपरा, एक अबोल प्रेमाचा असतो 

अबोल प्रेम फार खास असत 

म्हणूनच त्याला कोपरा मिळतो 

जेथे हृदयच सवांद साधू शकते.

ह्या कोपऱ्यात रहाणाऱ्याला 

एकांताशी मैत्री बरी वाटते 

ह्या मैत्रीस व्याख्या नसते 



 

Tuesday, March 12, 2024

आठवण



आज एक प्रेम कविता 

चक्क वर्तमान पत्रात मिळाली 


इंग्रजी वर्तमान पत्रात, 

आज आपल्या आई वडीलांवर 

लिहिलेल्या लेखात, लेखिकेने

आपल्या वडिलांनी 

आई गेल्यावर केलेली कविता 

ते रोज कसे प्रार्थने सारखे तिच्या फोटो 

जवळ उभे राहून वाचत असत 

ह्याचा उल्लेख केला आहे.

मला ह्या खऱ्या प्रेमाची प्रार्थना 

खुपच स्पर्श करून गेली 

ही प्रेम प्रार्थना मी मराठीत अनुवादित करून सादर करतोय 


"आज तुझी आठवण मी प्रेमाने काढली

पण त्यात काही नावीन्य नव्हते 

मी काल देखील तुझी  आठवण  काढली

आणि त्याच्या आदल्या दिवशी देखील 

शांत चित्ताने देखील मी तुझा विचार करतो 

तुझे नाव देखील घेतो 


माझ्या पाशी केवळ तुझ्या आठवणीच

आणि तुझे छाया चित्र असलेली ही फोटो फ्रेम 

तुझ्या आठवणी केवळ माझ्यासाठी

मी  त्या कधीच दूर करू शकत नाही,

करणार ही नाही, 

परमेश्वरासाठी तू त्याच्या स्वर्गात आहेस 

माझ्यासाठी मात्र तू सदैव 

माझ्या हृदयातच रहाशील. "


 

Tuesday, March 5, 2024

‘Expressions in wood’4





अंजलीचे मनोगत.

"कला विषयी पुस्तके जमविण्याचा माझा आवडता छंद. 

कुठल्याही पुस्तकाच्या दुकांनात शिरले कि माझी पाउले आर्ट सेक्शनकडे आजही अजाणतेपणे वळतात.

माझा ह्या आवडीच्या विषयावर बऱ्यापैकी संग्रह मी केलाय . थोडासा रिकामा वेळ मिळाला कि मला हीपुस्तके चाळण्याचा छंद आहे. पाहिलेल्या पुस्तकांतील आर्टच्या विचारात मन रमविण्यास मला आवडते व आपल्याला यातील काही करता येईल का ह्याचा मनोमनी पाठ पुरावा कसा करता येईल हा आणखी एक छंद.

२००७ साली मी पुण्यास आमच्या रहात्या सोसायटीच्या कामानिमित्त गेले होते परत येताना शिवनेरीच्या बस प्रवासात बाहेरील पावसाळयाने भरलेली झाडे पहात, मी माझ्या art पुस्तकात रमले. त्यात माझ्याकडे असलेल्या पिछवाई आर्ट च्या पुस्तकांची पाने उलटू लागले, एका पानावर थांबले आणि विजेप्रमाणे विचार चमकला “ही art मला लाकडात करता येईल कां? स्वतः च्या विचारात मी पेंटींग देखील करू लागले व दादर थांब्यावर त्याच विचारात आणखी एक वीज चमकली. Taxi पकडली व न कळत बांद्रा न सांगता नेहरू सेंटरला टॅक्सी वळवली.मी कशासाठी हे करत आहे मला समजायच्या आधीच मी नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या क्युरेटर नीना नाडकर्णीच्या समोर बसले व गॅलरीचे बुकिंग करून घरी पोहचले .

अरूणना घरी शिरल्या शिरल्या हे सांगितलं .थोडा वेळ अरुण माझ्या कडे पहात राहिले “विचार काय?” 

“काही नाही सोपा विचार मी येत्या फेब्रुवारीत लाकडाचा* वापर करून पेंटिंग्स करणार व प्रदर्शन भरवणार. 

अरुण:  दॅट्स ग्रेट, चला तयारीला लागा.” 

मी: आज नव्हे आता पासून, शब्द पूर्ण व्हायच्या आधीच मी माझ्या सहकारी  अनंत सुताराला हाक मारून बातमी दिली व तयार रहाण्यास सांगितले. 

त्या रात्री मी पेंटींगसचा  विचार करत, झोपले? नाही, डोळे मिटून जागीच राहिले.

सकाळी उजाडल्या बरोबर मी माझा घरातील खिडकी जवळील जागा studio साठी प्रस्थापीत केली.  

माझा studio म्हणजे ३’x३’ काचेचे गोल टेबल. व त्या बाजूला असलेला १’ रुंदीचा प्ल्याटफॉर्म, ज्यावर रंगसामान पाणी वगैरे वस्तू ठेवण्याची सोय. आपल्या संस्काराप्रमाणे देवाचे नाव घेऊन श्रीनाथजीचे  स्केच करण्यास सुरुवात केली, दुपारपर्यंत स्केच पूर्ण झाले. ह्या कलाकृतीची साईझ पक्की केली ४’x४’, माझे स्केच देखील तेवढेच. ह्या कलाकृतीत श्रीनाथजी च्या दागिन्यांना व अंग वस्त्राना महत्व देऊन पाठी मागे येणाऱ्या पिछ्वाई वर येणारे डिझाईन पक्के केले.

कागदावर करणे फारच सोपे होते पण ते लाकडात उतरावयाचे कसे ह्याचा विचार देखील डोक्यात घोळवत होते.  पहिला दिवस ह्या सर्व डीटेलिंग मध्ये गेला. जागेवरून उठले तेव्हां घड्याळाचे ७ ठोके झाले, दिवेलागणीची वेळ, लगेच मनात वेळा पत्रक तयार, सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत, मध्ये २ सुट्या जेवणाची व चहाची, नैसर्गिक बोलावणे वेगळे.

दुसया दिवशी पहाटे ठरविल्या प्रमाणे वेळापत्रक अमलात. अनंत ९:३० ला येईपर्यंत स्केच निट करून घेतले. अनंत घरात शिरला मात्र लगेच त्याला समोर बसवून पूर्ण चित्र समजावले

नंतर चित्रा प्रमाणे लागणारी लाकडाची जाडी कुठले लाकूड चित्रातील कुठल्या भागासाठी वगैरे. आम्ही सागाचे लाकूड मुख्य भागासाठी, पण ते मुंबईत मिळत नाही मग अनंतच्या गावावरून मागवायचे ठरविले, जेव्हढे लाकूड वापरात येणार तेवढी नवीन रोपे लावण्याची व्यवस्था देखील केली. झाला आमचा कारखाना सुरु. एका मागून एक करत आम्ही १० व्या महिन्यात ३५ पेंटींग वेग वेगळ्या मापाची केली. विषय देखील विविध होते. श्रीनाथजीच्या पेंटींगलामहत्वाची जागा देण्याचे ठरविले, ट्री ऑफ लाईफ (७’ x३’)  एक  प्रदर्शनाचा सेंटर पीस असणार होता. ११ व १२ महीना आम्ही प्याकिंग, किमती, इंव्हीटेशनकार्ड, चीफ गेस्ट ठरविण्यात गेला.

चीफ गेस्ट म्हणून अंबानीच्या नवीन घराचे काम करणाऱ्या आर्किटेक्ट्, श्रीमती दलाल यांना विनंती केली व त्यांनी देखील ती मान्य केली.आता प्रदर्शनाला नाव ‘Expressions in wood’असे सरळ सोपे नाव देण्याचे ठरविले. इंनव्हीटेशन कार्ड डिझाईन छापण्यास दिली, एकेक दिवस जसा जवळ येऊ लागला तशी माझीएक्साइटमेंट  वाढू लागली, पहील्यांदिवशी येणाऱ्या पाहुण्यांची यादी, त्याच्या अल्पोपहाराची व्यवस्था,ऑनलाईन जाहिराती अशां अनेक  बारीक सारीक गोष्टींची व्यवस्था करण्यात प्रदर्शनाचा दिवस येऊन ठेपला, ठरल्याप्रमाणे आदल्या सन्ध्याकाळी टेम्पोत ३५ पेंटींगटाकून गॅलरीत पोहोचलो.  

गॅलरी ची मदत करणारी माणसे तयारच होती, मी अरुण व माझी मैत्रीण प्रतिमा आम्ही तिघांनी प्रत्येक पेंटिंगची जागा ठरवली व त्याप्रमाणे सर्व गॅलरी व्यापली.. अरुण काही 
कामासाठी लवकर निघाले,आमचा एक तरुण हितचिंतक गौतम मात्र अखेर पर्यंत थांबला.

ती रात्र थोडी अस्वस्थच गेली उद्या काय व कसे सर्व होईल ह्या विचाराने. एकदाची सकाळ झाली. गॅलरी १० वाजता उघडली पण प्रदर्शन संध्याकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खुले होणार होते.सकाळची कामे आटपून आम्ही गॅलरीत थडकलो, राहिलेल्या गोष्टी तपासून पुन्हा तयारी झाल्याची खात्री करून घेतली. 

दुसरा दिवस हा माझ्या आयुष्यातील कल्पना करू शकणार नाही इतका भाग्याचा ठरला. त्या दिवशी मी सकाळी १० वाजता गॅलरीत पोहोचले, माझा मित्र राजू आसगावकर (फोटोग्राफर) सांगितल्या प्रमाणे पेंटिंग्स शूट करण्यास हजर होता मी शिरताच त्याने आहेस कुठे?अग तुझी वाट पाहत कोण बसलेय बघ, मी : कोण रे?  अग एस एच राझा!  मी


अरे बापरे कुठे आहेत असे म्हणून मान वळवली आणि जग प्रसिद्ध (बिंदू) कलाकृतीचे चित्रकार एस एच राझा समोर अवतरले मला कसे स्वागत करावे कळेना मी खुर्ची कडे इशारा करून बैठिये असे काहीतरी पुट पुटले. त्यांनी नमस्कारचा स्वीकार स्मित हास्यांने करून प्रदर्शन पाहण्यास सुरवात केली, पाहून झाल्यावर ते खुर्चीवर स्थानापन्न झाले.

त्यांनतर १ तास माझ्याशी माझ्या कलाकृतीवर गप्पा मारल्या हा तास माझ्यासाठी अविसमरणीय. केवळ दैवी आशीर्वाद.

माझ्या सोबत एक फोटो घेऊन माझ्या गेस्ट बुक मध्ये एक सुंदरसा विचार लिहून त्यांनी गमन केले. खोटे वाटेल पण मी स्वत:ला चिमटा काढून मी सत्यात आहे हि खात्री केली.


‘Expressions in wood’4 

आज मी १,२,३, आणि ४ थ्या प्रदर्शनाच्या दालनात माझ्या कलाकृतीकडे समाधानाने बघत आहे व पुढील ७ दिवसात येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची उत्कंठेत वाट पहात आहे".एक वेडा विचार मनात येतोय पुन्हा रझा साहेब येतील का माझी प्रगती बघायला?"


ऐकलंत ना तिचे मनोगत

हे नुसते मनोगत नाही तर त्यापाठी असणारा तिचा निर्धार, ईर्षा, व आपल्या कलेवरील आत्म विश्वास.

एखादे काम हाती घेतले कि ते उत्कृष्ट पणे तडीस नेणे तिचा गुणधर्म.. 

माझया भार्येस माझा प्रेमपूर्वक नमस्कार व शाबासकी, जय हो अंजली.

   


श्री हनुमानजी एक कला कृती








खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...