Tuesday, June 16, 2026

पाणी शोधताना..

पाणी शोधताना...
एकदा एका चिमणीला तहान लागली.
ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती फडफडत खिडकीतून आत आली आणि त्या काचेच्या भांड्याच्या कडेवर जाऊन बसली.
आत डोकावून पाहते तो काय! तिला एक गोल्डफिश दिसला.अचानक आलेल्या त्या पाहुण्याकडे माशानेही आश्चर्याने पाहिले.
काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले.चिमणी गोंधळली.गोल्डफिशही चकित झाला.
खरे तर त्या गोल्डफिशलाही अधूनमधून या छोट्याशा काचेच्या समुद्राच्या बाहेरचे जग पाहायची उत्सुकता असे. निळे आकाश, पांढरे ढग, झाडांच्या फांद्या आणि त्यावर बसलेले पक्षी, हे सारे तो रोज काचेआडून पाहत असे आणि मनोमन त्यांचे स्वप्न रंगवत असे.
चिमणीनेच अखेर शांतता भंग केली.
"माफ करा," ती म्हणाली, "मी फक्त पाणी पाहून आत आले."
मासा हसला.
"आणि मी," तो म्हणाला, "या छोट्याशा समुद्रात आणि माझ्या एकांतात अगदी सुखी होतो. तुमच्या येण्याने माझा एकांत भंगला."
दरम्यान चिमणीच्या लक्षात आले की पाण्याची पातळी खूप खाली आहे. तिला तिची तहान भागवता येणार नव्हती.
माशालाही त्याचा एकांत परत मिळणार नव्हता.
दोघांचेही मनसुबे अपूर्ण राहिले.

आपलेही काहीसे असेच असते.
जीवनात फार थोड्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडतात.
गमतीची गोष्ट म्हणजे आपण मात्र आयुष्याने आपल्या मनातील पटकथेनुसारच वागावे अशी अपेक्षा करत राहतो.
चिमणीला पाणी हवे होते. माशाला एकांत.दोघांनाही हवे ते मिळाले नाही.

पण त्यांची भेट झाली.

अशा भेटी, अशा घटना, असे प्रसंग अनेकदा अनपेक्षित वाटतात. पण मागे वळून पाहताना 
जाणवते की त्या जणू पूर्वनियोजितच होत्या.
जर चिमणी थोडी शहाणी असेल तर ती हरवलेल्या पाण्याची तक्रार करत बसणार नाही. 
ती माशाकडून पाण्याखालच्या जगाच्या गोष्टी ऐकेल.
आणि मासा जर शहाणा असेल तर तो आलेल्या पाहुण्याला घाबरणार नाही. तो चिमणीकडून आकाशाच्या गोष्टी ऐकेल.
दोघेही तिथून थोडे अधिक समृद्ध होऊन निघतील.

आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडत असतात. काही माणसे अचानक भेटतात.
काही घटना अनपेक्षितपणे घडतात.

काही दारे नकळत उघडतात.
त्या क्षणी त्यांचा अर्थ कळत नाही. पण नंतर लक्षात येते की त्या प्रत्येक भेटीत, प्रत्येक प्रसंगात एखादा धडा दडलेला होता.
आपण एका गोष्टीची अपेक्षा करतो; आयुष्य मात्र दुसरेच काही समोर ठेवते. कदाचित त्यालाच जीवन म्हणत असावेत.
कारण कितीही प्रयत्न केला तरी काही पूर्वनियोजित गोष्टी आपण टाळू शकत नाही.त्या आपल्या आयुष्यात येतातच.
कधी चिमणी बनून.
कधी गोल्डफिश बनून.
आयुष्याच्या अनपेक्षित वळणांसाठी नेहमी तयार राहा



Sunday, June 14, 2026

मी एक फाईल...?


मी एक फाईल...?

माझ्या आयुष्यातील एक मोठा शोध नुकताच लागला.

मी माणूस नसून एक फाईल आहे.हा शोध अचानक लागलेला नाही. अनेक वर्षांच्या सरकारी, निमसरकारी, खासगी, वैद्यकीय, बँकिंग आणि सामाजिक अनुभवातून तो हळूहळू समोर आला.

जन्मल्याबरोबर माझी पहिली फाईल उघडली गेली असावी. जन्मदाखला, लसीकरण कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट...

एक फाईल संपत नाही तोवर दुसरी.कधीकधी वाटते, आयुष्य कमी आणि कागदपत्रे जास्त. शाळेत प्रवेशासाठी फाईल.

कॉलेजसाठी फाईल. नोकरीसाठी फाईल.बँकेसाठी फाईल. घरासाठी फाईल.विमा, गुंतवणूक, इस्पितळ, प्रवास, सोसायटी, कर, वीज, गॅस...

जिकडे तिकडे फाईल. पूर्वी माणसे भेटली की "काय म्हणताय?" असे विचारायची. आता "कागद दिलेत का?" हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो.एखाद्या कार्यालयात गेल्यावर तर आपल्या अस्तित्वापेक्षा फाईलचे अस्तित्व महत्त्वाचे वाटू लागते.

"तुम्ही कोण?" या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे नसते. "फाईल नंबर काय?"

हा खरा प्रश्न असतो.

माझ्या लक्षात आले आहे की आपल्या देशात माणूस हरवला तर शोधायला वेळ लागेल; पण फाईल हरवली तर तातडीची बैठक बोलावली जाईल.

फाईल सापडली की काम सुरू. फाईल अडकली की आयुष्य अडकले. फाईल वर गेली की आशा वाढली.

फाईल खाली आली की पुन्हा नव्याने सुरुवात. 

कधी कधी मला वाटते, आपल्या आयुष्याचा एक गुप्त चरित्रकार असतो. तो म्हणजे फाईल.

आपण काय शिकलो, कुठे राहिलो, कुठे गेलो, किती कमावले, कोणत्या रुग्णालयात दाखल झालो,सगळे तिच्याकडे नोंदलेले असते.फक्त एकच गोष्ट कोणत्याही फाईलमध्ये सापडत नाही.

आपण किती हसलो. किती मित्र जोडले- पहिल्या प्रेमाची धडधड, मुलांच्या यशाचा आनंद, एखाद्या अपयशातून मिळालेली शिकवण, मनाजोगते पुस्तक वाचून झाल्यावर मनात रेंगाळणारी शांतता, किंवा बराच काळानंतर भेटलेल्या जिवाभावाच्या माणसाबरोबर घालवलेला एक तास... यापैकी कशाचीच नोंद कुठल्याच फाईलमध्ये नसते. आणि तरीही आयुष्याचा खरा हिशेब बहुतेक याच गोष्टींमध्ये किती वेळा मनापासून आनंद घेतला. किती लोकांच्या आठवणीत राहिलो.

ते जगले गेले पाहिजे.


अरुण काळे

जून २०२६

Thursday, June 11, 2026

सूर्याकडे पाहण्याची कला.

 


जीवनाकडे पाहण्याचे दोन मार्ग असतात.

एक म्हणजे जे नाही त्याचा विचार करत राहणे.

आणि दुसरा म्हणजे जे आहे त्यातील सौंदर्य शोधत राहणे.

पहिला मार्ग सहज सापडतो. कारण अपूर्णता नेहमी डोळ्यासमोर उभी असते. राहून गेलेल्या गोष्टी, अपुरी पडलेली स्वप्ने, अपेक्षेप्रमाणे न घडलेले प्रसंग, न मिळालेल्या संधी, यांची यादी फार मोठी असते.

पण दुसरा मार्ग जाणीवपूर्वक निवडावा लागतो. तो म्हणजे जीवनाने दिलेल्या छोट्या छोट्या आनंदांची दखल घेण्याचा मार्ग.

सकाळचा पहिला किरण. पुस्तकातील एखादे मनाला भिडणारे वाक्य.

खिडकीबाहेर दिसलेले आकाश. किंवा कोणत्याही कारणाशिवाय मनात उमटलेले एक हसू.

आनंद अनेकदा मोठ्या घटनांमध्ये नसतो. तो अशा क्षणांमध्ये लपलेला असतो.

वयानुसार ही गोष्ट अधिक स्पष्ट होत जाते.

एकेकाळी क्षितिजावर दिसणाऱ्या मोठ्या यशांच्या मागे धावताना जे दिसत नव्हते, ते नंतर हळूहळू दिसू लागते. 

प्रत्येक दिवस काहीतरी देऊन जात असतो. कधी अनुभव, कधी आठवण, कधी शिकवण, तर कधी केवळ शांतता.

जीवनात अडचणी नसतील असे नाही. सावल्या असतीलच. हव्यात!





 सावल्यांचे अस्तित्व हे प्रकाशाच्या अस्तित्वालाच सिद्ध करत असते.

आशावाद?  हो  आशावाद वास्तवाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे.काटे दिसत असतानाही फुलांकडे लक्ष देणे.अडथळे दिसत असतानाही शक्यता शोधणे. विलंब होत असतानाही विश्वास जपणे. आणि उद्या अजून काही सुंदर घडू शकते ही भावना मनात ठेवणे.आपल्या हातात सर्व काही नसते. पण आपली नजर कुठे ठेवायची हे मात्र आपल्या हातात असते.

दिवसाच्या शेवटी आनंदी माणसे आणि दुःखी माणसे यांच्यातील फरक परिस्थितीचा असतोच असे नाही; अनेकदा तो दृष्टीकोनाचा असतो.जगात प्रकाश आणि अंधार दोन्ही असतात.

प्रश्न एवढाच असतो, कोणत्या दिशेने आपण 


मला वाटते, आनंदी जगण्याची सुरुवात याच एका साध्या निवडीपासून होते.

प्रकाशाकडे पाहण्याच्या निवडीपासून.

प्रत्येकाची चाल वेगळी असते. कोणाला घाई नसते, कोणाला मागे पडल्याची खंत नसते. प्रत्येक जण आपापल्या लयीत जगत असतो. तेव्हा मनात एक विचार चमकून गेला—जीवनात महत्त्वाचा प्रश्न "किती वेगाने?" हा नसावा; "कोणत्या दिशेने?" हा असावा.


अरुण काळे

जून २०२६

Wednesday, June 10, 2026

सूर्य एक यो-यो

सूर्य एक  यो-यो

काही दिवसांपूर्वी सूर्योदय पाहत बसलो होतो. पूर्वेकडच्या क्षितिजावरून सूर्य हळूहळू वर येत होता. नकळत एक गंमतीशीर विचार मनात चमकून गेला.

आयुष्य म्हणजे सूर्याबरोबर खेळला जाणारा एक यो-योचा खेळ.

लहानपणी यो-यो हातात घेतला की त्याचे विलक्षण आकर्षण वाटायचे. एका दोरीला बांधलेले ते साधेसे खेळणे. हाताच्या एका झटक्याने ते खाली झेपावायचे, पुन्हा वर यायचे. पुन्हा खाली, पुन्हा वर. त्याचा आनंद जिंकण्यात नव्हता; त्याच्या हालचालीत, त्याच्या लयीत आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदात होता.

सूर्याकडे पाहताना मला तोच खेळ आठवतो.

पहाटे तो क्षितिजावरून वर येतो. हळूहळू आकाशात चढत जातो. दुपारी आपल्या उंचीवर पोहोचतो. मग सावकाश पश्चिमेकडे झुकू लागतो आणि संध्याकाळी क्षितिजाच्या पलीकडे अदृश्य होतो.

दिवसाची एक फेरी पूर्ण होते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.

पुन्हा एक सूर्योदय.

पुन्हा सूर्याचा यो-यो.

पुन्हा एक संध्याकाळ.

वयाच्या एका टप्प्यानंतर दिवस मोजण्याची पद्धत बदलते. कॅलेंडरवरील तारखा, वर्षांचे आकडे, वाढदिवस यांचे महत्त्व कमी होत जाते. त्याऐवजी महत्त्वाच्या वाटू लागतात छोट्या छोट्या गोष्टी—पहाटेचा गार वारा, चहाचा कप, एखाद्या मित्राचा फोन, पुस्तकातील एखादे वाक्य किंवा संध्याकाळी आकाशात पसरलेला रंगांचा उत्सव.

मग जाणवते की आपण प्रत्येक जण या सूर्याच्या यो-योबरोबर खेळत आहोत.

हा खेळ आपल्या नकळत सुरू असतो.

सूर्याचाही काहीसा तसाच स्वभाव आहे.

तो रोज त्याच मार्गाने प्रवास करतो, पण प्रत्येक दिवस नवा असतो. प्रत्येक सूर्योदयाचा रंग वेगळा असतो. प्रत्येक संध्याकाळचे सौंदर्य वेगळे असते. प्रत्येक दिवस एखादा नवा अनुभव, नवा विचार किंवा नवी आठवण घेऊन येतो.

म्हणूनच आता प्रत्येक सूर्योदयाकडे पाहताना मला वाटते—आजची फेरी सुरू झाली आहे.

आज पुन्हा एक संधी आहे.

काही नवीन पाहण्याची.

काही शिकण्याची.

काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याची.

आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आजचा दिवस मनापासून जगण्याची.

सूर्याचा यो-यो मला एक साधी गोष्ट शिकवतो. जीवन म्हणजे एखाद्या अंतिम ध्येयाकडे धावणारी शर्यत नाही. ते अनुभवांचा, आश्चर्यांचा आणि आनंदाचा खेळ आहे. आणि खेळ सुरू असेपर्यंत त्यात सहभागी व्हायचे.

आकाशाकडे पाहायचे.

सूर्याचा मागोवा घ्यायचा.

आणि बालपणीच्या निरागसतेने त्याचा आनंद लुटायचा.

कारण आजही सूर्याचा यो-यो फिरत आहे...

आणि त्याच्याबरोबर आयुष्यही.


अरुण काळे

जून २०२६


 

Tuesday, June 9, 2026

गुलमोहर


गुलमोहर

कसे कळते गुलमोहराला
कधी लाजावे, लालबुंद होऊन खुलावे?


आकाश अजून असताना कोरडे,
लागतो त्यास कसा हो ठाव?
पावसाच्या पहिल्या चाहुलीचा
कसा ऐकतो तो भाव?

कुठल्या अदृश्य हाकेने,
कोणासाठी तो सजतो खास?
भर उन्हातही फुलून जातो,
उधळीत रंगांचा सुवास.

असो वैशाख, असो अधिकमास,
जरी उन्हाचा तडाखा प्रखर;
तरीही डौलाने मिरवत राहतो
 हा लालबुंद साज सुंदर.

गुलमोहराकडे पाहिले की मला नेहमी एक प्रश्न पडतो. इतर अनेक वृक्ष सावली देतात, फळे देतात, ऋतूनुसार बहरतात; पण गुलमोहराचे काहीतरी वेगळेच असते. उन्हाळ्याच्या कडक झळा अंगावर घेत असतानाच तो अचानक लालबुंद फुलांनी उजळून निघतो. जणू त्याला येणाऱ्या पावसाची चाहूल आधीच लागलेली असते.

गुलमोहर मला  प्रतीक्षेचा, संयमाचा आणि आशेचा दूत वाटतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपली वेळ येईल, आपला ऋतू येईल, आणि तेव्हा आपणही आपल्या पूर्ण रंगांनी फुलू — हा विश्वास तो शांतपणे देत राहतो.

अरुण काळे

जून २०२६

दोन बाजू नाण्याच्या...

दोन बाजू नाण्याच्या... नाण्याला दोन बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. छापा म्हणजे चित्र आणि काटा म्हणजे नाण्याची किंमत. नाणं तेच असतं, पण ...