माझी फाईल कुठे आहे?
माझ्या आयुष्यातील एक मोठा शोध नुकताच लागला.
मी माणूस नसून एक फाईल आहे.हा शोध अचानक लागलेला नाही. अनेक वर्षांच्या सरकारी, निमसरकारी, खासगी, वैद्यकीय, बँकिंग आणि सामाजिक अनुभवातून तो हळूहळू समोर आला.
जन्मल्याबरोबर माझी पहिली फाईल उघडली गेली असावी. जन्मदाखला, लसीकरण कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट...
एक फाईल संपत नाही तोवर दुसरी.कधीकधी वाटते, आयुष्य कमी आणि कागदपत्रे जास्त. शाळेत प्रवेशासाठी फाईल.
कॉलेजसाठी फाईल. नोकरीसाठी फाईल.बँकेसाठी फाईल. घरासाठी फाईल.विमा, गुंतवणूक, इस्पितळ, प्रवास, सोसायटी, कर, वीज, गॅस...
जिकडे तिकडे फाईल. पूर्वी माणसे भेटली की "काय म्हणताय?" असे विचारायची. आता "कागद दिलेत का?" हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो.एखाद्या कार्यालयात गेल्यावर तर आपल्या अस्तित्वापेक्षा फाईलचे अस्तित्व महत्त्वाचे वाटू लागते.
"तुम्ही कोण?" या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे नसते. "फाईल नंबर काय?"
हा खरा प्रश्न असतो.
माझ्या लक्षात आले आहे की आपल्या देशात माणूस हरवला तर शोधायला वेळ लागेल; पण फाईल हरवली तर तातडीची बैठक बोलावली जाईल.
फाईल सापडली की काम सुरू. फाईल अडकली की आयुष्य अडकले. फाईल वर गेली की आशा वाढली.
फाईल खाली आली की पुन्हा नव्याने सुरुवात.
कधी कधी मला वाटते, आपल्या आयुष्याचा एक गुप्त चरित्रकार असतो. तो म्हणजे फाईल.
आपण काय शिकलो, कुठे राहिलो, कुठे गेलो, किती कमावले, कोणत्या रुग्णालयात दाखल झालो,सगळे तिच्याकडे नोंदलेले असते.फक्त एकच गोष्ट कोणत्याही फाईलमध्ये सापडत नाही.
आपण किती हसलो. किती मित्र जोडले- पहिल्या प्रेमाची धडधड, मुलांच्या यशाचा आनंद, एखाद्या अपयशातून मिळालेली शिकवण, जुन्या पत्रांतून अचानक सापडलेली एखादी आठवण, मनाजोगते पुस्तक वाचून झाल्यावर मनात रेंगाळणारी शांतता, किंवा बराच काळानंतर भेटलेल्या जिवाभावाच्या माणसाबरोबर घालवलेला एक तास... यापैकी कशाचीच नोंद कुठल्याच फाईलमध्ये नसते. आणि तरीही आयुष्याचा खरा हिशेब बहुतेक याच गोष्टींमध्ये किती वेळा मनापासून आनंद घेतला. किती लोकांच्या आठवणीत राहिलो.
ते जगले गेले पाहिजे.
No comments:
Post a Comment