Tuesday, June 16, 2026

पाणी शोधताना..

पाणी शोधताना...
एकदा एका चिमणीला तहान लागली.
ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती फडफडत खिडकीतून आत आली आणि त्या काचेच्या भांड्याच्या कडेवर जाऊन बसली.
आत डोकावून पाहते तो काय! तिला एक गोल्डफिश दिसला.अचानक आलेल्या त्या पाहुण्याकडे माशानेही आश्चर्याने पाहिले.
काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले.चिमणी गोंधळली.गोल्डफिशही चकित झाला.
खरे तर त्या गोल्डफिशलाही अधूनमधून या छोट्याशा काचेच्या समुद्राच्या बाहेरचे जग पाहायची उत्सुकता असे. निळे आकाश, पांढरे ढग, झाडांच्या फांद्या आणि त्यावर बसलेले पक्षी, हे सारे तो रोज काचेआडून पाहत असे आणि मनोमन त्यांचे स्वप्न रंगवत असे.
चिमणीनेच अखेर शांतता भंग केली.
"माफ करा," ती म्हणाली, "मी फक्त पाणी पाहून आत आले."
मासा हसला.
"आणि मी," तो म्हणाला, "या छोट्याशा समुद्रात आणि माझ्या एकांतात अगदी सुखी होतो. तुमच्या येण्याने माझा एकांत भंगला."
दरम्यान चिमणीच्या लक्षात आले की पाण्याची पातळी खूप खाली आहे. तिला तिची तहान भागवता येणार नव्हती.
माशालाही त्याचा एकांत परत मिळणार नव्हता.
दोघांचेही मनसुबे अपूर्ण राहिले.

आपलेही काहीसे असेच असते.
जीवनात फार थोड्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडतात.
गमतीची गोष्ट म्हणजे आपण मात्र आयुष्याने आपल्या मनातील पटकथेनुसारच वागावे अशी अपेक्षा करत राहतो.
चिमणीला पाणी हवे होते. माशाला एकांत.दोघांनाही हवे ते मिळाले नाही.

पण त्यांची भेट झाली.

अशा भेटी, अशा घटना, असे प्रसंग अनेकदा अनपेक्षित वाटतात. पण मागे वळून पाहताना 
जाणवते की त्या जणू पूर्वनियोजितच होत्या.
जर चिमणी थोडी शहाणी असेल तर ती हरवलेल्या पाण्याची तक्रार करत बसणार नाही. 
ती माशाकडून पाण्याखालच्या जगाच्या गोष्टी ऐकेल.
आणि मासा जर शहाणा असेल तर तो आलेल्या पाहुण्याला घाबरणार नाही. तो चिमणीकडून आकाशाच्या गोष्टी ऐकेल.
दोघेही तिथून थोडे अधिक समृद्ध होऊन निघतील.

आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडत असतात. काही माणसे अचानक भेटतात.
काही घटना अनपेक्षितपणे घडतात.

काही दारे नकळत उघडतात.
त्या क्षणी त्यांचा अर्थ कळत नाही. पण नंतर लक्षात येते की त्या प्रत्येक भेटीत, प्रत्येक प्रसंगात एखादा धडा दडलेला होता.
आपण एका गोष्टीची अपेक्षा करतो; आयुष्य मात्र दुसरेच काही समोर ठेवते. कदाचित त्यालाच जीवन म्हणत असावेत.
कारण कितीही प्रयत्न केला तरी काही पूर्वनियोजित गोष्टी आपण टाळू शकत नाही.त्या आपल्या आयुष्यात येतातच.
कधी चिमणी बनून.
कधी गोल्डफिश बनून.
आयुष्याच्या अनपेक्षित वळणांसाठी नेहमी तयार राहा



No comments:

Post a Comment

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...