जीवनाकडे पाहण्याचे दोन मार्ग असतात.
एक म्हणजे जे नाही त्याचा विचार करत राहणे.
आणि दुसरा म्हणजे जे आहे त्यातील सौंदर्य शोधत राहणे.
पहिला मार्ग सहज सापडतो. कारण अपूर्णता नेहमी डोळ्यासमोर उभी असते. राहून गेलेल्या गोष्टी, अपुरी पडलेली स्वप्ने, अपेक्षेप्रमाणे न घडलेले प्रसंग, न मिळालेल्या संधी, यांची यादी फार मोठी असते.
पण दुसरा मार्ग जाणीवपूर्वक निवडावा लागतो. तो म्हणजे जीवनाने दिलेल्या छोट्या छोट्या आनंदांची दखल घेण्याचा मार्ग.
सकाळचा पहिला किरण. पुस्तकातील एखादे मनाला भिडणारे वाक्य.
खिडकीबाहेर दिसलेले आकाश. किंवा कोणत्याही कारणाशिवाय मनात उमटलेले एक हसू.
आनंद अनेकदा मोठ्या घटनांमध्ये नसतो. तो अशा क्षणांमध्ये लपलेला असतो.
वयानुसार ही गोष्ट अधिक स्पष्ट होत जाते.
एकेकाळी क्षितिजावर दिसणाऱ्या मोठ्या यशांच्या मागे धावताना जे दिसत नव्हते, ते नंतर हळूहळू दिसू लागते.
प्रत्येक दिवस काहीतरी देऊन जात असतो. कधी अनुभव, कधी आठवण, कधी शिकवण, तर कधी केवळ शांतता.
जीवनात अडचणी नसतील असे नाही. सावल्या असतीलच. हव्यात!
सावल्यांचे अस्तित्व हे प्रकाशाच्या अस्तित्वालाच सिद्ध करत असते.
आशावाद? हो आशावाद वास्तवाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे.काटे दिसत असतानाही फुलांकडे लक्ष देणे.अडथळे दिसत असतानाही शक्यता शोधणे. विलंब होत असतानाही विश्वास जपणे. आणि उद्या अजून काही सुंदर घडू शकते ही भावना मनात ठेवणे.आपल्या हातात सर्व काही नसते. पण आपली नजर कुठे ठेवायची हे मात्र आपल्या हातात असते.
दिवसाच्या शेवटी आनंदी माणसे आणि दुःखी माणसे यांच्यातील फरक परिस्थितीचा असतोच असे नाही; अनेकदा तो दृष्टीकोनाचा असतो.जगात प्रकाश आणि अंधार दोन्ही असतात.
प्रश्न एवढाच असतो, कोणत्या दिशेने आपण
मला वाटते, आनंदी जगण्याची सुरुवात याच एका साध्या निवडीपासून होते.
प्रकाशाकडे पाहण्याच्या निवडीपासून.
प्रत्येकाची चाल वेगळी असते. कोणाला घाई नसते, कोणाला मागे पडल्याची खंत नसते. प्रत्येक जण आपापल्या लयीत जगत असतो. तेव्हा मनात एक विचार चमकून गेला—जीवनात महत्त्वाचा प्रश्न "किती वेगाने?" हा नसावा; "कोणत्या दिशेने?" हा असावा.
अरुण काळे
जून २०२६
No comments:
Post a Comment