Tuesday, June 9, 2026

गुलमोहर


गुलमोहर

कसे कळते गुलमोहराला
कधी लाजावे, लालबुंद होऊन खुलावे?


आकाश अजून असताना कोरडे,
लागतो त्यास कसा हो ठाव?
पावसाच्या पहिल्या चाहुलीचा
कसा ऐकतो तो भाव?

कुठल्या अदृश्य हाकेने,
कोणासाठी तो सजतो खास?
भर उन्हातही फुलून जातो,
उधळीत रंगांचा सुवास.

असो वैशाख, असो अधिकमास,
जरी उन्हाचा तडाखा प्रखर;
तरीही डौलाने मिरवत राहतो
 हा लालबुंद साज सुंदर.

गुलमोहराकडे पाहिले की मला नेहमी एक प्रश्न पडतो. इतर अनेक वृक्ष सावली देतात, फळे देतात, ऋतूनुसार बहरतात; पण गुलमोहराचे काहीतरी वेगळेच असते. उन्हाळ्याच्या कडक झळा अंगावर घेत असतानाच तो अचानक लालबुंद फुलांनी उजळून निघतो. जणू त्याला येणाऱ्या पावसाची चाहूल आधीच लागलेली असते.

गुलमोहर मला  प्रतीक्षेचा, संयमाचा आणि आशेचा दूत वाटतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपली वेळ येईल, आपला ऋतू येईल, आणि तेव्हा आपणही आपल्या पूर्ण रंगांनी फुलू — हा विश्वास तो शांतपणे देत राहतो.

अरुण काळे

जून २०२६

No comments:

Post a Comment

  बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्य...