Sunday, June 28, 2026

हसरी खेळकर झुळूक

 

हसरी खेळकर झुळूक

रविवार सकाळ.

लवकर जाग आल्यामुळे बाल्कनीत गार वाऱ्याच्या झुळुकेशी बोलत उभा होतो. ती ऐकत नसावी. नाहीतर थांबली असती. पण नाही. तिचं येणं-जाणं मलाही सुखावह वाटत होतं.

हळूहळू तांबडं फोडत अरुणोदय महाराज, सूर्याजींना रथातून घेऊन येत होते. क्षणभर सूर्याजींना नमस्कार करून दर्शन घेतलं...

आणि अचानक मेंदू घसरला.(तो सरळ रस्त्याने फारसा चालतच नाही.)

माझ्या एका जिवाभावाच्या मैत्रिणीशी फोनवर झालेल्या संभाषणाकडे.




तसं पाहिलं तर त्या संभाषणाला काही अर्थ नव्हता... आणि म्हणूनच ते इतकं सुंदर होतं.

तिच्याकडून स्वतःचीच स्तुती सुरू होती आणि ती माझ्या कानावर आदळत होती.

किती वेळ ऐकली, विचारू नका. शेवटी थोडा वैतागून मीच तिला थांबवलं.

"ऐक...

तू मोठी... तुझी बुद्धी मोठी...

मी लहान...माझी बुद्धी लहान.

तुझं हृदय मोठं. ते म्हणतात ना... दिल दरिया... की काय ते.

आणि माझं?तुझ्या हृदयापुढे लॅपटॉपवर दिसणाऱ्या त्या छोट्याशा ❤️ इमोजीएवढंसुद्धा नाही.

आणि ऐक...

तुझ्याशी माझी तुलना करणं म्हणजे मुंगीने हत्तीला म्हणावं—'मी तुझ्यापेक्षा जास्त वजन उचलते!'

तू आहेस तशीच मोठी राहा.

मला लहान असल्याचं अजिबात दुःख नाही.

कारण...

साधं आणि सोपं सांगायचं तर...तू माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस."

क्षणभर शांतता.

मग मी म्हटलं, "एक पी. जे. मारू?"

"मार."

"ऐक...

माझ्या भावाचं नाव 'जिवा' आहे."

क्षणभर शांतता...

आणि मग ती खळखळून हसायला लागली.

मीसुद्धा.

झुळूक मात्र सगळं ऐकूनही काही न बोलता हसत फिरत होती.

No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...